पुणे येथील श्री. समीर चितळे (वय ५० वर्षे) गंभीर रुग्णाईत असतांना त्यांनी आणि त्यांच्या कुटुंबियांनी पदोपदी अनुभवलेली अपार गुरुकृपा !

६.४.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात आपण ‘श्री. समीर चितळे रुग्णाईत असतांना त्यांची पाठोपाठ २ अवघड शस्त्रकर्मे होऊनही ‘गुरुकृपेने दोन्ही शस्त्रकर्मे व्यवस्थित कशी पार पडली ? आधुनिक वैद्यांच्या माध्यमातून गुरुकृपा कशी कार्यरत होती ?’, हे पाहिले. आता या भागात आपण ‘श्री. समीर चितळे यांचे झालेले तिसरे शस्त्रकर्म आणि गुरुकृपेने ते त्यातूनही कसे व्यवस्थित बाहेर पडले ?’, हे पहाणार आहोत. 

भाग १ वाचण्याकरिता येथे क्लिक करा: https://sanatanprabhat.org/marathi/781291.html

(भाग २)

श्री. समीर चितळे

६. एकापाठोपाठ आलेल्या समस्या आणि गुरुकृपेने त्यांचे झालेले निवारण !

६ अ. यजमानांना बोलणे आणि चालणे यांसाठी त्रास होऊ लागल्यामुळे त्यांची तपासणी केल्यावर ‘त्यांचे ‘कृत्रिम कवटी’ बसवण्यासाठी शस्त्रकर्म करावे लागेल’, असे आधुनिक वैद्यांनी सांगणे : २६.३.२०२१ पासून अकस्मात् यजमानांना बोलतांना अडचण येऊ लागली. त्यांचे बोलणे कुणालाच कळत नव्हते. चालतांना त्यांचा तोलही जात होता. होळी पौर्णिमेपर्यंत हा त्रास अधिकच वाढला; म्हणून पुन्हा यजमानांच्या तपासण्या केल्यावर लक्षात आले, ‘आधीच्या शस्त्रकर्माच्या वेळी डोक्याच्या कवटीचे हाड काढून टाकावे लागले होते. तिथे मेंदूतील पाणी (‘स्पायनल फ्लुईड’) साचले असून त्याचा दाब मज्जारज्जूवर आला होता. हर्निएशन (Herniation), म्हणजे ‘डी कॉम्प्रेशन’ शस्त्रकर्माच्या वेळी जे हाड काढून टाकले, तिथे दोन मास हाड नव्हते. त्यामुळे लहान मेंदूला आधार न मिळाल्याने तो अधांतरी राहिला होता. त्याचा दाब मज्जारज्जूवर येऊन तिथे पाणी साचत होते. आधुनिक वैद्यांनी यावर ‘क्रेनिओप्लास्टी’ (Creneoplasty) हे शस्त्रकर्म करावे लागेल’, असे सांगितले. या शस्त्रकर्मात कृत्रिम कवटी (artificial bone) बसवली जाते.

६ आ. देवाच्या कृपेने स्वामी समर्थभक्त श्री. म्हाळंक यांनी सांगितलेल्या वेळेत शस्त्रकर्म होणे आणि आधुनिक वैद्यांसाठीही अशा प्रकारचे शस्त्रकर्म करण्याची पहिलीच वेळ असूनही शस्त्रकर्मानंतर यजमानांच्या प्रकृतीत सुधारणा होणे : ‘ही ‘प्लास्टिक सर्जरी’ व्यवस्थित व्हावी’, यासाठी स्वामी समर्थभक्त श्री. म्हाळंक यांनी आम्हाला योग्य वेळ सुचवली. आम्ही आधुनिक वैद्यांना ती वेळ सांगितल्यावर यजमानांची स्थिती पाहून अन्य शस्त्रकर्मांच्या वेळा असूनही त्यांनी आम्ही सांगितलेल्या वेळेत शस्त्रकर्म केले. १.४.२०२१ या दिवशी हे शस्त्रकर्म झाले. हे शस्त्रकर्म गुंतागुंतीचे असून त्यासाठी साडेचार घंटे वेळ लागला. हे शस्त्रकर्म करणार्‍या आधुनिक वैद्यांसाठीही अशा प्रकारचे शस्त्रकर्म करण्याची ही पहिलीच वेळ होती; मात्र शस्त्रकर्मानंतर यजमानांचे बोलणे आणि शरिराचा तोल सांभाळता येणे, यांमध्ये सुधारणा झाली. आधुनिक वैद्यांनाही याचे पुष्कळ नवल वाटले.

