उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! चि. अनंत राकेश देशमाने या पिढीतील एक आहे !
‘सनातन मध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे’ मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन तो मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
१. गर्भारपण
१ अ. गर्भधारणेची चाचणी करण्याच्या १५ दिवस आधी स्वप्नात श्री महालक्ष्मीदेवीने दर्शन देऊन ‘तुमच्याकडे एक बाळ येणार आहे’, असे सांगणे : ‘जून २०२० मध्ये माझी गर्भधारणेची चाचणी (प्रेग्ननसी टेस्ट) करण्याच्या १५ दिवस आधी मला पहाटे स्वप्नात श्री महालक्ष्मीदेवीचे दर्शन झाले. देवीने मला सांगितले, ‘तुमच्याकडे आणखी एक बाळ येणार आहे.’ (मला ९ वर्षांचा राघव (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के) नावाचा मोठा मुलगा आहे.) नंतर ‘हे स्वप्न आहे’, असा विचार करून मी तो विचार दूर सारला. माझी गर्भधारणेची चाचणी ‘पॉझिटिव्ह’ आल्यानंतर मला पुन्हा त्या स्वप्नाची आठवण झाली.
१ आ. गर्भधारणा झाल्यापासून परात्पर गुरु डॉ. आठवले यांना ‘हे बाळ तुम्हाला अपेक्षित असे असू दे’, अशी प्रार्थना होणे : मला गर्भधारणा झाल्याचे समजल्यापासून माझ्याकडून नेहमी प्रार्थना होत होती, ‘परात्पर गुरु डॉ. आठवले, हे बाळ तुम्हाला अपेक्षित असे असू दे. त्या बालकाच्या माध्यमातून आम्हा सर्वांची साधना होऊन आमची आध्यात्मिक उन्नती होऊ दे.’
१ इ. मी भक्तीसत्संग नियमितपणे ऐकत असे. सत्संग चालू असतांना गर्भातील बाळाच्या हालचाली अल्प असायच्या आणि ‘तेही शांतपणे सत्संग ऐकत आहे’, असे मला जाणवायचे.
१ ई. गर्भारपणात माझ्याकडून नियमितपणे नामस्मरण आणि प्रार्थना होत असे.
१ उ. चमचमीत पदार्थ आणि चहा न पचणे : मला सामान्यपणे आवडणारा चहा आणि खाण्याचे चमचमीत पदार्थ या गर्भारपणात कधीच पचले नाहीत. ‘पोटातील बाळाची आवड पुष्कळ सात्त्विक आहे’, असे मला वाटायचे.
१ ऊ. बुलबुल पक्ष्याची एक जोडी नियमितपणे घरी येणे : गर्भारपणात बुलबुल पक्ष्यांची एक जोडी नियमितपणे आमच्या घरी येत होती. ते पक्षी घरात बैठकीच्या खोलीत आणि स्वयंपाकघरात येऊन बसायचे. ते तेथील फळेही खायचे. ते नेहमी बैठकीच्या खोलीच्या सज्जात बसलेले असायचे.’
– आधुनिक वैद्या (सौ.) अमृता राकेश देशमाने (आई), फोंडा, गोवा.
१ ए. ‘माझी मुलगी सौ. अमृता हिच्या पोटी जन्माला येणारे बालक दैवी असणार’, असे मला आतून पुष्कळ तीव्रतेने वाटत होते.
१ ऐ. चि. अनंतच्या वेळी गरोदर असतांना त्याच्या आईमध्ये जाणवलेले पालट
१ ऐ १. ‘पूर्वी सौ. अमृताला काळजी वाटायची. या गर्भारपणात तिच्या तोंडवळ्यावरील निखळ हास्याचे प्रमाण वाढले होते.
१ ऐ २. सकारात्मकतेत वाढ झाल्याने निर्णयक्षमतेत वाढ होणे : पूर्वी तिच्या मनातील नकारात्मक विचारांचे प्रमाण अधिक होते; पण अनंतच्या वेळी गर्भावस्थेपासून ती पुष्कळ सकारात्मक झाली आहे. ‘ती अनेक वेळा इतरांना सकारात्मक दृष्टीकोन देते’, असे माझ्या लक्षात आले. पूर्वी ती लहान-सहान प्रसंगांतही ‘काय करू ? कसे करू ?’, असे मला विचारत असे. आता तिच्यातील सकारात्मकता वाढल्याने तिच्या निर्णयक्षमतेतही वाढ झाली आहे.
