संपादकीय : प्रदूषणग्रस्त भारत !

जागतिक स्तरावर भारताची अर्थव्यवस्था आश्चर्यकारकरित्या भरारी घेत आहे. चीनऐवजी ‘सर्वांत सुरक्षित बाजारपेठ’ म्हणून जपान, जर्मनी या देशांसह अनेक देश भारतातच गुंतवणूक करण्यास प्राधान्य देत आहेत. एकीकडे अशी भरारी चालू असतांना दुसरीकडे वायूप्रदूषणाच्या संदर्भात मात्र भारताचा स्तर सातत्याने घसरत असल्याचे समोर येत आहे, ही निश्चितच देशासाठी चांगली गोष्ट नाही. स्वित्झर्लंडमधील ‘वर्ल्ड एअर क्वॉलिटी रिपोर्ट २०२३’नुसार हवा गुणवत्तेच्या निकषात बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्या पाठोपाठ भारत हा जगभरातील ‘तिसरा सर्वाधिक प्रदूषित देश’ ठरला आहे. इतकेच नाही, तर जगभरातील सर्वाधिक प्रदूषित ५० शहरांमध्ये एकट्या भारतातील ४२ शहरांचा समावेश आहे. वर्ष २०२२ मध्ये भारत प्रदूषणाच्या संदर्भात ८ व्या क्रमांकावर होता. तेथून हे प्रमाण अल्प होण्याच्या ऐवजी वाढतच आहे, हे दुर्दैवी आहे. भारतातील ९६ टक्के लोकांना हवेच्या प्रदूषणाचा सामना करावा लागतो.

या अहवालात देहली जगातील सर्वाधिक प्रदूषित राजधानी असल्याचे नमूद करण्यात आले आहे, तर बिहारमधील बेगुसराय या महानगरात प्रदूषणाने धोक्याची पातळी ओलांडल्याचा धक्कादायक निष्कर्ष नमूद करण्यात आला आहे. बेगुसरायमध्ये प्रतिक्युबिक मीटर ‘पी.एम्. २.५’चे प्रमाण ११८.९ मायक्रोग्रॅम असून हे प्रमाण गतवर्षी १९.७ इतके अल्प होते. गौहत्ती, देहली या शहरांत हे प्रमाण गतवर्षीच्या तुलनेत वाढले आहे. वर्ष २०१८ पासून ४ वेळा ‘सर्वांत प्रदूषित राजधानी शहर’ म्हणून देहलीचे नाव घोषित झालेले आहे. खरे तर पृथ्वीवर जगण्यासाठी हवा हा अत्यंत आवश्यक घटक आहे किंबहुना पृथ्वीवरील प्रत्येक सजीवासाठी तो आवश्यक घटक आहे. वाढत्या वायूप्रदूषणामुळे दमा, कर्करोग, पक्षाघात, फुफ्फुसाचे आजार होत असून हवेतील सूक्ष्म कणांमुळे मानसिक आरोग्यावरही परिणाम होत आहे. वायूप्रदूषणामुळे मधुमेहाची रुग्णसंख्या लक्षणीय वाढत असून भारतात प्रतिवर्षी अनुमाने १३ लोकांचे मृत्यू होतात. यावरून ‘परिस्थिती किती गंभीर आहे ?’, हे लक्षात येते.

वाढते औद्योगीकरण !

स्वातंत्र्यापूर्वी काही दशके अगोदर आणि विशेषकरून स्वातंत्र्यानंतर जसजसे शहरीकरण वाढत गेले, लोकसंख्येची मोठ्या प्रमाणात वाढ होत गेली, तसतशी लोकांची एकूणच मानसिकताही पालटली. सातत्याने वाढते औद्योगीकरण, रस्त्यांचे दुपदरीकरण, चौपदरीकरण आणि आता आठपदरीकरण यांमुळे देशभरात सर्वत्र होणारी बेसुमार वृक्षतोड, कोरोना महामारीनंतर लोकांचे दुचाकी-चारचाकी गाड्या घेण्याचे वाढलेले प्रमाण यांसह अनेक गोष्टी वायूप्रदूषणासाठी कारणीभूत आहेत. वाढती लोकसंख्या हाही प्रदूषण वाढीमागील एक सर्वांत महत्त्वाचा घटक आहे. लोकसंख्या जसजशी वाढली, तसतसा नैसर्गिक साधनसंपत्तीचा नाश मोठ्या प्रमाणात होत आहे. पूर्वी ही समस्या केवळ शहरांपुरती मर्यादित होती. आता ही समस्या प्रत्येक खेडोपाडी पोचली आहे. लोकांना रोजगार देण्यासाठी औद्योगीकरणात वाढ झाली. या औद्योगीकरणामुळे हवेतील विषारी वायूचे प्रमाण वाढत आहे. अमेरिका, जर्मनी यांच्यासारखे विकसित देश त्यांच्या देशात ‘प्रदूषण नको’, म्हणून प्राथमिक ‘कास्टिंग’ (धातू) भारतात करून घेतात. यामुळे ‘फाऊंड्री’सारख्या उद्योगांची लक्षणीय वाढ झाली. या ‘फाऊंड्री’मधून मोठ्या प्रमाणात वायूप्रदूषण होते, जे मानवी आरोग्यासाठी धोकादायकही असते. रसायन बनवणारे विविध कारखाने आणि त्यातून निघणारे विविध धूर यांमुळे भारतातील चिपळूण, कोलकाता, देहली, मुंबई अशा शहरांमध्ये नागरिकांना श्वास घेणेही दुर्मिळ झाले आहे. वाढत्या लोकसंख्येला घरे हवीत आणि जलद विकासासाठी रस्ते हवेत; म्हणून आपण आपल्या सोयीसाठी प्रचंड प्रमाणात जंगले तोडली. जी झाडे आणि वनस्पती वातावरणातील कार्बन डायऑक्साईड शोषून हवेत प्राणवायू सोडतात, तीच न राहिल्याने ‘प्रदूषण आता रोखणार कोण ?’, असा महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