७. आरोग्य पूर्ववत् होण्यासाठी मिळालेले आयुर्वेदीय उपचार ! 

सौ. मोहिनी समीर चितळे

तिसरे शस्त्रकर्म झाल्यानंतर काही दिवसांनी यजमानांना रुग्णालयातून घरी सोडले. त्यानंतर त्यांचे आरोग्य पूर्ववत् होण्यासाठी नाथ संप्रदायानुसार साधना करणारे आणि नाडी परीक्षण करणारे आयुर्वेदीय वैद्य समीर जमदग्नी यांनी यजमानांवर विविध प्रकारचे औषधोपचार केले. वैद्य जमदग्नी यांच्या सकारात्मक आणि आध्यात्मिक स्तरावर दिलेल्या आधारामुळे केवळ ३ मासांतच यजमानांच्या प्रकृतीत सुधारणा झाली.

८. यजमानांनी नामजपादी उपाय स्वतः करायला आरंभ करणे 

‘यजमानांना थोडे बरे वाटायला लागल्यावर मी त्यांना झालेल्या आजाराविषयी समजावून सांगितले. मी त्यांना म्हणाले, ‘‘यातून लवकर बरे वाटण्यासाठी सद्गुरु सत्यवान कदम यांनी सांगितलेले नामजपाचे उपाय आतापर्यंत माझ्या आई-वडिलांनी (सौ. राजश्री गोंधळेकर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) आणि श्री. रवींद्र गोंधळेकर (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांनी) केले असून तुम्ही स्वतः हा नामजप केला, तर त्या नामजपाची परिणामकारकता वाढेल.’’ आता जून मासापासून यजमान दिवसातून ३ वेळा नामजपादी उपाय करत आहेत.’

– सौ. मोहिनी समीर चितळे (श्री. समीर चितळे यांच्या पत्नी), पुणे (५.३.२०२२)

९. अनुभूती 

मेहुणे श्री. समीर यांची प्रकृती अत्यवस्थ झाल्यावर गुरुदेवांचा धावा करणे, तेव्हा त्यांचे विशाल रूपात दर्शन होणे आणि त्यांनी सूक्ष्मातून ‘श्री. समीर बरे होणार आहेत’, असे सांगून आश्वस्त करणे : ‘१२.१.२०२१ या दिवशी श्री. समीर यांची प्रकृती पुष्कळ अत्यवस्थ झाली होती. तेव्हा मी सतत गुरुदेवांचा धावा करत होते. मी प.पू. गुरुदेवांच्या चरणी श्री. समीर यांना अर्पण केले आणि ‘तुम्हीच त्यांचा सांभाळ करा’, अशी कळवळून प्रार्थना केली. तेव्हा श्री. समीर यांच्या पलंगाच्या मागे मला प.पू. गुरुदेव विशाल रूपामध्ये दिसले. मी गुरुदेवांना प्रार्थना केली, ‘श्री. समीर यांना यातून बाहेर काढा.’ तेव्हा सूक्ष्मातून गुरुदेव मला म्हणाले, ‘कुठे आहे समीर ? तो बरा झाला आहे. बघ, तो पलंगावर कुठे आहे ?’ त्यांचे बोलणे ऐकून मी श्री. समीर यांच्याकडे पाहिले. तेव्हा मलाही क्षणभर ‘श्री. समीर बरे झाले आहेत’, असे दिसले. प.पू. गुरुदेव पुढे म्हणाले, ‘तू काळजी करू नकोस. तो लवकरच बरा होईल.’

‘या अनुभूतीत मी किती काळ होते ?’, हे मला कळले नाही. माझ्या डोळ्यांतून कृतज्ञतेने भावाश्रू येऊन मला शांत आणि आश्वस्त वाटले. मी माझ्या दोन्ही बहिणींना (सौ. मोहिनी चितळे आणि सौ. श्रुतिका लेले यांना) भ्रमणभाष करून ही अनुभूती सांगितली आणि ‘आपण केवळ कृतज्ञताभावात राहूया’, असे सांगितले.’