१ ऐ ३. स्वीकारण्याच्या वृत्तीत वाढ होणे : पूर्वी अमृता तिच्या यजमानांशी (डॉ. राकेश देशमाने यांच्याशी), तसेच आमच्याशी (आई-वडिलांशी (सौ. अनुराधा हरीश्चंद्र निकम आणि श्री. हरिश्चंद्र निकम (वय ६८ वर्षे) यांच्याशी)) लहान गोष्टींवरून बर्याच वेळा वाद घालत असे. आता एखाद्या प्रसंगात इतरांची चूक असेल, तर ती फारशी वाद घालत नाही. तिची स्वीकारण्याची वृत्ती वाढली आहे.’
– सौ. अनुराधा हरीश्चंद्र निकम (चि. अनंतची आजी (आईची आई), आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ६४ वर्षे), फोंडा, गोवा.
२. ईश्वराच्या कृपेने चांगल्या दिवशी प्रसुती होणे :
‘आम्ही आधुनिक वैद्यांना विचारले, ‘‘२८.२.२०२१ हा दिवस चांगला आहे, तर त्या दिवशी प्रसुती करूयात का ?’’ तेव्हा आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘त्या दिवशी रुग्णालयाच्या कर्मचार्यांना ‘कोविड वॅक्सिन’चा दुसरा डोस घ्यायचा आहे. त्यामुळे कुणीही कर्मचारी उपलब्ध नसणार.’’ प्रत्यक्षात २८.२.२०२१ या दिवशीच पहाटे ५ वाजल्यापासून माझ्या पोटात कळा येऊ लागल्या; म्हणून आम्ही तातडीने रुग्णालयात गेलो. मला तपासल्यावर आधुनिक वैद्य म्हणाले, ‘‘आपल्याला लगेच शस्त्रकर्म करावे लागेल; कारण या प्रसुतीवेदना आहेत. बहुतेक हीच ईश्वराची इच्छा असेल; म्हणून असे झाले. आज आम्हाला दुसरा डोस देण्याचे रहित झाले आहे. आज सगळे कर्मचारी उपलब्ध आहेत.’’ त्यानंतर त्या दिवशीच माझी प्रसुती झाली.
३. जन्मानंतर
३ अ. जन्म ते ४ मास
३ अ १. शांत आणि समाधानी : चि. अनंत शांत आणि समाधानी आहे. तो केवळ दूध पिण्यासाठीच प्रत्येक दोन – अडीच घंट्यांनी उठून रडायचा. त्याने आम्हाला रात्री कधीच जागवले नाही.
३ अ २. त्याला दुपारी किंवा रात्री झोपवतांना भ्रमणभाषवर ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप लावल्यास तो लगेच झोपायचा.
३ अ ३. बाळाचा जन्म झाल्यापासून रुग्णालयात, तसेच माहेरच्या आणि सासरच्या घरी बुलबुल पक्ष्यांची जोडी नेहमी येणे : अनंतचा जन्म ज्या रुग्णालयात झाला, त्या रुग्णालयातील तिसर्या माळ्यावरील आमच्या खोलीतील खिडकीवर २ बुलबुल पक्षी अनंतचा जन्म झाल्यापासून आम्हाला घरी सोडेपर्यंत प्रतिदिन सकाळी १० – १५ मिनिटे येऊन बसायचे. मी प्रसुतीनंतर पुण्याला आईकडे गेले असतांना तेथील घरीही बुलबुल पक्षी नेहमी येत असत. आम्ही फोंडा (गोवा) येथील घरी आल्यावरही प्रतिदिन सकाळी बुलबुल पक्षी येऊ लागले. जुलै २०२१ मध्ये बुलबुल पक्ष्यांनी घरातील सज्जात घरटे बांधले आणि तेथे एका छान पिल्लाला जन्म दिला.
३ अ ४. त्याने अनेक वेळा जागेपणी किंवा झोपेत उजव्या हाताचा अंगठा आणि तर्जनी ही बोटे जोडून मुद्रा केलेली असते. त्या वेळी ‘त्याचे अखंड नामस्मरण चालू आहे’, असे मला जाणवले.
३ अ ५. अनंतच्या पाठीवर खालच्या बाजूला जन्मापासून मोरपिसासारखे चिन्ह आहे.
