गोवा-तमनार वीजवाहिनी प्रकल्प
बेंगळुरू, २४ मार्च : गोवा-तमनार वीजवाहिनी प्रकल्पाच्या अंतर्गत पश्चिम घाटातील वनक्षेत्रातून वीजवाहिन्या नेण्याचा गोव्याचा प्रस्ताव कर्नाटकने फेटाळला आहे. कर्नाटकने हा प्रकल्प राबवणार्या संस्थेला प्रकल्पाच्या वीजवाहिन्या जंगल नसलेल्या क्षेत्रातून नेण्यास सांगितले आहे. वनक्षेत्रातून वीजवाहिन्या नेल्याने वनक्षेत्राची मोठ्या प्रमाणावर हानी होणार असल्याने कर्नाटकने या प्रकल्पाचा प्रस्ताव मांडलेल्या वन खात्याच्या अधिकार्यांना ‘कारणे दाखवा’ नोटीस बजावण्याचा निर्णय घेतला आहे.
काय आहे गोवा-तमनार वीजवाहिनी प्रकल्प ?दक्षिण गोव्यातील पुढील १५ ते २० वर्षांची विजेची मागणी पूर्ण करण्यासाठी गोवा सरकार गोवा-तमनार वीजवाहिनी प्रकल्प राबवत आहे. या प्रकल्पाच्या अंतर्गत तमनार (छत्तीसगड) येथून वीज आयात केली जाणार आहे. यासाठी गोवा सरकारने कर्नाटककडे पश्चिम घाटाच्या (यामध्ये काली व्याघ्र संरक्षित क्षेत्राचाही समावेश आहे) १७६.६५ हेक्टर वनक्षेत्रातून ४०० केव्ही वीजवाहिनी घालण्याची अनुमती मागितली आहे. ही वीजवाहिनी कर्नाटकमधील धारवाड, बेळगाव आणि उत्तर कन्नड या ३ जिल्ह्यांतून जाते. या प्रकल्पाला राष्ट्रीय वन्यजीव मंडळाकडून अजूनही संमती मिळायची आहे. प्रारंभी या प्रकल्पाला विरोध झाल्यानंतर प्रकल्पाची वीजवाहिनी घनदाट जंगलातून न नेता अन्य मार्गाने नेण्याचा सुधारित प्रस्ताव कर्नाटककडे ठेवण्यात आला. प्रकल्पाच्या सध्याच्या प्रस्तावानुसार पश्चिम घाट आणि दांडेली वन्यजीव विभाग येथील वनक्षेत्रातील सुमारे ७२ सहस्र झाडे कापावी लागणार आहेत. |