साधारणत: १९९० च्या दशकापर्यंत प्रदूषणाची स्थिती इतकी बिकट नव्हती. शुद्ध हवा, पाणी या गोष्टी सहज उपलब्ध होत होत्या. यानंतरच्या काळात विज्ञानाने झपाट्याने प्रगती केली; पण मग या विज्ञानाने गेल्या २५ वर्षांत मानवाला काय दिले ? पर्यावरणाची अपरिमिती हानी, इमारतींचे जंगल, चकचकीत इमारती, रस्त्यांसह अनेक ठिकाणी सिमेंटचा वापर यांसह अन्य गोष्टींमुळे विज्ञानाने निसर्गावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न केला. मुंबईत समुद्र हटवून इमारती बांधण्यात येत आहेत. कोरोना महामारीच्या काळात विज्ञानावर आधारित सर्व उपकरणे थांबल्यावर दीर्घकाळानंतर हिमालयाची शिखरे स्पष्टपणे दिसत होती, पाणी-हवा स्वच्छ झाली होती. यावरून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या म्हणण्यानुसार ‘सहस्रो वर्षे प्रदूषणमुक्त असलेली पृथ्वी विज्ञानाने केवळ १०० वर्षांत प्रदूषणग्रस्त करून प्राणीमात्रांचा विनाश जवळ आणला आहे’, हे किती सत्य आहे, हेच लक्षात येते.

कठोर उपाययोजनांची आवश्यकता !

भारतीय संस्कृतीत प्रत्येक गोष्ट, सण, वस्तू या देवत्वाशी जोडल्या आहेत. वटपौर्णिमा असो वा तुळशीविवाह हिंदु संस्कृतीतील प्रत्येक कृती ही निसर्गानुकूल आहे. झाडांना आपण देव मानतो. त्यामुळे त्यांना जपतोही. त्यामुळे पृथ्वीला जर प्रदूषणापासून वाचवायचे असेल, तर आपल्याला अध्यात्माकडेच वळावे लागेल. पूर्वीच्या काळी मनुष्य निसर्गाच्या संदर्भात अधिक संवेदनशील होता. त्यामुळे प्रदूषणाचे प्रमाणही न्यून होते. मानवाची वृत्ती सात्त्विक असल्यामुळे तो कोणतीही कृती करतांना निसर्गाचा विचार करायचा. आता मनुष्य साधना करत नसल्यामुळे त्याची वृत्ती स्वार्थी झाली आहे. त्यामुळे केवळ स्वतःचे हित कसे साध्य करायचे, याचाच विचार तो करतो.

दुसरीकडे सरकारी स्तरावर कठोर धोरणात्मक पालट, तांत्रिक नवकल्पना, सातत्याने जनजागृती आणि लोकांचा सहभाग वाढवणे यांसह प्रसंगी कठोर उपाययोजना राबवाव्या लागतील. शहरी पातळीवरील सार्वजनिक वाहतूक सक्षम करावी लागेल, जेणेकरून नागरिक वैयक्तिक वाहनांऐवजी सार्वजनिक वाहतूक वापरू शकतील, सायकल चालवण्यास नागरिकांना प्रोत्साहन देणे अशा उपाययोजना प्राधान्याने राबवाव्या लागतील. नुकतेच ‘इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च’ने ‘हवन’वर संशोधन केल्यानंतर हवन इत्यादी संबंधित साहित्यासाठी ‘पेटंट’ही घेतले आहे. अजमेरच्या जवाहरलाल नेहरू वैद्यकीय महाविद्यालयातील सूक्ष्मजीवशास्त्र विभागाकडून ‘हवन औषधी धुराचा विषाणूंवरील परिणाम’ या विषयावर प्रथमच संशोधन करण्यात आले. यानुसार जिवाणूंमुळे उद्भवणारे आजार बरे करण्यासाठी ‘हवन’ प्रभावी ठरले आहे. आता यावर सविस्तर संशोधन केले जाणार आहे. असे अध्यात्मावर आधारित संशोधन केले, तरच यापुढील काळात वायूप्रदूषणावर नियंत्रण मिळवणे शक्य होईल.

मनुष्याने साधना केली, तर त्याच्यातील संवेदनशीलता वाढून तो निसर्गाला अनुकूल अशीच कृती करील !