– वैद्या सुश्री (कु.) कल्याणी गोंधळेकर (श्री. समीर चितळे यांची मेहुणी), पुणे (५.३.२०२२)

१०. दोन मासांत ‘फिजिओथेरपी’, औषधोपचार आणि नामजपादी उपाय यांमुळे यजमानांच्या प्रकृतीत सुधारणा होणे

‘२८.१.२०२१ या दिवशी यजमानांना (श्री. समीर चितळे यांना) रुग्णालयातून घरी सोडले. घरी आल्यानंतर ‘फिजिओथेरपी’चे उपचार घेत असतांना यजमान एकेक पाऊल टाकत असतांना माझ्याकडून ‘परम पूज्य डॉक्टर, परम पूज्य डॉक्टर’, असा नामजप होत असे. रामनाथी आश्रमातून संतांनी सांगितलेले सर्व उपाय नियमितपणे चालू होते. यजमानांना ‘स्पंजिंग’ करतांना आम्ही त्या पाण्यात खडे मीठ आणि गोमूत्र अर्क वापरत होतो. फेब्रुवारी आणि मार्च या दोन मासांत ‘फिजिओथेरपी’ आणि औषधोपचार यांमुळे यजमानांच्या प्रकृतीत चांगली सुधारणा झाली.

११. वेगवेगळ्या माध्यमांतून अनुभवलेली गुरुकृपा !

११ अ. ज्योतिष अभ्यासक विद्यावाचस्पती श्री. श्याम सावजी यांनी ‘गुरुकृपेमुळे मोठे गंडांतर टळले’, असे सांगणे : ज्योतिष अभ्यासक विद्यावाचस्पती (पी.एच्डी.) श्री. श्याम सावजी यांनी यजमानांच्या जन्मकुंडलीचा अभ्यास करून सांगितले, ‘‘गुरुकृपेने मोठे गंडांतर टळले’, असे पत्रिकेवरून दिसत आहे. पत्रिकेत त्यांच्या मृत्यूस्थानी गुरु आहे. गुरु ज्या स्थानामध्ये असतात, त्याचा ते नाश करतात. त्यामुळे मृत्यूचा नाश झाला, म्हणजेच अपमृत्यू टळला. गुरूची दृष्टी भाग्यस्थानावर असल्यामुळे त्यांचे आरोग्य पूर्ववत् होत आहे.’’ त्यानंतर ते मला म्हणाले, ‘‘ताई, तुम्हाला चित्रात दाखवतात, त्याप्रमाणे गुरु आशीर्वादाच्या मुद्रेत दिसले नाहीत, तरी ते वेळोवेळी वेगवेगळ्या व्यक्तींच्या माध्यमातून तुम्हाला साहाय्य करतील.’’ प्रत्यक्षात ‘आम्ही सनातन संस्थेच्या मार्गदर्शनानुसार साधना करतो’, हे त्या ज्योतिष अभ्यासकांना ठाऊक नाही.

११ आ. तिसरे शस्त्रकर्म झाल्यावर यजमानांची प्रकृती सुधारत जाऊन ती पूर्ववत् होणे : सर्वसाधारणतः ‘मेंदूच्या आजारामध्ये व्यक्तींची प्रकृती पूर्ववत् होत नाही’, असा अनुभव आहे; मात्र यजमानांचे तिसरे शस्त्रकर्म झाल्यापासून त्यांच्यात चांगली सुधारणा झाली. ‘यजमानांच्या लहान मेंदूच्या ७० टक्के भागाला इजा होऊनही यजमानांचे आरोग्य पूर्ववत् होणे’, ही केवळ गुरुकृपाच आहे.

११ इ. संत आणि इतर सर्व यांचे पुष्कळ सहकार्य लाभणे : ज्योतिष अभ्यासकांनी सांगितल्याप्रमाणे आम्हाला वेळोवेळी सनातन संस्थेचे संत, स्वामी समर्थभक्त श्री. म्हाळंक, आधुनिक वैद्य, परिचारिका, ‘फिजिओथेरपी’ करणारे, यजमानांच्या आस्थापनातील अधिकारी, तसेच इतर हितचिंतक यांचे अमूल्य साहाय्य, मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभले.

