रामटेकडी (पुणे) येथील प्रकल्पाला कचरा डेपोचे स्वरूप !

पालिकेचा कचर्‍यापासून वीजनिर्मिती प्रकल्प हवेतच !

प्रतिकात्मक चित्र

पुणे – कचर्‍यापासून वीज निर्मितीची घोषणा करून महापालिकेने रामटेकडी येथे प्रकल्प उभारला होता. साडेसातशे टन क्षमतेचा हा प्रकल्प कार्यान्वित होऊनही अद्याप वीजनिर्मिती होऊ शकली नाही. त्याऐवजी सध्या येथे बॉयलरचे इंधन सिद्ध केले जात आहे; मात्र या प्रकल्पाच्या आवारात सहस्रो टन कचरा साठल्याने याला कचरा डेपोचे स्वरूप प्राप्त झाले आहे. (याविषयी प्रशासनाने जनतेला उत्तर देणे अपेक्षित आहे ! – संपादक) कचर्‍यापासून वीजनिर्मिती करण्याच्या प्रकल्पासाठी वर्ष २०१२-१३ पासून प्रयत्न चालू होते. वर्ष २०१९ मध्ये या प्रकल्पाला संमती देतांना संबंधित आस्थापनाने पहिल्या वर्षभरात बॉयलरसाठीच्या इंधनाची निर्मिती करावी, तसेच राज्य वीज नियामक आयोग आणि संबंधित कर्ज उपलब्धतेची प्रक्रिया पूर्ण करून एक वर्षाने प्रत्यक्ष वीजनिर्मिती चालू करावी, अशी अट घातली होती. त्यानुसार पहिल्या वर्षी आस्थापनाने ३०० टन कचर्‍यावर प्रक्रिया करून इंधन निर्मितीचा प्रकल्प चालू केला.

त्यानंतर कर्ज आणि वीज नियामक आयोगाकडे पाठपुरावाही केला. वीज नियामक आयोगाने २०२४ या वर्षी अंतिम संमती दिली; मात्र क्षमतेहून अल्प कचर्‍यावर प्रक्रिया केल्याप्रकरणी संबंधित आस्थापनाला आतापर्यंत अनेकदा नोटीस दिली, तसेच त्यांच्याकडून १९ लाख रुपये दंडही वसूल केला आहे. डिसेंबर २०२५ पर्यंत या प्रकल्पाच्या माध्यमातून प्रत्यक्ष वीजनिर्मिती करण्याचे संबंधित आस्थापनाला आदेश दिले आहेत, असे घनकचरा व्यवस्थापन विभागाचे अभियंता कमलेश शेवते यांनी सांगितले.