३ अ ६. अनंतच्या जन्मापूर्वी घरी तुळशीचे रोप लावल्यावर ते सुकणे आणि त्याच्या जन्मानंतर घरातील कुंड्यांमध्ये तुळशीची रोपे आपोआप उगवणे : अनंतच्या जन्मापूर्वी मी तुळशीचे रोप लावले की, तुळस २ – ३ मासांनी उगवायची आणि नंतर सुकून जायची. त्यानंतर मला पुन्हा नवीन रोप लावायला लागायचे. अनंतचा जन्म झाल्यापासून आमच्या फोंडा आणि पुणे येथील सदनिकेत अनेक कुंड्यांमध्ये आपोआपच तुळशीची रोपे उगवत आहेत आणि मोठी होत आहेत.
३ अ ७. भक्तीसत्संग चालू असतांना सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी लिहिलेले भजन भ्रमणभाषवरील परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे हात जोडून पहात आनंदाने ऐकणे : तो ४ मासांचा असतांना एकदा आम्ही भ्रमणभाषवर भक्तीसत्संग ऐकत होतो. त्या वेळी भक्तीसत्संगात सद्गुरु अनुराधा वाडेकर यांनी लिहिलेले भजन लावले होते आणि भ्रमणभाषवर परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र होते. तेव्हा अनंतने हात जोडून संपूर्ण भजन ऐकले. त्या वेळी तो आनंदाने आवाज काढून हुंकार देत होता. त्याच सत्संगात नंतर ‘जय गुरुदेव, जय गुरुदेव’ हे भजन लावल्यावर तो पुन्हा हात जोडून भजन ऐकू लागला आणि आनंदाने हुंकार देऊ लागला.
३ आ. वय ५ मास ते १० मास
३ आ १. गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम एकटक, शांतपणे आणि भावपूर्णरित्या पहाणे : अनंत ५ मासांचा असतांना २३.७.२०२१ या गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनंतने गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम सकाळी ११.१५ वाजल्यापासून दुपारी १२.३० वाजेपर्यंत गुरुपूजन संपेपर्यंत एकटक, शांतपणे आणि भावपूर्ण पाहिला. त्या वेळेत त्याने माझ्याकडे एकदाही बघितले नाही. त्याला कार्यक्रम संपल्यावरच दूध प्यायची आठवण झाली. त्या दिवशीचे संध्याकाळचे कार्यक्रमही त्याने शांतपणे पूर्ण बघितले.
३ आ २. साधना न करणार्या अनंतच्या मामीलाही त्याचे वेगळेपण जाणवणे : अनंत ५ मासांचा असतांना आम्ही त्याला घेऊन पुण्याला आईकडे गेलो होतो. तेव्हा त्याला बघून त्याची मामी (डॉ. (सौ.) प्लाविनी निकम यांना) म्हणाली, ‘‘अनंतकडे बघून ‘तो स्वामी विवेकानंद आहे’, असे वाटते. तो एकदम शांत आणि प्रसन्न आहे.’’ त्याची मामी साधना करत नाही.
३ आ ३. पाळीव प्राण्यांवरील प्रेम : अनंत साडेपाच मासांचा असतांना आम्ही एका नातेवाइकांकडे गेलो असतांना अनंत त्यांनी पाळलेल्या कुत्र्याजवळ न घाबरता बसला. तो कुत्र्याकडे बघून हसत होता. त्याने कुत्र्याला हात लावला. कुत्र्यानेही अनंतवर न भुंकता त्याचा पाय केवळ जिभेने चाटला आणि शेपटी हालवली.’
– आधुनिक वैद्या (सौ.) अमृता राकेश देशमाने (आई), फोंडा, गोवा.
