मुंबई – गुरुकृपायोगानुसार साधना करणारे हिंदु जनजागृती समितीचे मुंबई समन्वयक श्री. बळवंत पाठक (वय ४० वर्षे) यांनी ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठली आहे. १९ मे या दिवशी ठाणे येथे एका कार्यक्रमात सनातनच्या धर्मप्रचारक सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी उपस्थितांना ही आनंदवार्ता दिली. या वेळी सनातनच्या संत पू. (सौ.) संगीता जाधव यांचीही वंदनीय उपस्थिती लाभली. श्री. बळवंत पाठक यांच्यातील गुरुंप्रति अपार श्रद्धा, धर्मकार्याची तीव्र तळमळ, त्यागी वृत्ती आणि चिकाटी आदी गुणांमुळे त्यांची आध्यात्मिक प्रगती झाली, असे या वेळी संतांनी सांगितले.
सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी श्रीकृष्णाची प्रतिमा देऊन श्री. बळवंत पाठक यांचा सत्कार केला. पू. (सौ.) संगीता जाधव यांनी श्री. बळवंत पाठक यांना भेटवस्तू दिली. श्री. बळवंत पाठक यांच्या पत्नी सौ. अर्पिता पाठक या कार्यक्रमाला उपस्थित होत्या. श्री. बळवंत यांच्या आई श्रीमती भारती पाठक आणि मुलगी कु. ईश्वरी (वय ८ वर्षे) हे ऑनलाईन प्रणालीद्वारे कार्यक्रमाला जोडले होते. या आनंदवार्तेमुळे या कार्यक्रमाला उपस्थित असलेले हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते आणि सनातनचे साधक यांनी आनंद अनुभवला.श्री. बळवंत पाठक यांच्या समवेत सेवा करतांना शिकायला मिळालेली सूत्रे, त्यांची गुणवैशिष्ट्ये समितीच्या कार्यकर्त्यांनी या वेळी उत्स्फूर्तपणे सांगितली. श्री. बळवंत पाठक यांची आई, मुलगी, तसेच पत्नीचे बंधू श्री. संकेत डिंगरे यांनीही या वेळी मनोगत व्यक्त केले.
त्यागी वृत्तीमुळे बळवंतदादा अनेक अडचणींवर सहज मात करतात ! – पू. (सौ.) संगीता जाधव
बळवंतदादांकडे अनेक गुण आहेत. कोणत्याही सूत्राविषयी ते स्पष्टीकरण देत नाहीत. त्यांच्यामध्ये त्यागी वृत्ती आहे. दोषांची तीव्रता अधिक असेल आणि त्यागही नसेल, तर कठीण जाते. साधनेत येणार्या अडचणींवर ते त्यागी वृत्तीमुळे मात करतात. अनेकदा ‘अडचणी आल्यावर बळवंतदादा साधनेत पुढे कसे जाणार ?’, असे वाटायचे; परंतु त्यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे चरण सूक्ष्मातून घट्ट पकडले आहेत. त्यामुळे कोणतीही अडचण त्यांच्या साधनेत अडथळा निर्माण करू शकत नाही, हे लक्षात येते.
‘एखादी गोष्ट साध्य केली कि नाही ?’, हे ईश्वर पहात नाही, तर त्यासाठीची धडपड पहातो. बळवंतदादांची धडपड करण्याची वृत्ती भावते. त्यामुळेच ते आनंदी राहू शकतात. कितीही मोठा संघर्ष असला, तरी ते सहजपणे पुढे जाऊ शकतात. ‘आनंद स्वत:मध्येच आहे आणि तो कसा प्रकट करायचा’, याची गुरुकिल्ली त्यांना उमजली आहे. त्यागात आनंद आहे, हे त्यांना समजले आहे. त्यामुळे त्यांना संघर्षाची भीती वाटत नाही.
संतांच्या साहाय्यामुळे साधनेत टिकून राहिलो ! – बळवंत पाठकसंतांच्या आशीर्वादामुळेच माझ्याकडून साधना होऊ शकली. साधनेत अनेक अडचणीही आल्या. पुढे साधना करता येईल कि नाही, असे प्रसंगही आले; मात्र संतांच्या साहाय्यामुळे मी साधनेत टिकून राहिलो. ‘पत्नी’ म्हणून मला नेहमी आध्यात्मिक स्तरावर हाताळतात ! – सौ. अर्पिता पाठक (श्री. बळवंत पाठक यांच्या पत्नी)एखादा जीव ध्येय घेऊन जन्माला येतो, तसे श्री. बळवंत पाठक यांच्या आयुष्याचे ध्येय ‘ईश्वरप्राप्ती’ हेच आहे. त्यांच्यात चिकाटी आहे. ‘जमणार नाही’, हे मी त्यांच्या तोंडून कधीच ऐकले नाही. पत्नी म्हणून त्यांनी मला कधीच भावनिक स्तरावर हाताळले नाही. त्यांनी मला नेहमी आध्यात्मिक स्तरावरच हाताळले. मला कोणते साहाय्य हवे आहे; म्हणून मानसिक स्तरावर हाताळण्यासाठी ते माझ्यासमवेत घरी थांबले, असे कधीही झाले नाही. त्या वेळी माझा संघर्ष व्हायचा; परंतु एका उत्तम शिष्याचे उदाहरण मी त्यांच्या माध्यमातून अनेकदा अनुभवले. त्यांना साधना करण्याची पुष्कळ ओढ आहे. |