‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ९ मार्च या दिवशी अरुणाचल प्रदेशातील इटानगर येथे ‘विकसित भारत विकसित ईशान्य प्रदेश’, या कार्यक्रमाच्या वेळी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून ‘सेला’ बोगद्याचे लोकार्पण केले. हा बोगदा सीमा रस्ते संघटनेने (‘बी.आर्.ओ.’ने) अरुणाचल प्रदेशातील पश्चिम कामेंग जिल्ह्यातील तवांगला आसामच्या तेजपूरशी जोडणार्या रस्त्यावर बांधला आहे. या लेखात बोगदा बांधण्यामागील कारणे आणि त्याचे सामरिक महत्त्व पाहूया.
१. सेला बोगद्याचे महत्त्व आणि तो बांधण्यामागील कारणे
अरुणाचल प्रदेशमध्ये विविध नद्यांची खोरे आहेत. या प्रदेशात लढाई करायची म्हटली, तर ती निरनिराळी करावी लागते; कारण एका खोर्यातून दुसर्या खोर्यात जायला रस्ता नाही. यातील तवांग हे सर्वाधिक महत्त्वाचे ठिकाण आहे. ते या राज्यातील मोठे गाव आहेच; पण तेथे बौद्ध धर्मियांचे क्रमांक २ चे मोठे मंदिर आहे. त्यामुळेही त्याला वेगळे महत्त्व आहे. वर्ष १९६२ मध्ये भारत-चीन युद्ध झाले होते, तेव्हा चीनचे सैन्य तवांगच्या आधी सैला नावाच्या खिंडीपर्यंत येऊन पोचले होते. तथापि तेथून ते परत गेले होते. पुन्हा युद्ध झाले, तर भारताची संरक्षण सिद्धता ही अत्यंत चांगली असायला पाहिजे. पूर्वी येथील रस्ता हा ५-६ मास बंद असायचा. त्यामुळे हिवाळ्यात ४-५ मास या भागात सैन्याला ठेवणे कठीण जात होते. त्यांना रसद पुरवता येत नव्हती. त्यामुळे हा बोगदा बांधण्यात आला आहे.
२. सेला बोगद्याची वैशिष्ट्ये
सेला हा बोगदा १३ सहस्र फूट उंचीवर आहे. तो बांधण्यासाठी सरकारला ८२५ कोटी रुपये व्यय आला आहे. हा बोगदा सीमा रस्ते संघटनेने नवीन ‘ऑस्ट्रियन टनेलिंग’ पद्धत वापरून बांधला आहे. त्यात सर्वोच्च मानकांची सुरक्षा वैशिष्ट्ये समाविष्ट आहेत. हा तिहेरी बोगदा आहे. यात जायला एक मार्ग, येण्यासाठी दुसरा मार्ग आणि आपत्कालीन परिस्थितीत तिसरा मार्ग आहे. हा रस्ता खाली बांधण्यात आल्याने वाहतूक करणार्यांना वर चढण्याची आवश्यकता नाही. कठीण भूप्रदेश आणि प्रतिकूल हवामानासारख्या आव्हानांवर मात करून हा बोगदा अवघ्या ५ वर्षांत बांधून पूर्ण झाला आहे. हा बोगदा बलीपारा-चरिदुआर-तवांग रस्त्यावरील सेला खिंड ओलांडून तवांगला सर्व ऋतूंमध्ये संलग्नता (कनेक्टिव्हिटी) प्रदान करील. हा प्रकल्प या प्रदेशात केवळ जलद आणि अधिक कार्यक्षम वाहतूक मार्ग प्रदान करीलच; पण देशासाठी सामरिकदृष्ट्याही अतिशय महत्त्वाचा आहे.
३. सेला बोगदा बांधल्यामुळे देशाला होणारे लाभ !
अ. सीमावर्ती भागात सैन्याच्या हालचाली सतत चालू असतात. रस्ते चांगले असतील, तर आपण सीमांचे रक्षण करू शकतो.
आ. हा रस्ता १२ मास चालू असल्याने लढाई झाल्यास चीनशी चांगल्या प्रकारे सामना करता येईल, तसेच चीनची घुसखोरीही थांबवता येईल.
इ. मागील वर्षी तवांग जवळील यांगत्से येथे भारत आणि चीन यांच्या सैन्यात झटापट झाली होती. तेव्हा भारतीय सैन्याने त्यांची पिटाई केली होती.
ई. सेला बोगद्यामुळे भारताची संरक्षण सिद्धता वाढेल आणि सीमावर्ती भागाच्या सामाजिक-आर्थिक विकासाला चालना मिळेल.
उ. अरुणाचल प्रदेशमध्ये सर्वाधिक पर्यटक हे तवांगमधून येतात. तेथील लोकसंख्याही पुष्कळ आहे. तेथे बर्फ पडत असल्याने त्यांना त्रास होत होता. त्यामुळे तेथील लोकांचेही जीवन सुसह्य होईल.
ऊ. भारतीय पर्यटक सीमावर्ती भागात जाऊ शकतील. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला लाभ होईल.
यापूर्वी भारत सीमा भागात रस्त्यांची बांधणी करत नव्हता; कारण मनात भीती होती की, याचा चीन अपवापर करू शकतो. आता भारत आक्रमक झाला आहे. त्यामुळे भारताला सीमांचे रक्षण अधिक चांगल्या प्रकारे करता येईल.’
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.