३ आ ४. चांगली शारीरिक क्षमता : ‘अनंत पुष्कळ बलवान आहे. तो ६ मासांचा असतांना एकदा त्याने पाण्याने भरलेली मोठी बालदी सहजपणे ओढली. तेव्हा ती बालदी १ – २ इंच पुढे सरकली. ‘हे ईश्वरी कृपेविना कसे शक्य आहे ?’, असा विचार माझ्या मनात आला.’ – सौ. अनुराधा हरीश्चंद्र निकम
३ आ ५. संतांच्या सहवासाची ओढ : ‘अनंत साडेआठ मासांचा असतांना सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्याकडे लगेच गेला. तो सद्गुरु राजेंद्रदादांना पूर्वीपासून ओळखत असल्याप्रमाणे त्यांच्याकडे पुष्कळ वेळ एकटक पहात होता. सद्गुरु दादांना गावाला जायला निघायचे होते; म्हणून ते अनंतला अन्य व्यक्तींकडे देत होते; पण तो कुणाकडेच जायला सिद्ध नव्हता. नंतर सद्गुरु दादा म्हणाले, ‘‘त्याला त्याच्या आईकडे देऊयात, म्हणजे तो जाईल.’’ मी त्याला त्यांच्याकडून घ्यायला गेले. तेव्हा तो माझ्याकडेही येईना. तो परत त्यांच्याकडे तोंड फिरवून त्यांना घट्ट बिलगून बसला. नंतर मी त्याला बळेच ओढून घेतले. सद्गुरु दादा जायला निघाल्यावर अनंतने त्यांना नमस्कार केला.’ – आधुनिक वैद्या (सौ.) अमृता राकेश देशमाने (आई), फोंडा, गोवा.
३ आ ६. आईविना आजोळी कोणताही त्रास न देता आनंदाने रहाणे : ‘अनंत ९ मासांचा असतांना एकदा त्याची आई त्याला आमच्याकडे ठेवून ३ दिवस आणि २ रात्र नाशिक येथे गेली होती. तेव्हा अनंतने आम्हाला काहीही त्रास दिला नाही. सर्वांसाठी ही आश्चर्यकारक गोष्ट होती. त्याला मांडीवर घेऊन झोपवायला लागत नसे.’ – सौ. अनुराधा हरीश्चंद्र निकम
३ आ ७. नवीन ठिकाणी गेल्यावर रडत असतांना श्रीकृष्णाचे चित्र दाखवल्यावर श्रीकृष्णाशी बोलून शांत होणे : ‘अनंत साडेदहा मासांचा असतांना आम्ही पर्वरी (गोवा) येथे एका साधकांच्या घरी अनंतच्या जन्मानंतर प्रथमच गेलो होतो. अनंतसाठी तेथील वातावरण नवीन होते. तेथे त्याला खेळण्यासाठी खाली सोडल्यावर तो लगेच मोठ्याने रडू लागला. मी त्याला उचलून घेतले आणि त्यांच्या घरातील भिंतीवर असलेल्या श्रीकृष्णाच्या मोठ्या चित्राकडे बोट दाखवून सांगितले, ‘‘यांच्याकडेही श्रीकृष्ण आहे.’’ नंतर अनंतने श्रीकृष्णाकडे उजव्या हाताचे बोट करत रडत रडत श्रीकृष्णाशी गप्पा मारल्या. मग त्याच्याकडे बघून तो हसू लागला आणि नंतर शांत झाला. तो काही वेळाने रडू लागला की, रडत श्रीकृष्णाशी गप्पा मारल्यानंतर शांत होत असे. असे काही वेळा झाल्यावर तो रडतांना श्रीकृष्णाशी बोलून स्वतःच स्वतःचे सांत्वन करत असल्याचे पाहून सर्वांनाच आश्चर्य वाटले.’ – आधुनिक वैद्या (सौ.) अमृता राकेश देशमाने (आई), फोंडा, गोवा.
३ इ. वय ११ मास ते १ वर्ष
३ इ १. आनंदी आणि हसतमुख : ‘अनंत नेहमी हसतमुख असतो. त्याच्याकडे पाहिल्यावर प्रसन्न वाटून ‘त्याला उचलून घ्यावे’, असे वाटते. ‘तो हसल्यावर वातावरणात आनंदाचे प्रक्षेपण होते आणि त्याच्या आनंदामुळे त्याच्या समवेत असणारेही आनंदी होतात’, असे आम्हाला जाणवते.’ – कु. अपाला औंधकर (वय १४ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा आणि सौ. दीपा अमित औंधकर, रत्नागिरी.
३ इ २. निरीक्षणक्षमता : ‘अनंत नवीन व्यक्तीचे आधी निरीक्षण करतो आणि मगच तिच्याकडे जातो किंवा जात नाही.’ – आधुनिक वैद्या (सौ.) अमृता राकेश देशमाने (आई), फोंडा, गोवा.