११ ई. यजमानांचे सहकारी श्री. प्रसाद खरे यांनी ‘यजमानांचे आरोग्य पूर्ववत् व्हावे’, यासाठी केलेली उपासना : श्री. प्रसाद खरे त्यांना वेळ मिळेल, तेव्हा यजमानांना भेटण्यासाठी रुग्णालयात येत होते. ‘यजमानांना लवकर स्वास्थ्य लाभावे’, यासाठी त्यांनी श्री गजानन महाराज यांच्या ‘श्री गजाननविजय’ या ग्रंथाचे पारायण करून गजानन महाराज यांचे छायाचित्रही पाठवले.

११ उ. मुलगा आणि यजमान नोकरी करत असलेल्या आस्थापनांचे लाभलेले अनमोल सहकार्य आणि त्यांच्या आस्थापनांनी घेतलेली पितृवत् काळजी !

११ उ १. मुलगा काम करत असलेल्या खाजगी आस्थापनाने केलेले सहकार्य ! : माझा मुलगा (श्री. चिन्मय चितळे, वय २४ वर्षे) हा काम करत असलेल्या आस्थापनाने त्याला पूर्ण सहकार्य केले. संपूर्ण २५ दिवसांत त्यांनी त्याला कामाविषयी काही न सांगता केवळ आधारच दिला. नंतरही वेळोवेळी वडिलांच्या तपासण्यांसाठी जातांना त्याला आवश्यकतेनुसार पूर्णवेळ किंवा अर्धवेळ सुटी दिली. वडिलांची प्रकृती सुधारल्यानंतर त्यांनी हळूहळू त्याला ‘शिफ्ट ड्युटी’ दिली.

११ उ २. ‘अल्फा लावल’ या यजमानांच्या आस्थापनाने केलेले बहुमूल्य सहकार्य आणि पितृवत् घेतलेली काळजी ! : यजमानांच्या या आजारपणाच्या संपूर्ण काळात ‘अल्फा लावल’ आस्थापनाने आर्थिक बाजू व्यवस्थित सांभाळली. यजमानांच्या प्रत्येक शस्त्रकर्माच्या वेळी आस्थापनाचे अधिकारी श्री. अवधूत मुसळे येत असत आणि शस्त्रकर्माचे देयक देऊन जात असत. यजमानांच्या सर्व उपचारांचा जवळपास १५ लक्ष रुपये व्यय आला. त्यांतील बारा लक्ष रुपये व्यय आस्थापनाने दिला !

११ उ ३. ‘अल्फा लावल’ आस्थापनाने यजमानांना एक वर्षाची रजा मंजूर करणे आणि त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी प्रतिदिन आस्थापनात येण्याची अनुमती देणे : आस्थापनाने यजमानांनी १० वर्षे केलेले काम जाणून त्यांना एक वर्षाची ‘मेडिकल’ रजा मंजूर केली. यजमानांनी १० वर्षे नोकरी करतांना न्यूनतम रजा घेऊन १२० दिवसांच्या रजा शिल्लक ठेवल्या होत्या. यजमानांना थोडे बरे वाटू लागल्यावर जून मासात त्यांनी प्रतिदिन २ घंटे आस्थापनात येण्याविषयी विचारले असता आस्थापनाने त्यांना होकार दिला. प्रत्यक्षात ‘तेव्हा ते काहीही काम करू शकणार नाहीत’, हे आस्थापनालाही ठाऊक होते; परंतु ‘त्यांचा आत्मविश्वास वाढून त्यांना उभारी मिळावी. ते आजारातून लवकर बरे व्हावेत’, यासाठी आस्थापनाने त्यांना २ घंटे आस्थापनात येण्याची अनुमती दिली. आस्थापनाने यजमानांना ‘चालणे, बसणे, जिना चढणे इत्यादी कृती करतांना साहाय्य व्हावे’, यांसाठी २ मास यजमानांसह मलाही येण्यास संमती दिली.

आस्थापन आणि सहकारी यांच्या सहकार्याने जून २०२१ पासून जानेवारी २०२२ पर्यंत हळूहळू एक एक पाऊल पुढे जाऊन वर्ष फेब्रुवारी २०२२ मध्ये यजमान कामावर रुजू झाले. ‘खाजगी आस्थापन आणि कोरोनाचा काळ असूनही अशा प्रकारे आधार मिळणे’, ही केवळ अन् केवळ गुरुकृपाच आहे !

