पिंपरी (जिल्हा पुणे) येथे नवजात बालकांची विक्री करणार्‍या ६ महिलांच्या टोळीस अटक !

यापूर्वी ५ नवजात बालकांची विक्री !

प्रतिकात्मक चित्र

पिंपरी (जिल्हा पुणे) – नवजात बालकांची विक्री करणार्‍या टोळीला वाकड पोलिसांनी अटक केली आहे. या प्रकरणी ६ महिलांना अटक करून न्यायालयाने त्यांना १६ एप्रिल या दिवसापर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. ६ आरोपी महिलांमध्ये १ परिचारिका असून ती मुख्य सूत्रधार असल्याचे पोलिसांच्या अन्वेषणातून समोर आले आहे. (आर्थिक लाभाकरता नवजात बालकांची विक्री करणार्‍या महिलांना कठोर शिक्षा होणे आवश्यक आहे ! – संपादक)

महिला आरोपींमधील एक परिचारिका असून ती खासगी रुग्णालयामध्ये काम करते. आर्थिक परिस्थिती हालाखीची असलेल्या पालकांना हेरून त्यांना आर्थिक आमीष दाखवून ती नवजात बालक विकत घ्यायची. तेच बालक ती तिच्या टोळीच्या साहाय्याने मूल-बाळ नसलेल्या पालकांना विकून त्यांच्याकडून ५ ते ७ लाख रुपये घ्यायची. या टोळीने आधीच ५ नवजात बालकांची विक्री केल्याचे अन्वेषणातून निष्पन्न झाले आहे. (नवजात बालकाची विक्री करणार्‍या माता-पित्यांनाही शिक्षा होणे आवश्यक आहे ! – संपादक)

वाकड पोलिसांना नवजात बालक विकण्यासाठी आणण्यात येणार आहे, अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार १२ एप्रिल या दिवशी दुपारी २ वाजता ६ महिला रिक्शातून आल्या. त्यांच्यावर संशय बळावल्याने पोलिसांनी त्यांना कह्यात घेऊन अधिक चौकशी केली असता हे प्रकरण उघडकीस आले.