३ इ ३. समंजस : ‘अनंत खेळत असतांना त्याच्या हातातील खेळणे घेतले, तरीही तो शांत असतो. तेव्हा तो दुसरे खेळणे घेतो. त्याचा मोठा भाऊ राघव खेळत असतांना अनंत कधीही राघवचे खेळणे घेत नाही. तो कुठल्याच गोष्टीसाठी हट्टीपणा करत नाही.
३ इ ४. धीट : अनंत अंधाराला घाबरत नाही. रात्री एखाद्या खोलीतील दिवा बंद असला, तरीही तो न घाबरता त्या खोलीत जातो.’
– सौ. अश्विनी यज्ञेश सावंत (मावशी, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
३ इ ५. ‘त्याला सात्त्विक पदार्थ खायला आवडतात. त्याला दूरचित्रवाहिनीवरील कार्यक्रम आणि भ्रमणभाष पहाणे आवडत नाही.’ – आधुनिक वैद्या (सौ.) अमृता राकेश देशमाने (आई), फोंडा, गोवा.
३ इ ६. मोठा भाऊ कु. राघव स्वयंसूचना मोठ्याने वाचत असतांना अनंतने तेथे येऊन त्या शांतपणे ऐकणे : ‘मी राघवसाठी एका कागदावर स्वयंसूचना लिहून तो कागद त्याच्या कपाटावर चिकटवला आहे. राघव स्वयंसूचना मोठ्याने वाचतो. राघव स्वयंसूचना वाचू लागला की, अनंत ज्या खोलीत खेळत असेल, तिथे हातातील सगळी खेळणी सोडून देतो आणि जोराने रांगत राघवजवळ येऊन तेथील कपाटाला धरून राघवच्या पुढे उभा रहातो अन् शांतपणे त्याच्या स्वयंसूचना पूर्ण ऐकतो. त्याच्या स्वयंसूचना म्हणून पूर्ण होईपर्यंत तो तेथेच शांतपणे उभा रहातो. राघव स्वयंसूचना म्हणत असतांना अनंत त्याच्या खोड्या काढत नाही. अनंत असे प्रतिदिन करतो. ’ – आधुनिक वैद्या (सौ.) अमृता राकेश देशमाने (आई), फोंडा, गोवा.
३ इ ७. संतांच्या सहवासात रहायला आवडणे : ‘एकदा पू. वामन राजंदेकर (सनातनचे दुसरे बालसंत, वय ३ वर्षे), त्यांची मोठी बहीण कु. श्रिया राजंदेकर (वय १० वर्षे, आध्यात्मिक पातळी ६६ टक्के) आणि अनंत माझ्या आजी-आजोबांच्या (सौ. सुजाता अशोक रेणके आणि श्री. अशोक रेणके यांच्या) घरी आले होते. त्या वेळी मीही त्यांच्याशी खेळत होते. अनंत पू. वामन यांच्या समवेत अतिशय आनंदी दिसत होता. पू. वामन त्याला प्रेमाने हात लावत होते. पू. वामन यांनी अनंतच्या डोक्यावर हात ठेवला. त्या वेळी अनंतही प्रसन्न होता. हे पाहून आम्हाला पुष्कळ आश्चर्य वाटले. ते पहातांना आम्हाला गुरुदेवांचे स्मरण होत होते.’ – कु. अपाला औंधकर (वय १४ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा आणि सौ. दीपा अमित औंधकर, रत्नागिरी
३ इ ८. ‘त्याच्या शरिरावर जन्मापासून अजूनही नियमितपणे चंदेरी, सोनेरी आणि मोरपंखी या रंगांचे दैवी कण आढळतात. ’
– आधुनिक वैद्या (सौ.) अमृता राकेश देशमाने (आई), फोंडा, गोवा.