१२. श्री. समीर चितळे आणि त्यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेली कृतज्ञता !

१२ अ. श्री. समीर चितळे (वय ५० वर्षे), पुणे

१२ अ १.‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेमुळेच गंभीर दुखण्यातून सुखरूप बाहेर येता आले’, असे वाटणे : ‘गुरुदेव, मी रुग्णालयातून घरी आल्यावरही झोपलेल्या स्थितीतून उठून बसतांना किंवा कूस पालटतांनाही मला फार गरगरायचे. तेव्हा मला मळमळून उलटीही होत असे. मला आधार घेऊन ३० सेकंद उभे रहाणेही जमत नसे. रुग्णाईत झाल्यावर मला साध्या सोप्या कृतीही करणे अशक्य होऊन मी परावलंबी झालो होतो. आरंभी मला हे स्वीकारणे कठीण झाल्यामुळे माझी चिडचिड होत असे. माझी शारीरिक स्थिती अतिशय बिकट झाली होती. अशा स्थितीत व्यक्ती निराशेत जाऊ शकते.

असे असूनही केवळ गुरुकृपा आणि कुटुंबीय अन् सहकारी यांचे सहकार्य यांमुळे मला या स्थितीतून बाहेर पडता आले. गुरुदेव, आपल्याच कृपेमुळे मी या संकटातून बाहेर पडू शकलो. माझ्या सासू-सासर्‍यांनी (सौ. राजश्री गोंधळेकर (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के) आणि श्री. रवींद्र गोंधळेकर (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) यांनी) माझ्यासाठी उपायांचे नामजप केले. आता मी ते नामजप करण्यास आरंभ केला आहे. गुरुदेव, आपल्याच कृपेने मी आता ‘सकाळी देवपूजा करणे, नामजप करणे, प्राणायाम करणे, सकाळी ९ ते संध्याकाळी ५ या कालावधीत कार्यालयातील कामे करून घरी आल्यावर पायी चालणे’ इत्यादी कृती करू शकत आहे. गुरुदेवा, हे सर्व तुम्हीच माझ्याकडून करून घेत आहात !

१२ अ २. कृतज्ञता आणि प्रार्थना : गुरुदेवा, तुमच्या या कृपेसाठी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे. माझी आपल्या चरणी शरणागतीपूर्वक एकच प्रार्थना आहे, ‘पुढील काळात आपण माझ्याकडून साधना करून घ्या. मला आणि कुटुंबियांना जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त होता येऊ दे अन् आमच्या या मनुष्य जन्माचे सार्थक होऊ दे !’

१२ आ. श्री चिन्मय चितळे (श्री. समीर यांचा मुलगा), पुणे

१२ आ १. वडिलांजवळ रात्री रुग्णालयात थांबत असतांना ‘देव समवेत आहे’, असे जाणवून भीती न वाटणे : ‘बाबांना रुग्णालयात भरती केल्यावर दुसर्‍या दिवशी मी श्री स्वामी समर्थभक्त श्री. म्हाळंक यांच्या मठात श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी गेलो होतो. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘बाबांना सांग, ‘भिऊ नकोस, मी (श्री स्वामी समर्थ) तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ त्यांच्या पलंगाजवळ त्यांच्या समवेत बसले आहेत.’’ तेव्हापासून रात्री रुग्णालयात थांबतांना मला कधीही भीती वाटली नाही. ‘देव सतत आपल्या समवेत आहे’, असे वाटून मला आधार वाटायचा.’

१२ इ. श्री. रवींद्र गोंधळेकर (श्री. समीर यांचे सासरे, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ७९ वर्षे), पुणे

