GlobalSpiritualityMahotsav : बाह्य आणि अंतर्गत प्रदूषण दूर करण्यासाठी आधुनिक वैद्यकशास्त्राला अध्यात्मशास्त्राची जोड हवी !

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांचे ‘जागतिक अध्यात्म महोत्सवा’त महत्त्वपूर्ण प्रतिपादन !

डावीकडून ‘हार्टफुलनेस’ संस्थेच्या डॉ. स्नेहल देशपांडे, भावना सोनकांबळे, सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे, डॉ. राजवी मेहता आणि जागतिक आरोग्य संघटनेच्या इसाबेला वाश्‍चमुथ आणि अन्य मान्यवर

भाग्यनगर (तेलंगाणा) – आधुनिक वैद्यकशास्त्र आणि अध्यात्मशास्त्र यांनी हातात हात घालून पुढे जाण्याची आवश्यकता आहे. तसे केल्यास सर्व बाह्य आणि अंतर्गत प्रदूषण यांपासून निर्माण होणार्‍या समस्या दूर होतील, असे महत्त्वपूर्ण वक्तव्य हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय मार्गदर्शक सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे यांनी केले. येथे झालेल्या जागतिक अध्यात्म महोत्सवाच्या तिसर्‍या दिवशी म्हणजे १६ मार्चला ‘एपिजेनेटिक, बिलीफ (विश्‍वास) अँड स्पिरिच्युअ‍ॅलिटी (अध्यात्म)’ या परिसंवादाला संबोधित करतांना त्यांनी वरील विधान केले. व्यक्तीतील जनुकांनुसार तिचे वागणे-बोलणे असते. थोडक्यात जनुकीय पालटांनुसार व्यक्तीचे वागणे पालटते. त्याचा परिणाम साहजिकच पर्यावरणावरही होतो. या अभ्यासाला ‘एपिजेनेटिक्स’ असे म्हणतात.

या वेळी सद्गुरु पिंगळे यांना विचारण्यात आले की, ‘गुणसूत्रांवर (‘क्रोमोझोम्स’वर) अध्यात्म कशा प्रकारे प्रभाव पाडू शकते ?’ यावर ते म्हणाले, ‘व्यक्तीच्या स्वभावातील दोष आणि अहं यांमुळे मनाची स्थिती पालटत रहाते. तुमच्या मनातील पालटांमुळे शरिरात रासायनिक पालट होतात. यांमुळे जैविक पालट होतात आणि त्याचे परिणाम तुमच्या गुणसूत्रांवर होतात.

साधना केल्यासच गुणसूत्रांमधील नकारात्मक पालटासारख्या समस्यांचे निवारण करणे शक्य ! – सद्गुरु डॉ. चारुदत्त पिंगळे

हा विषय विशद करतांना सद्गुरु डॉ. पिंगळे म्हणाले की, विज्ञान हे स्थूलातील सूत्रांवर कार्यरत आहे, तर अध्यात्म हे सूक्ष्म स्तरावर, म्हणजेच मन-बुद्धी-चित्त या स्तरांवर कार्य करते. विज्ञानही हळूहळू सूक्ष्मस्तरावर कार्य करू लागले आहे; परंतु त्याच वेळी अध्यात्म त्याच्याही पुढे जाऊन सूक्ष्मतर आणि सूक्ष्मतम स्तरापर्यंत कार्य करते. वैश्‍विक ऊर्जेचाही गुणसूत्रांवर प्रभाव पडत असतो. वैश्‍विक सूक्ष्म शक्ती हीसुद्धा एक ऊर्जाच असून त्याला ‘पितृ ऊर्जा’ (ऍन्सेस्ट्रल एनर्जी) म्हणजेच पितृदोष म्हणतात. त्याचाही गर्भावर परिणाम होत असतो. त्यामुळेच आधुनिक चिकित्सा पद्धतीसह आध्यात्मिक साधना केल्यासच गुणसूत्रांमधील नकारात्मक पालट, तसेच वंध्यत्व यांसारख्या समस्यांचे निवारण करणे शक्य आहे.

या वेळी स्त्रीरोगतज्ञ डॉ. राजवी मेहता यांनीही त्यांचे विचार मांडले.

सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.