हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी हिंदूंच्या नाशासाठी केलेले कायदे !

१० मार्च २०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘हिंदु मुले धर्मशिक्षणापासून दूर राहिल्याने होत असलेले दुष्परिणाम, हिंदूंच्या मंदिर उभारणीचे कार्य प्रगत संस्कृतीचे प्रतीक, हिंदूंच्या मंदिरांची अफाट संपत्ती परकीय आक्रमकांनी अफगाणिस्तानात नेणे आणि मंदिरांची संपत्ती हिसकावून घेणार्‍या ‘एच.आर्.सी.ई.’ (हिंदु रिलिजन अँड चॅरिटेबल एन्डोव्हमेंट्स’, म्हणजे ‘हिंदु धार्मिक आणि धर्मार्थ बंदोबस्ती अधिनियम) कायद्याची निर्मिती’, यांविषयी वाचले. आज या लेखाचा पुढचा भाग येथे देत आहोत.

मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा:  https://sanatanprabhat.org/marathi/772402.html

१६. मशिदी आणि चर्च यांना हात लावण्याचे सरकारचे धैर्य नसणे

श्री. शंकर गो. पांडे

हिंदूंनी दान केलेला पैसा हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी मंदिर किंवा हिंदू यांचा विकास किंवा हित यांसाठी खर्च केला काय ? तर नाही. या पैशातून त्यांनी मदरशांना कोट्यवधीचे अनुदान दिले. मौलानांना वेतन दिले. विशेष म्हणजे कायद्याच्या एका फटकार्‍याने हिंदु मंदिरे कह्यात घेतांना या हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी मुसलमानांच्या मशिदींना आणि ख्रिस्त्यांच्या चर्चना हात लावण्याची धैर्य केले नाही. आज भारतात लाखो मशिदी आणि चर्च आहेत. त्यांच्या जवळही पुष्कळ संपत्ती आहे; पण त्यांची संपत्ती कशी खर्च करायची ? याचे सर्व अधिकार मुसलमान आणि ख्रिस्ती यांच्याजवळ आहेत. मशिदी आणि चर्च यांचा पैसा केवळ मुसलमान अन् ख्रिस्ती यांच्या भल्यासाठी आणि त्यांच्या धर्माच्या प्रसारासाठी अन् हिंदूंचे धर्मातर करण्यासाठी खर्च केला जातो. हिंदूंच्या तर जाऊ द्या; पण देशाच्या विकासासाठी ही मशीद किंवा चर्च यांचा एकही पैसा खर्च केला जात नाही.

१७. हिंदूंच्या मंदिरांवर अन्य धर्मीय विश्वस्त !

अजूनही एक संतापकजनक गोष्ट, म्हणजे हिंदूंच्या अनेक धनवान मंदिराच्या विश्वस्त पदावर मुसलमान आणि ख्रिस्ती यांची नियुक्ती करण्यात आली आहे; पण एकाही मशीद किंवा चर्च यांवर हिंदूंची नियुक्ती करण्याचे धैर्य या हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी दाखवले नाही.

१८. हिंदूंची अभूतपूर्व स्थापत्य आणि मूर्ती कला असणारी मंदिरे मुसलमानांनी उद्ध्वस्त करणे अन् त्याची क्षतिपूर्ती अशक्य !

भारतातील भव्य आणि विविध ज्ञान, विज्ञान, संगीत, कला प्रदर्शित करणार्‍या अनुपम शिल्पकृतींनी नटलेली मंदिरे उभी करण्यास भारतीय शिल्पकारांच्या अनेक पिढ्या दिवस-रात्र तहानभूक हरवून खपल्या. वेरुळच्या शिखरापासून आरंभ करून साकारलेले अभूतपूर्व कैलास मंदिर निर्माण होण्यासाठी शिल्पकारांच्या ७ पिढ्या अविरत राबल्या, म्हणजे हे कैलास मंदिर साकारण्यासाठी तब्बल १५० वर्षे लागली; पण छत्रपती शिवाजी महाराजांनी आगर्‍याच्या कैदेतून स्वतःची चातुर्याने सुटका करून घेतल्यामुळे औरंगजेब भयंकर क्रूद्ध झाला आणि त्याने त्याचा राग हिंदु मंदिरांवर काढला. त्याने वेरुळचे कैलास मंदिर उद्ध्वस्त केले. काशी येथील विश्वनाथ आणि मथुरेतील श्रीकृष्ण जन्मभूमीवरचे कृष्णाचे मंदिर केवळ उद्ध्वस्तच केले नाही, तर त्यावर मशिदी उभारल्या. रानटी इस्लामी आक्रमकांनी हिंदूंच्या मंदिरातील केवळ संपत्तीच लुटली नाही, तर वर्षानुवर्षे निर्माण केलेल्या शिल्पकलेच्या अभूतपूर्व आणि अप्रतिम निर्मितीचा पुरता विध्वंसही केला. त्यांनी केलेल्या विध्वंसाची क्षतिपूर्ती करणे आता कुणालाही शक्य नाही. हिंदु समाज त्याच्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या एका अमूल्य ठेव्याला कायमचा गमावून बसला आहे.

१९. हिंदूंची मंदिरे किंवा बौद्धविहार पाडून मशिदी उभारणे !

सर्वोच्च न्यायालय व प्रर्थांनास्थळे कायद्याचे प्रातिनिधीक छायाचित्रं

हे रानटी इस्लामी आक्रमक आणि राज्यकर्ते यांनी किती मंदिरे, बौद्ध विहार पाडले, किती ग्रंथालये जाळली, किती हिंदु आचार्य आणि बौद्ध भिक्खु यांचा शिरच्छेद केला, याची सविस्तर माहिती मुसलमान इतिहासकारांनीच लिहून ठेवली आहे. मुसलमानांनी उद्ध्वस्त केलेली मंदिरे, हिंदु देवतांच्या भग्न केलेल्या मूर्ती पाहून वेदना झाल्याविना रहात नाहीत. इस्लामी आक्रमकांनी काही मंदिरे, बौद्ध विहार यांचा विध्वंस केला, तर काही ठिकाणी मंदिरे आणि बौद्ध विहारावरच मशिदी उभारल्या. आज भारतात अशा सहस्रो मशिदी आहेत की, त्यांचे उत्खनन केल्यास त्याखाली हिंदूंची मंदिरे आणि मूर्तींचे अवशेष सापडतील. हिंदूंची किती मंदिरे पाडून त्या मंदिराच्याच विटा, दगडांनी किती मशिदी उभारल्या गेल्या, याची सविस्तर माहिती देतो म्हटले, तर त्याचा एक ग्रंथ होईल.

हिंदूंच्या काही मंदिरांचे बांधकाम एवढे मजबूत होते की, प्रयत्न करूनही मुसलमानांना ती पूर्णपणे पाडता आली नाहीत. मग त्यांनी अशा मंदिरांचा पाया, भिंती, स्तंभ तसेच ठेवून त्यावर केवळ पांढरे घुमट बांधून त्या मंदिरांना मशिदीचे रूप दिले. काशी येथील काशीविश्वनाथ आणि मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिरावरील अतिक्रमण तर जाड भिंगाचा चष्मा असणार्‍या माणसांनाही दिसावे इतके स्पष्ट आहे; पण मुसलमान समाज धर्मांधतेमुळे आणि हिंदुद्वेष्टे नेते मुसलमान मतांसाठी आंधळे झाले असल्यामुळे त्यांना हे अतिक्रमण दिसत नाही. पुढे मुसलमान राजवट समाप्त झाल्यानंतर जागृत झालेल्या हिंदूंनी काशी, मथुरा आणि अयोध्या येथील आपल्या आराध्य दैवतांच्या मंदिरांवरील मुसलमानांचे आक्रमण हटवण्याची अन् ही मंदिरे कह्यात देण्याची मागणी चालू केली.

२०. हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी श्रीराममंदिराची उभारणी न होण्यासाठी अनेक क्लृप्त्या योजणे अन् अनेक कारसेवकांना ठार मारणे

अपघाताने हिंदू म्हणून जन्मलेल्या या हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी अयोध्या येथे रामजन्मभूमीवर श्रीरामाचे मंदिर निर्माण होऊ नये; म्हणून कसोशीने प्रयत्न केले. त्यांनी रामजन्मभूमीवर पूर्वी श्रीराममंदिर नव्हतेच, हे सिद्ध करण्यासाठी विविध न्यायालयांमध्ये हिंदूंचा सातत्याने द्वेष करणार्‍या आतंकवाद्यांची बाजू घेणार्‍या निष्णात अधिवक्त्यांची फौज नियुक्त केली. श्रीरामाला काल्पनिक पात्र ठरवून रामाच्या जन्माचा पुरावा मागितला. अयोध्येत आलेल्या कारसेवकांवर बेछूट गोळीबार करून सहस्रोंना ठार केले. या हिंदुद्वेष्ट्या नेत्यांमुळे हिंदूंना आपल्याच मातृभूमीत आपल्याच दैवताच्या मंदिरावरील अतिक्रमण हटवण्यासाठी मंदिर निर्मितीसाठी सातत्याने ५०० वर्षे तीव्र लढा द्यावा लागला. लाखो रामभक्त हिंदूंना स्वतःचे प्राण गमवावे लागले. हिंदु धर्मात जन्म घेऊनही केवळ सत्तासंपत्तीसाठी आपल्याच हिंदु धर्मीय बांधवांचा गळा कापून त्यांचा सर्वनाश करू पहाणार्‍या हिंदुद्वेष्ट्या राजकीय नेत्यांची अशी जमात संपूर्ण जगामध्ये भारताविना अन्य कोणताही देशात जन्मली नसेल !

(क्रमशः पुढच्या रविवारी)

– श्री. शंकर गो. पांडे, पुसद, यवतमाळ.


सहस्रो मंदिरांवर बांधलेल्या मशिदी तशाच रहाण्यासाठी चातुर्याने केलेला ‘प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ (प्रार्थनास्थळे कायदा) !

ज्ञानवापीचे छायाचित्र

विशेषतः अयोध्येमधील रामजन्मभूमीवरील बाबरीचे अतिक्रमण हटवण्याच्या आंदोलनाने चांगलाच पेट घेतला होता. ‘हिंदू असे मंदिरावरील मुसलमानांचे अतिक्रमण दूर करण्याची मागणी करू लागले, तर या देशातील सहस्रो मंदिरांवरच्या मशिदी हटवाव्या लागतील, यामुळे मुसलमान मतांची ‘व्होट बँक’ (मतपेढी) अप्रसन्न होईल आणि या राष्ट्राला मुसलमान देश बनवण्याच्या आपल्या योजनेवर पाणी फेरले जाईल’, याची भीती हिंदुद्वेष्ट्या नेत्यांना वाटू लागली. मग अपघाताने हिंदु म्हणून जन्मलेल्या या हिंदु नेत्यांनी काँग्रेसला मिळालेल्या पाशवी बहुमताच्या आधारावर वर्ष १९९५ मध्ये घाईघाईने ‘हिंदु प्लेसेस ऑफ वर्शिप ॲक्ट’ (प्रार्थनास्थळे कायदा) संमत केला आणि कायद्याप्रमाणे अयोध्या येथील रामजन्मभूमीवरचे मंदिर सोडून बाकी हिंदूंच्या सर्व मंदिरांची स्थिती वर्ष १९४७ मध्ये होती तशीच राहील, त्यात कोणताही पालट करण्याची मागणी हिंदूंना करता येणार नाही, असे प्रावधान (तरतूद) केले. एक प्रकारे या कायद्याप्रमाणे हिंदुद्वेष्ट्या नेत्यांनी मुसलमान आक्रमकांनी हिंदूंच्या ज्या सहस्रो मंदिरांवर अतिक्रमण करून मशिदी बांधल्या, त्या ‘वैध’ ठरवल्या आणि मुसलमानांनी अतिक्रमण केलेली मंदिरे हिंदूंनी परत मागण्याचा त्यांचा हक्क कायमचा हिरावून घेतला. – श्री. शंकर गो. पांडे

संपादकीय भूमिका 

हिंदुद्वेष्ट्या काँग्रेसने आणि अन्य शासनकर्त्यांनी आतापर्यंत केलेले हिंदुविरोधी कायदे आताच्या सरकारने तात्काळ रहित करणे आवश्यक!