China Ready To Intervene : अमेरिकेने रशियावर आक्रमण केल्यास आम्ही सैन्य पाठवणार ! – चीनची चेतावणी

फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांनी युक्रेनमध्ये नाटोने सैन्य पाठवण्याची केली होती मागणी !

चीनचे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग व रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन

बीजिंग (चीन) – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी काही दिवसांपूर्वीच ‘नाटो’ने युक्रेनमध्ये सैन्य पाठवावे’, असे म्हटले होते. या पार्श्‍वभूमीवर आता चीनने धमकी दिली आहे. ‘अमेरिका किंवा ‘नाटो’ देश यांनी रशियावर आक्रमण केल्यास चीन रशियाच्या समर्थनार्थ सैन्य पाठवेल, असे विधान चीनच्या संरक्षण मंत्रालयाच्या प्रतिनिधीकडून करण्यात आले आहे. एका टेलिग्राम वाहिनीने याविषयीचे वृत्त दिले आहे. गेल्या आठवड्यात रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी अमेरिकेला चेतावणी देतांना म्हटले होते की, रशिया अणूयुद्धासाठी सिद्ध आहे आणि युक्रेनमध्ये अमेरिकी सैन्य तैनात केल्यास युद्धात वाढ होईल.

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष मॅक्रॉन यांनीही काही दिवसांपूर्वी म्हटले होते की, युक्रेनला मिळणारे साहाय्य अल्प करणे; म्हणजे रशियाला शरण जाणे होय. मला असे होऊ द्यायचे नाही. मी याची सुरुवातही करणार नाही; परंतु रशियाच्या सैन्याला बाहेर काढण्यासाठी आम्हाला युक्रेनमध्ये प्रत्यक्ष जाऊन कृती करणे आवश्यक आहे, मग ते कोणत्याही स्वरूपात असो.

..तर तिसरे महायुद्ध होईल ! – इटली

मॅक्रॉन यांच्या विधानावर बोलतांना इटलीनचे परराष्ट्रमंत्री अँटोनियो ताजानी यांनी एका मुलाखतीत म्हटले की, ‘नाटो’ने युक्रेनमध्ये त्याचे सैन्य पाठवावे, असे मला वाटत नाही. असे झाले, तर ती मोठी चूक ठरेल. आपण युक्रेनला एवढे साहाय्य केले पाहिजे की, तो स्वतःचे संरक्षण करू शकेल. युक्रेनमध्ये प्रवेश करणे आणि रशियाविरुद्ध लढणे म्हणजे तिसर्‍या महायुद्धाला आमंत्रण देणे होय.