Russia Cancer Vaccine : रशियाने सिद्ध केली कर्करोगावर उपचार करणारी लस

वर्ष २०२५ पासून लोकांना निःशुल्क देणार

मॉस्को – रशियाला कर्करोगावर उपचार करणारी लस बनवण्यात यश आले आहे, असे रशियाच्या आरोग्य मंत्रालयाच्या ‘रेडिओलॉजी मेडिकल रिसर्च सेंटर’चे संचालक आंद्रेई कॅप्रिन यांनी सांगितले. रशियन वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार पुढील वर्षापासून ही लस रशियन नागरिकांना मोफत दिली जाईल.

संचालक आंद्रेई यांनी सांगितले की, रशियाने कर्करोगाच्या निवारणासाठी वर ‘एम्.आर्.एन्.ए.’ लस विकसित केली आहे. रशियाचा हा शोध शतकातील सर्वांत मोठा शोध मानला जात आहे. लसीच्या चाचण्यांमधून असे दिसून आले आहे की, ती लस ‘ट्यूमर’ची  (ट्यूमर म्हणजे कर्करोगाच्या आसामान्य पेशी निर्माण होणे) वाढ रोखण्यास साहाय्य करते.

‘एम्.आर्.एन्.ए.’ लस म्हणजे काय?

एम्.आर्.एन्.ए. हा मानवी अनुवांशिक कोडचा एक छोटासा भाग आहे, जो आपल्या पेशींमध्ये प्रथिने बनवतो. सोप्या भाषेत हेदेखील समजू शकते की, जेव्हा एखादा विषाणू किंवा जीवाणू आपल्या शरिरावर आक्रमण करतो, तेव्हा एम्.आर्.एन्.ए. तंत्रज्ञान आपल्या पेशींना त्या विषाणूशी लढण्यासाठी प्रथिने सिद्ध करण्याचा संदेश पाठवते. यामुळे आपल्या रोगप्रतिकारक शक्तीला आवश्यक प्रथिने मिळतात आणि आपल्या शरिरात प्रतिपिंडे (अँटीबॉडीज) सिद्ध होतात.