१२ इ १. ‘या संकटातून गुरुदेव बाहेर काढणारच आहेत’, अशा दृढ श्रद्धेमुळे श्री. समीर यांच्यासाठी नामजप करतांना कुठलाही ताण न जाणवणे आणि अनेक घंटे बसून उपायांचा नामजप करू शकणे : ‘३१.१२.२०२० या दिवशी श्री. समीर यांचे स्थानांतर सातार्‍याहून पुणे येथे झाले नसते, तर काय झाले असते ?’, या विचारानेच माझ्या जिवाचा थरकाप झाला. ‘या संकटातून गुरुदेव श्री. समीर यांना बाहेर काढतील’, अशी माझी श्रद्धा असल्यामुळे श्री. समीर यांच्यासाठी सद्गुरूंनी सांगितलेले उपायांचे नामजप करतांना माझ्या मनात कुठल्याही प्रकारचा ताण किंवा काळजी नव्हती. गुरुदेव, माझी एका ठिकाणी बसून इतका वेळ नामजप करण्याची प्रकृती नसतांनाही तुम्हीच ते नामजप माझ्याकडून शांतपणे आणि सहजतेने करून घेतले. सर्व नामजपादी उपायांसाठी अंदाजे ६ घंटे वेळ लागत असे. त्यामुळे माझ्यासाठी ही मोठी अनुभूतीच आहे.

‘हे गुरुदेवा, ‘तुम्ही सर्व साधकांसाठी स्थुलातून आणि सूक्ष्मातून किती करत आहात !’, हे आम्ही अज्ञानी जीव समजू शकत नाही. ‘हे गुरुदेवा, ‘क्षणोक्षणी तुम्हीच आम्हा सर्वांचे रक्षण करत आहात’, याबद्दल तुमच्या चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी ती अल्पच आहे.’

१२ ई. सौ. राजश्री गोंधळेकर (श्री. समीर यांच्या सासूबाई, आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ७४ वर्षे), पुणे

१२ ई १. ‘सर्व गोष्टी बुद्धीच्या पलीकडील असून कृतज्ञतेला शब्द अपुरे आहेत’, असे वाटणे : ‘गुरुदेव, श्री. समीर यांच्यासाठी नामजप करत असतांना माझ्याकडून तो प्रेमाने आणि आर्ततेने होत असे. मला आतून शांत वाटून गुरुकृपा अनुभवता येत होती. केवळ शरणागत आणि कृतज्ञता भावात रहाण्याव्यतिरिक्त आमच्या हातात काहीच नाही. कर्ता-करविता आपणच आहात, गुरुदेव ! आपल्याच कृपेमुळे श्री. समीर यांना पुनर्जन्म मिळाला आहे. हे सर्व बुद्धीच्या पलीकडचे आहे, त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला शब्दही अपुरेच आहेत.’

१२ उ. सौ. श्रुतिका लेले (श्री. समीर यांची मधली मेहुणी), जळगाव

१२ उ १. आजारी सासूबाईंचे सर्व करावे लागत असणे आणि परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेमुळे मुलींनी आजीची सेवा करण्याचे दायित्व घेतल्यामुळे बहिणीच्या साहाय्यासाठी जाता येणे : ‘माझ्या सासूबाई आजारी असून त्यांचे सर्वच करावे लागते. असे असूनही श्री. समीर यांच्या आजारपणाचे गांभीर्य लक्षात घेऊन माझ्या दोन्ही मुली (कु. स्नेहा (वय २० वर्षे) आणि कु. स्निग्धा (वय १५वर्षे)) मला म्हणाल्या, ‘‘आई, तू इथली काळजी करू नकोस. आम्ही आजीचे सर्व करतो. तू मावशीच्या साहाय्याला जा.’’ त्यामुळे मला बहिणीच्या साहाय्यासाठी जाता आले. ‘हे गुरुदेवा, माझ्या कुटुंबियांना आपणच बुद्धी दिलीत’, त्यासाठी कृतज्ञता !