३ इ ९. सूक्ष्मातील जाणण्याची क्षमता : ‘आम्ही दिवाळीत एका व्यक्तीच्या घरी गेलो होतो. मला तिच्या घरी पुष्कळ दाब जाणवत होता. आम्ही अनंतला तिच्या घरी घेऊन गेल्यावर तो पुष्कळ रडू लागायचा आणि त्याला घेऊन बाहेर आल्यावर शांत व्हायचा.’ – सौ. अश्विनी यज्ञेश सावंत (चि. अनंतची मावशी, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
३ इ १०. श्रीकृष्ण आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याविषयीची ओढ
३ इ १० अ. घरात लावलेल्या श्रीकृष्णाच्या चित्राशी सतत बोलणे, त्याच्या चरणांवर डोके टेकवणे आणि त्याच्या चरणांची पापी घेणे : ‘आमच्या घरी केवळ देव्हार्यात श्रीकृष्णाचे चित्र आहे; अन्यत्र श्रीकृष्णाचे मोठे चित्र नाही. वरील प्रसंग झाल्यावर मी घरी आल्यावर एका लग्नपत्रिकेवरील श्रीकृष्णाचे चित्र अनंतला दिसेल, अशा ठिकाणी कपाटाच्या दाराला लावले. मी ते चित्र कपाटावर लावल्यावर अनंत लगेच तेथे रांगत आला. त्याने कपाटाजवळ उभे राहून श्रीकृष्णाशी पुष्कळ गप्पा मारल्या. त्याने श्रीकृष्णाच्या चरणांवर डोके टेकवले आणि त्याच्या चरणांची पापी घेतली. हे बघून माझा भाव जागृत झाला. तो खेळत असतांना अनेक वेळा एकटाच जेथे श्रीकृष्णाचे चित्र लावले आहे, तेथे रांगत जातो. तो तेथे उभा राहून त्याच्या भाषेत श्रीकृष्णाशी गप्पा मारतो आणि त्याच्या चरणांची पापी घेतो.’ – आधुनिक वैद्या (सौ.) अमृता राकेश देशमाने (आई), फोंडा, गोवा.
३ इ १० आ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र असलेला ग्रंथ आणि दैनिक ‘सनातन प्रभात’ हातांत घेण्यासाठी धडपडणे : ‘अनंतला मुखपृष्ठावर परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र असलेला ग्रंथ किंवा दैनिक ‘सनातन प्रभात’ दाखवल्यावर तो ग्रंथ किंवा दैनिक ‘सनातन प्रभात’ लगेचच स्वतःच्या हातांत ओढून घेतो आणि त्यांच्या छायाचित्राची पापी घेतो. त्याला परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र नसलेला ग्रंथ दिला, तर तो ग्रंथ हातात घेतो, बघतो आणि परत ठेवून देतो.’ – सौ. अश्विनी यज्ञेश सावंत (चि. अनंतची मावशी, आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
३ इ १० इ. अनंतला ‘श्रीकृष्ण कुठे आहे ?’, असे विचारल्यावर त्याने परात्पर डॉ. आठवले यांच्या छायाचित्राकडे बोट दाखवणे : ‘एकदा चि. अनंत आमच्या शेजारी रहाणार्या सौ. सुजाता रेणकेकाकूंच्या घरी गेला होता. तेव्हा अनंतला त्यांच्या घरात नवीन व्यक्ती दिसल्या; म्हणून तो रडू लागला. त्याचा आवाज ऐकून मी काकूंकडे गेले आणि त्याला कडेवर घेऊन त्याची समजूत काढली.
अनंत भिंतीवर असलेले श्रीकृष्णाचे चित्र, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे श्रीरामाच्या वेशातील छायाचित्र आणि कु. अपालाचे (कु. अपाला औंधकर (वय १४ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) हिचे) छायाचित्र यांच्याकडे आलटून-पालटून बघू लागला. अपालाने परात्पर गुरु डॉक्टरांचे रामाच्या वेशातील छायाचित्र त्याच्या हातात दिले. त्याने ते छायाचित्र हातात घट्ट धरले आणि तो त्यांच्याकडे एकटक बघू लागला. नंतर अपालाने त्याला ‘श्रीकृष्ण कुठे आहे ? श्रीकृष्ण दाखव बरं’, असे सांगितले. तेव्हा त्याने भिंतीवरील श्रीकृष्णाच्या चित्राकडे एकदा बघितले आणि नंतर स्वतःच्या हातातील परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राकडे बघितले. त्याने परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्रावर बोट ठेवून ‘श्रीकृष्ण येथे आहे’, असे दाखवले.
सगळ्यांना याचे पुष्कळच आश्चर्य वाटले, ‘अनंतलाही समजले आहे की, परात्पर गुरु डॉक्टर हेच श्रीकृष्ण आहेत. तेच विष्णूचे अवतार आहेत. (असे महर्षींनी जीवनाडीपट्टीमध्ये सांगितले आहे.)’ त्यानंतर तो बराच वेळ परात्पर गुरु डॉक्टरांच्या छायाचित्राकडे बघत राहिला. नंतर त्याने ते छायाचित्र कपाळाला लावून डोके टेकवून भावपूर्ण नमस्कार केला. हे बघून आम्हा सगळ्यांना पुष्कळ आनंद झाला आणि आमची भावजागृती झाली.
