केजरीवाल यांनी हवालाद्वारे ४५ कोटी रुपये गोव्यात पाठवले ! – ईडीचा न्यायालयात दावा
नवी देहली – मद्य धोरण घोटाळ्याच्या प्रकरणी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) अटक केलेले देहलीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २२ मार्चला दुपारी २ वाजता येथील राऊस एव्हेन्यू न्यायालयात उपस्थित केले.
या वेळी ईडीने केजरीवाल यांच्या चौकशीसाठी १० दिवसांच्या ईडी कोठडीची मागणी केली. यावर दोन्ही बाजूंचा युक्तीवाद ऐकल्यानंतर न्यायालयाने केजरीवाल यांना ६ दिवसांची ईडी कोठडी सुनावली. ईडीने न्यायालयात आरोप केला की, देहली राज्याचे मद्य धोरण बनवण्यात मुख्यमंत्री केजरीवाल यांचा सहभाग होता. धोरणामुळे केजरीवाल सरकारला मद्य विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात लाच मिळाली. या पैशांतून पंजाब आणि गोवा येथील विधानसभा निवडणुकीत खर्च करण्यात आला. गोव्यामध्ये हवालाद्वारे (दलालांच्या माध्यमातून केलेल्या बेकायदेशीर हस्तांतराद्वारे) ४५ कोटी रुपये पाठवण्यात आले.
सौजन्य : abp माझा
काय आहे मद्य धोरण घोटाळा ?
देहलीच्या आम आदमी सरकारने १७ नोव्हेंबर २०२१ या दिवशी मद्य विक्रीविषयी नवीन धोरण लागू केले. हे धोरण बनवतांना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि अन्य मंत्री यांचा सहभाग होता. या धोरणामध्ये राज्यात ३२ प्रभाग बनवण्यात आले आणि प्रत्येत प्रभागामध्ये अधिकाधिक २७ दुकाने उघडण्याची अनुमती देण्यात आली. या अनुषंगाने एकूण ८४९ दुकाने उघडण्यात येणार होती.
या नव्या धोरणानुसार राज्यातील मद्य विक्रीची सर्व दुकाने खासगी करण्यात आली होती. त्याआधी ६० टक्के दुकाने सरकारी होती, तर ४० टक्के दुकाने खासगी होती. ‘या नव्या धोरणामुळे सरकारला ३ सहस्र ५०० कोटी रुपयांचा लाभ झाला’, असा दावा आप सरकारने केला. या धोरणानुसार मद्य विक्रीच्या परवान्यासाठी लागणार्या शुल्कातही वाढ करण्यात आली होती. ती २५ लाख रुपयांवरून ५ कोटी रुपये करण्यात आली. याचा फटका लहान दुकानदारांना बसला. त्यामुळे ‘मोठ्या मद्य विक्रेत्यांनी परवाना मिळावा, यासाठी आम आदमी पक्षाच्या नेत्यांना मोठी रक्कम लाच म्हणून दिली’, असा आरोप आहे. या घोटाळ्याच्या प्रकरणी आप सरकारचे मंत्री आणि अन्य अशा १५ हून अधिक जणांना अटक करण्यात आलेली आहे.
आपकडून अटकेच्या विरोधात निदर्शने !केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी देहलीमध्ये निदर्शने केली. या वेळी पोलिसांनी आप सरकारमधील मंत्री आतिशी मर्लेना आणि सौरभ भारद्वाज यांना कह्यात घेतले. |