१२ उ २. परात्पर गुरु डॉक्टरांच्या कृपेने श्री. समीर रुग्णाईत असतांना बहिणीला आधार देऊन श्री. समीर यांची सेवा करण्यासाठी बळ मिळणे : श्री. समीर यांना या आधी कधीही रुग्णाईत झालेले आम्ही पहिले नाही. ‘त्यांना एवढे गंभीर स्वरूपाचे दुखणे होईल’, असे आम्हाला स्वप्नातही वाटले नव्हते. ते रुग्णाईत असतांना २० दिवस मला त्यांची सेवा करण्याची संधी मिळाली. त्यांना अशा स्थितीत पाहून माझ्या अंगातले बळच गेले; परंतु या स्थितीत बहिणीला (सौ. मोहिनी चितळे यांना) आधार देण्याची अधिक आवश्यकता होती. केवळ गुरुकृपेने मला त्यासाठी बळ मिळाले. ‘श्री. समीर गुंगीत जाऊ नयेत’, यासाठी ‘त्यांना थोड्या थोड्या वेळाने उठवून त्यांच्याशी बोला’, असे आधुनिक वैद्यांनी सांगितले होते. त्यांना विश्रांतीची आवश्यकता असतांना त्यांना उठवावे लागते; म्हणून त्यांना उठवतांना माझ्या मनाचा संघर्ष होत असे. त्यांना अन्नही जात नसे. श्री. समीर यांची स्थिती पाहून मला काळजी वाटत असे. या स्थितीत ‘देवच (परात्पर गुरु डॉ. आठवले) आपल्याला आणि त्यांना (श्री. समीर यांना) बळ देत असून योग्य ती कृती करून घेत आहे’, याची मला जाणीव होत असे.

१२ उ ३. रुग्णालयात असतांना नामजपादी उपाय करणे : गुरुदेव, श्री. समीर रुग्णाईत असतांनाच्या प्रत्येक प्रसंगात आम्ही तुमच्या कृपेची सातत्याने अनुभूती घेत होतो. रुग्णालयात असतांना माझ्याकडून श्री. समीर यांच्यासाठीचा नामजप केला जात असे. मी भ्रमणभाषवर बारीक आवाजात तो नामजप, मंत्रजप आणि स्तोत्रे लावून ठेवत होते. त्याचप्रमाणे त्यांची मानस दृष्ट काढून त्यांच्याभोवती संरक्षककवच निर्माण होण्यासाठी माझ्याकडून प्रार्थना केली जात असे.

‘हे गुरुदेवा, ‘केवळ आपणच या आजारातून श्री. समीर यांना बाहेर काढले आणि आमचीही श्रद्धा वाढवली’, त्याबद्दल आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

१२ ए. श्री. श्रीकांत लेले (श्री. समीर यांच्या मेहुणीचे यजमान), जळगाव

१२ ए १. श्री. समीर यांच्यावरील गुरुकृपा शब्दांत व्यक्त करणे कठीण असणे : ‘गुरुकृपा, अध्यात्मशास्त्र, वैद्यकीय शास्त्र, ज्योतिष शास्त्र आणि श्री. समीर यांच्या मनाची चिकाटी अन् आत्मबळ यांची शक्ती अनुभवता आली. ही गुरुकृपा शब्दांत व्यक्त करणे केवळ अशक्य आहे. ‘आम्हाला आपल्या चरणी (गुरुचरणी) सतत कृतज्ञताभावात राहता येऊ दे’, हीच आपल्या चरणी प्रार्थना !’

‘हे गुरुदेवा, कृतज्ञ आहे. या सर्व कठीण प्रसंगांत तुमच्या कृपेमुळे माझी तुमच्यावरील श्रद्धा न्यून न होता अधिक बळकट झाली. ‘गुरुदेवा, या एक वर्षाच्या कालावधीत साधनेच्या वारीत तुम्ही आम्हाला नुसते चालवून घेत नसून संसारातील प्रत्येक प्रसंगात तुम्ही आमच्या समवेतच आहात’, याची खोलवर जाणीव तुम्ही आम्हाला करून दिलीत. श्री गुरूंनी (तुम्हीच) सुचवलेल्या पुढील ओळींतून तुमच्या चरणी कृतज्ञतापुष्प अर्पण करते.

साधनेची वारी असे महाविलक्षण।
गुरुमाऊली (टीप) चालवी बोट धरून।।

मार्गी येता काळ कठीण।
अलगद कडेवर घेई उचलून।।

टीप – परात्पर गुरु डॉ. आठवले’

– सौ. मोहिनी समीर चितळे (श्री. समीर चितळे यांच्या पत्नी), पुणे. (५.३.२०२२)


श्री. समीर चितळे यांची प्रकृती बरी झाल्यावर एका संतांनी त्यांच्याविषयी काढलेले उद्गार आणि त्याची साधिकेला आलेली प्रचीती !