३ इ ११. श्री गजानन महाराजांचे छायाचित्र पाहून ‘श्री गजानन महाराज आणि प.पू. भक्तराज महाराज एकच आहेत’, हे दर्शवणार्या विविध कृती करणे
३ इ ११ अ. सनातन पंचांगातील श्री गजानन महाराजांचे छायाचित्र आणि देव्हार्यातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्र यांच्याकडे बघून टाळ्या वाजवणे अन् त्यांना नमस्कार करणे : चि. अनंत ११ मासांचा असतांना एकदा मी त्याला घेऊन त्याच्या मावशीकडे (सौ. अश्विनी यज्ञेश सावंत हिच्याकडे) गेले होते. अनंत त्याच्या भावाशी (माझा मोठा मुलगा राघव याच्याशी) रांगत लपाछपी खेळत होता. अकस्मात् त्याचे लक्ष भिंतीवरील सनातन पंचांगाकडे गेले. वर्ष २०२२ च्या सनातन पंचांगातील फेब्रुवारी मासाच्या पृष्ठावर श्री गजानन महाराज यांचे छायाचित्र आहे. अनंत त्या छायाचित्राकडे बघून टाळ्या वाजवू लागला आणि त्यांना हात जोडून नमस्कार करू लागला. नंतर तो घरातील देव्हार्यातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे बघून टाळ्या वाजवू लागला आणि नमस्कार करू लागला. असे तो आलटून-पालटून दोघांकडेही बघून टाळ्या वाजवून नमस्कार करू लागला.
३ इ ११ आ. दोन्ही छायाचित्रांकडे आलटून-पालटून बघून टाळ्या वाजवून नमस्कार करून काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करणे : नंतर तो आमचा पोशाख (माझा आणि अश्विनीचा) ओढून आमचे लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न करू लागला. तो आवाज करून आणि त्या दोन्ही छायाचित्रांकडे आलटून-पालटून बघून टाळ्या वाजवून नमस्कार करून आम्हाला दाखवत होता अन् काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होता. ‘त्याला काय म्हणायचे होते ?’, हे आम्हाला समजत नव्हते.
३ इ ११ इ. श्री गजानन महाराज आणि प.पू. भक्तराज महाराज यांच्याविषयी लक्षात आलेली सूत्रे आई अन् बहीण यांना सांगितल्यावर अनंत शांत होणे : तेव्हा माझ्या अकस्मात् लक्षात आले, ‘पू. जीजी (प.पू. भक्तराज महाराज यांच्या पत्नी) यांचे माहेर शेगाव आहे. प.पू. भक्तराज महाराज नेहमी म्हणायचे, ‘‘गजानन महाराज हे माझे सासरे आहेत.’’ त्या वेळी माझ्या हेही लक्षात आले, ‘माझ्या सासरकडचे लोक पूर्वी परभणी येथील रहिवासी असल्यामुळे पुष्कळ आधीपासून श्री गजानन महाराज यांची उपासना करतात. त्यांचे पूर्वी नेहमी शेगावला जाणे होत असे. मीही लग्नानंतर २ वेळा तेथे जाऊन आले आहे; कारण त्यांचा तसा आग्रह होता.’ मी आई आणि बहीण यांना याविषयी सांगितले. आमच्यामध्ये ही सगळी चर्चा झाल्यानंतर अनंत शांत झाला.
३ इ ११ ई. ‘श्री गजानन महाराज आणि प.पू. भक्तराज महाराज एकच आहेत’, हे अनंतला जाणवले असावे’, असे वाटून भावजागृती होणे : या प्रसंगातून आम्हाला वाटले, ‘अनंतला सांगायचे होते की, श्री गजानन महाराज आणि प.पू. भक्तराज महाराज एकच आहेत.’ तेव्हा माझ्या अंगावर रोमांच आले आणि माझा भाव जागृत झाला. माझ्या डोळ्यांतून भावाश्रू येऊ लागले. ‘अनंतला याविषयी काही सांगितले नसतांना त्याला हे कसे कळले ?’, असे मला वाटले.’
