पुणे महापालिकेच्या उपअभियंत्याकडून तृतीयपंथीय सुरक्षारक्षकांना मारहाण !

ओळखपत्र मागितल्याचा राग !

प्रतिकात्मक चित्र

पूर्वीही मारहाण केली म्हणून केले होते निलंबित !

पुणे –  पुणे महापालिकेने ५० कंत्राटी तृतीयपंथीय सुरक्षारक्षकांची भरती केली आहे. उपअभियंता महापालिकेत आलेले असतांना एका तृतीयपंथी सुरक्षारक्षकाने त्यांच्याकडे ओळखपत्राची मागणी केली. त्यावर उपअभियंत्यांनी शिवीगाळ करत ‘मी गेली ३० वर्षे झाली महापालिकेत आहे. मला ओळखत नाहीस का ?’, असे म्हणत मारहाण केली. त्याच्या साहाय्यासाठी आलेल्या दोघांनाही मारहाण केली. या प्रकरणी ‘गुन्हा नोंद होऊ नये’, यासाठी काही वरिष्ठ अधिकारी आणि संघटना यांनी मध्यस्ती केली; परंतु या घटनेचा अहवाल अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी.पी. यांनी सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

वरिष्ठ अधिकार्‍यासही मारहाण !

याच उपअभियंत्यांनी वैकुंठ स्मशानभूमीत महापालिकेतील एका विभाग प्रमुखांना मारहाण केली होती. त्या प्रकरणामध्ये त्यांना निलंबित केले होते. जानेवारीमध्ये त्यांना पुन्हा सेवेमध्ये घेण्यात आले. आता त्यांनीच तृतीयपंथी सुरक्षारक्षकांना मारहाण केली आहे. (निलंबित करूनही स्वतःच्या चुकीची जाणीव न होणार्‍या अधिकार्‍यांना कठोर शिक्षा होणे आवश्यक ! – संपादक)