रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतिन यांची पाश्चात्त्य देशांना चेतावणी
मॉस्को (रशिया) – रशिया जागतिक संघर्ष रोखण्यासाठी सर्व काही करील; परंतु रिशयाला उगाचच कोणीही डिवचू नये. आमचे सामरिक सैन्य नेहमीच युद्धासाठी सिद्ध असते. पाश्चात्त्य देशांच्या कोणत्याही चेतावणीला किंवा आक्रमणाला ते जशास तसे प्रत्युत्तर देऊ शकते. आमच्याकडचे अणुबाँब नेहमीच सज्ज असतात, असे विधान रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी केले. ते रशियाच्या वार्षिक विजय संचलनामध्ये बोलत होते. वर्ष १९४५ मध्ये दुसर्या महायुद्धात रशियाकडून जर्मनीच्या पराभव झाला. त्याच्या स्मरणार्थ रशियात ९ मे या दिवशी सैन्याचे संचलन आयोजित केले जाते
पुतिन पुढे म्हणाले की, विजय दिवस आपल्या पिढ्यांना एकत्र आणतो. आम्ही शतकानुशतके जुन्या परंपरांचा आदर ठेवत आहोत आणि आम्हाला विश्वास आहे की, एकत्रितपणे आम्ही रशियाचे स्वतंत्र आणि सुरक्षित भविष्य सुनिश्चित करू. रशियाला शांततापूर्ण भविष्य हवे आहे; परंतु पाश्चात्य उच्चभ्रू देश रशियाचा द्वेष करतात. त्यांना ‘रशियाफोबिया’ (रशियाचा द्वेष करण्याचा आजार) झाला आहे. रशियाच्या विरोधात वातावरण निर्माण करण्यासाठी विविध प्रकारे पावले उचलली जात आहे; परंतु रशिया त्यांच्याशी लढत राहील. रशिया स्वतःच्या सार्वभौमत्वाचे रक्षण करण्यास कटीबद्ध आहे.