सांगली, २३ मे (वार्ता.) – महापालिकेकडून सांगली, मिरज आणि कुपवाड शहरांतील अनधिकृत होर्डिंग हटवण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. कोणतीही अनधिकृत कृती यापुढे सहन केली जाणार नाही. संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे महापालिकेचे आयुक्त तथा प्रशासक शुभम गुप्ता यांनी सांगितले. गुप्ता यांच्या आदेशाने अतिक्रमण विभागाकडून ही कारवाई करण्यात येत आहे. २२ मे या दिवशी कोल्हापूर रस्त्यावरील २० x ४० या आकाराचा होर्डिंगचा सांगाडा उपआयुक्त वैभव साबळे यांच्या सूचनेनुसार साहाय्यक आयुक्त सहदेव कावडे आणि अतिक्रमण पथक प्रमुख दिलीप घोरपडे यांच्या पथकाने हटवला.
मुंबई येथील होर्डिंगच्या दुर्घटनेनंतर महापालिका आयुक्त शुभम गुप्ता यांनी महापालिका क्षेत्रातील अनधिकृत होर्डिंगचे सर्वेक्षण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले होते. यानुसार उपआयुक्त वैभव साबळे यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका क्षेत्रातील अनधिकृत होर्डिंगचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये महापालिका क्षेत्रात एकूण ३१ होर्डिंग अनधिकृत असल्याचे समोर आले. त्यानंतर अनधिकृत होर्डिंग काढण्याची मोहीम चालू झाली. यापुढेही अनधिकृत होर्डिंग हटवण्याची कारवाई चालूच रहाणार असून दंडही वसूल केला जाईल.