छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयीची काही सप्रमाण तथ्ये

‘एखाद्या मध्ययुगीन काळातील राजाच्या ऐवजी आधुनिक काळातील लोकसभा निवडणुकीचा उमेदवार वाटावा’, असे छत्रपती शिवाजी महाराज रंगवणार्‍या स्वयंघोषित इतिहास तज्ञांसाठी महाराजांविषयीची काही सप्रमाण तथ्ये थोडक्यात येथे देत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज

१. हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे कट्टर शत्रूच त्यांचे व्याही (शिर्के, जाधव आणि निंबाळकर) आहेत; कारण त्या काळातील व्यक्तींना जातव्यवस्था तोडण्याचे आधुनिक नीतीमूल्य ठाऊकच नव्हते.

२. वैदिक हिंदुत्व जपण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वतःचे आणि स्वतःच्या मुलांचे मौजी बंधन केले, तसेच त्यांची नावे हिंदूंच्या प्रमुख देवता शंकर आणि राम यांच्यावरून शंभू अन् राजाराम ठेवली. (स्वतः छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव ‘शिवाईदेवी’वरून ठेवलेले आहे, हे हिंदु देवतांना शिव्या देणार्‍या किंवा छत्रपती शिवरायांच्या विरुद्ध हिंदु देव अशी लढाई लावणार्‍या द्वेष्ट्यांनी लक्षात ठेवावे.)

३. ‘शिवाजी मशिदी भ्रष्ट करतो आणि मुसलमानांना त्रास देतो’, असे म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज यांना धडा शिकवण्यासाठी आदिलशहाने अफझलखानाला पाठवले.

४. बळजोरीने मुसलमान बनवलेल्या हिंदूंची ‘घरवापसी’ (स्वधर्मात परत घेणे) केली, उदाहरणार्थ नेताजी पालकर (१९ जून १६७६) आणि गंगाधर रंगनाथ कुलकर्णी (वर्ष १६८४).

५. मुसलमानी आक्रमणामुळे कैक शतके बंद पडलेला हिंदु राजांचा राज्याभिषेक विधी पुन्हा चालू केला.

६. मुसलमानी फारसी आणि अरबी भाषेला विरोध म्हणून वयाच्या १६ व्या वर्षी संस्कृत भाषेत मुद्रा निर्माण केली. यासह स्वभाषेच्या उन्नतीसाठी राज्याभिषेकाच्या वेळी ‘राज्यव्यवहार कोष’ निर्माण केला.

७. मंदिर पाडून मशीद निर्माण केलेल्या ठिकाणीच पुन्हा मंदिरे निर्माण केली, उदाहरणार्थ तिरुवण्णामलाईचे शिव मंदिर आणि समुत्तीर पेरूमल विष्णु मंदिर.

८. छत्रपती शिवाजी महाराज यांनी शत्रू स्त्रियांचाही आदर ठेवला; परंतु शाहिस्तेखानावर छापा घालतांना स्त्री-पुरुष असा भेद न करता रस्त्यात आलेल्या सरसकट शत्रूला कापून काढण्याचे व्यवहार ज्ञान ठेवले.

९. मंत्रीमंडळात कसलेही जातीय आरक्षण आणि सर्वधर्मसमभाव न ठेवता ८ पैकी ७ मंत्री ब्राह्मण अन् सेनापती मराठा नेमला. (हीच परंपरा त्यांच्या वंशजांनीही चालूच ठेवली.)

१०. ‘सैन्यात मुसलमान ठेवून विजय कसा मिळेल ?’, असा प्रश्न व्यंकोजी राजांना, म्हणजे त्यांच्या भावाला एका पत्राद्वारे विचारला. (अस्सल पत्र उपलब्ध)

११. छत्रपती शिवाजी महाराज यांनी मशिदीला नव्याने इनाम (निधी) दिल्याचे एकही उदाहरण नाही. त्याउलट मंदिर आणि मठ यांना नव्याने इनाम दिल्याची अनेक उदाहरणे आहेत.

१२. स्वतः छत्रपती संभाजी महाराज ‘बुधभूषण’ या ग्रंथात आपल्या वडिलांचे वर्णन प्रभु श्रीरामाच्या कुळातील आणि श्रुति, स्मृति मानणारे अन् ‘म्लेंच्छक्षयदीक्षित’ असाच करतात.

१३. वर्ष १६६७ मध्ये गोव्याच्या व्हॉईसरॉयने ‘बारदेशात फक्त कॅथॉलिक ख्रिस्ती रहातील’, असा आदेश काढला. त्यामुळे बारदेशात फक्त ३ सहस्र हिंदु शिल्लक राहिले होते; परंतु छत्रपती शिवाजी महाराज यांनी गोव्यावर स्वारी केली, तेव्हा मराठ्यांच्या तावडीत ४ ख्रिस्ती पाद्री सापडले. छत्रपती शिवाजी महाराज यांनी त्यांना ‘हिंदु होता का ?’, असे विचारल्यावर ख्रिस्ती पाद्र्यांनी नकार देताच त्यांची गर्दन (गळा) मारून छत्रपती शिवाजी महाराजांनी ती मुंडकी व्हॉईसरॉयला भेट म्हणून पाठवली. त्यानंतर व्हॉईसरॉयने ‘बारदेशात फक्त कॅथॉलिक ख्रिस्ती रहातील’, ही आज्ञा मागे घेतली.

– श्री. तुषार दामगुडे, पुणे

(श्री. तुषार दामगुडे यांच्या फेसबुकवरून साभार)