बस्ती (उत्तरप्रदेश) येथील घटना
लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) – राज्यातील बस्ती जिल्ह्यात असलेल्या आवास विकास कॉलनी येथे घडलेल्या एका घटनेत एका १३ वर्षीय मुलीने माकडांपासून स्वत:चा आणि १५ महिन्यांच्या स्वत:च्या भाचीचा जीव वाचवला. घडले असे की, निकिता नावाची मुलगी तिच्या भाचीसमवेत घरात खेळत होती. तेव्हा अचानक माकडांचा एक गट घरात घुसला. या वेळी निकिताने अतिशय हुशारीने काम करत तिथे ठेवलेल्या ‘अलेक्सा’ उपकरणाला कुत्र्याचा आवाज काढण्याची आज्ञा दिली. यंत्राने लगेच मुलीचे ऐकून कुत्र्यांच्या भुंकण्याचा मोठा आवाज काढण्यास आरंभले. या आवाजामुळे सर्व माकडे घाबरून घराबाहेर पळाली. सामाजिक माध्यमांतून हा विषय पुष्कळ प्रमाणात प्रसारित झाला असून निकिताच्या बुद्धीमत्तेचे कौतुक होत आहे.
(अलेक्सा हे तंत्रज्ञान कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारित असून या उपकरणाला आपण जो आदेश देऊ, त्यानुसार ते कार्य करते !)