‘माझे मेहुणे श्री. समीर चितळे हे या गंभीर आजारपणातून थोडे बरे झाल्यावर आमची एका संतांशी भेट झाली. तेव्हा ते म्हणाले, ‘‘एवढी वर्षे जे पुण्यकर्म केले, त्यामुळे या आजारपणातून तुम्ही सुखरूप बाहेर आलात.’’ त्यांचे हे बोलणे ऐकल्यावर मला मागील काही प्रसंगांचे स्मरण झाले.

१. सासर्‍यांच्या खुब्याचे हाड मोडल्यावर सासू-सासर्‍यांना पुण्याला आणून मुलाप्रमाणे त्यांचे सर्व प्रेमाने करणे आणि आर्थिक व्यय करून त्याविषयी कधीही बोलून न दाखवणे : वर्ष २००७ मध्ये माझे वडील (श्री. रवींद्र गोंधळेकर, आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ७९ वर्षे) अकोला येथे रहात असतांना त्यांच्या डाव्या पायाच्या खुब्याचा (कंबर आणि मांडी यांच्या सांध्याजवळ) अस्थीभंग झाला. मी पुढच्या वैद्यकीय शिक्षणासाठी नुकतीच पुण्यात आले होते. तेव्हा श्री. समीर (माझ्या मोठ्या बहिणीचे यजमान) यांनी पुढाकार घेऊन माझ्या आई-वडिलांना पुण्यात त्यांच्या घरी आणले. आम्ही ३ बहिणी असून आम्हाला भाऊ नाही; पण त्यांनी माझ्या वडिलांचे सर्व मुलाप्रमाणे प्रेमाने केले. तेव्हा बाबांचे ३ वेळा शस्त्रकर्म झाले. माझे आई-वडील ८ – ९ मास श्री. समीर यांच्याकडेच राहिले. श्री. समीर यांनी आर्थिक बाजूही पूर्णपणे सांभाळली आणि आतापर्यंतच्या १५ वर्षांत त्याची कधीही वाच्यता केली नाही.

२. मेहुणीची पितृवत् काळजी घेणे : पुण्यामध्ये माझे वैद्यकीय शिक्षण पूर्ण होण्यात आणि पुढे वैद्यकीय व्यवसाय चालू करण्यातही श्री. समीर यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांनी आतापर्यंत माझी पितृवत् काळजी घेतली आणि आताही घेत आहेत. त्यांनी आमच्या आई-वडिलांना अकोल्याहून पुणे येथे स्थलांतरित होण्यासाठी संपूर्ण सहकार्य केले. आताही ते आम्हा कुटुंबियांची पूर्ण दायित्वाने काळजी घेत आहेत.’

– वैद्या सुश्री (कु.) कल्याणी गोंधळेकर (श्री समीर यांची धाकटी मेहुणी), पुणे. (५.३.२०२२)


‘देव सतत समवेत असून त्याला केवळ अनुभवयाचे आहे’, हे मेहुण्यांच्या आजारपणातील एका प्रसंगातून शिकता येणे

‘श्री. समीर हे रुग्णालयात अतीदक्षता विभागामध्ये गंभीर स्थितीत असतांना त्यांना ‘आम्ही त्यांच्या समवेत थांबावे’, असे सतत वाटायचे; परंतु ‘कोरोनामुळे रुग्णाला कुठलाही संसर्ग होऊ नये’, यासाठी आम्हाला तिथे थांबता येत नसे. तेव्हा मी त्यांना सांगत असे, ‘‘तुम्हाला दिसणार्‍या या समोरच्या भिंतीच्या बाहेरच आम्ही थांबलो आहोत. आमचे सगळे लक्ष तुमच्याकडेच आहे.’’ मी त्यांना असे सांगत असतांना मला जाणीव झाली, ‘वेगळ्या अर्थाने माझीही स्थिती अशीच आहे. देव सतत माझ्या समवेतच आहे; परंतु मला ते कळत नसल्यामुळे मी त्याला शोधत आहे. देव माझ्या समवेतच असून मला केवळ त्याला अनुभवायचे आहे.’ या प्रसंगानंतर मला याची विशेषत्वाने जाणीव झाली. या कठीण प्रसंगात मला देवाला अनुभवण्याचा मार्ग मिळाला.’

– वैद्या सुश्री (कु.) कल्याणी गोंधळेकर (श्री. समीर यांची धाकटी मेहुणी), पुणे (५.३.२०२२)

(समाप्त)

• सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
• सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक