Hamas Tortures Israeli Lady Soldiers : हमासच्या आतंकवाद्यांकडून ५ इस्रायली महिला सैनिकांचा छळ !

तेल अविव – गाझा सीमेजवळील नहल ओझ तळावर तैनात करण्यात आलेल्या  ५ इस्रायली महिला सैनिकांना हमासच्या आतंकवाद्यांनी कह्यात घेतले होते. इस्रायलच्या ‘होस्टेज अँड मिसिंग फॅमिली फोरम’ने एक नवीन व्हिडिओ प्रसारित केला आहे. यामध्ये हमासच्या आतंकवाद्यांनी ५ महिला इस्रायली सैनिकांना ओलीस ठेवल्याचे दिसत आहे. ३ मिनिटांच्या या व्हिडिओमध्ये हमासच्या आतंकवाद्यांनी सर्व महिला सैनिकांचे हात-पाय बांधल्याचे दिसत आहे. अपहरण केलेल्या महिला सैनिकांना हमासच्या आतंकवाद्यांनी  मारहाण करून घायाळ केले असून त्यांना ठार मारण्याची धमकी दिली आहे.

हमासला संपवण्याचा माझा निश्‍चय आणखी दृढ झाला ! – इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू

नेतान्याहू

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू म्हणाले, ‘‘हमासने आमच्या सैनिकांवर केलेले अत्याचार पाहून त्यांना संपवण्याचा माझा निश्‍चय आणखी दृढ झाला. ७ ऑक्टोबरला इस्रायलमध्ये ज्या प्रमाणे हमासने आक्रमण केले, तसे आक्रमण पुन्हा कधीही होणार नाही.’’

नेतान्याहू यांच्या त्यागपत्राची मागणी !

युद्धाला प्रारंभ झाल्यापासून इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू हमासचा खात्मा आणि ओलिसांची सुरक्षित सुटका करण्याविषयी बोलत आहेत; मात्र अद्यापही सर्व ओलीस हमासच्या कैदेत आहेत. त्यामुळे इस्रायली नागरिकांमध्ये पंतप्रधान नेतान्याहू आणि त्यांचे सरकार यांच्याविषयी संताप वाढत आहे. राजधानी तेल अविवसह ५० ठिकाणी सहस्रो लोक सरकारच्या विरोधात रस्त्यावर उतरले आहेत. नेतान्याहू यांनी त्यागपत्र द्यावे आणि देशात लवकर निवडणुका घ्याव्यात, अशी मागणी त्यांनी केली आहे.

संपादकीय भूमिका

हमासचे समर्थन करणारे याविषयी गप्प का ?