– आधुनिक वैद्या (सौ.) अमृता राकेश देशमाने (आई), फोंडा, गोवा.
४. अनंतच्या संदर्भात आलेल्या अनुभूती
४ अ. ‘अनंतला कडेवर घेतल्यावर आम्हाला पुष्कळ हलकेपणा जाणवतो.
४ आ. ‘त्याच्यामुळे आपण स्वतःलाही विसरतो आणि आपल्यातही बालकभाव जागृत होतो’, असे आम्हाला जाणवले.’
– कु. अपाला औंधकर (वय १४ वर्षे, आध्यात्मिक पातळी ६१ टक्के), महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा आणि सौ. दीपा अमित औंधकर, रत्नागिरी
४ इ. अनंतशी खेळल्यावर चैतन्य मिळाल्याचे जाणवून डोकेदुखी नाहीशी होणे : ‘एकदा मला पित्ताचा त्रास होऊन माझे डोके दुखत होते. त्या वेळी अनंत आमच्या घरी आला. मी त्याच्याशी अनुमाने ३० मिनिटे खेळले. तेव्हा माझे डोके दुखायचे थांबले आणि त्यानंतर माझे डोके दुखायचे प्रमाणही न्यून झाले. ‘मला चैतन्य मिळाले’, असे मला वाटले.’ – सौ. अक्षता रूपेश रेडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.
५. अनंतमधील स्वभावदोष : ‘हट्टीपणा
६. कृतज्ञता आणि प्रार्थना :
‘परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने इतके सुंदर बालक आमच्या घरी जन्माला आले’, याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञ आहे.
‘गुरुदेवा, ‘राघव आणि अनंत या दोघांचा सांभाळ अन् संगोपन’, ही माझी साधना आहे. ‘आपण माझ्याकडून ही साधना आपल्याला अपेक्षित अशी भावपूर्ण, परिपूर्ण आणि आनंदाने करवून घ्या. आपल्याला अपेक्षित असे मला त्यांना (राघव आणि अनंत यांना) आदर्श आणि आध्यात्मिकदृष्ट्या परिपूर्ण घडवता येऊ दे’, हीच आपल्या चरणी प्रार्थना !
– आधुनिक वैद्या (सौ.) अमृता राकेश देशमाने (आई), फोंडा, गोवा.
लेखातील सर्व सूत्रांचा दिनांक : ९.२.२०२२
६५ टक्के आध्यात्मिक पातळीच्या कु. राघव देशमाने (वय ९ वर्षे) याचे धाकटा भाऊ ६४ टक्के आध्यात्मिक पातळीचा चि. अनंत देशमाने (वय ३ वर्षे) याच्यावरील प्रेम !
१. ‘एकदा अनंतला पुष्कळ ताप होता. त्या रात्री अनंत झोपेतून उठून रडत असतांना मी अस्वस्थ होऊन काळजी करत होते. तेव्हा राघव उठून मला म्हणाला, ‘‘आई, नामजप आणि प्रार्थना कर. तो बरा होईल.’’
२. अनंत जेव्हा रात्री उठतो आणि रडतो, तेव्हा राघवही झोपेतून उठून त्याची विचारपूस करतो अन् अनंत झोपल्यानंतरच राघव झोपतो.
३. अनंत तान्हा (अडीच-तीन मासांचा) असतांना राघव त्याला स्वतः रचलेली गाणी गाऊन झोळीला झोके देऊन झोपवायचा.
४. अनंत ६ मासांचा असतांना एकदा तो काही खात नव्हता. तेव्हा मी त्याला म्हणाले, ‘‘तुला उपाशीच ठेवते.’’ त्या वेळी राघवला पुष्कळ वाईट वाटले. तो रडू लागला आणि मला म्हणाला, ‘‘आई, तो लहान बाळ आहे. त्याला उपाशी ठेवू नकोस. त्याच्याऐवजी मी उपाशी रहातो; पण त्याला खायला दे.’’
– आधुनिक वैद्या (सौ.) अमृता राकेश देशमाने, फोंडा, गोवा. (२३.१.२०२२)
सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत. |
यासोबतच बालसाधकांमधील विविध दैवी पैलू सहजतेने उलगडणारी चलचित्रे (व्हिडिओज्) स्वरूपात आपण इंटरनेटवर ‘यूट्यूब’च्या https://goo.gl/06MJck मार्गिकेवरही पाहू शकता.