Maharahstra Teacher Dress Code : महाराष्‍ट्रात शालेय शिक्षकांसाठी वस्‍त्रसंहिता लागू !

शिक्षण विभागाचा अभिनंदनीय निर्णय !

मुंबई – ‘शिक्षकांचा ‘पेहराव कसा असावा ?’ याविषयी महाराष्‍ट्र शासनाच्‍या शालेय शिक्षण विभागाने आदेश काढला आहे. राज्‍यातील स्‍थानिक स्‍वराज्‍य संस्‍था, खासगी, अल्‍पसंख्‍याक इत्‍यादी सर्व व्‍यवस्‍थापनांच्‍या अंतर्गत येणार्‍या अनुदानित, विनाअनुदानित, स्‍वयंअर्थसाहाय्‍यित, अल्‍पसंख्‍यांक व्‍यवस्‍थापनाच्‍या सर्व माध्‍यमांच्‍या, तसेच सर्व बोर्डांच्‍या शाळांतील शिक्षकांना हा नियम लागू असणार आहे.

महिला शिक्षकांनी साडी अथवा सलवार किंवा चुडीदार, कुर्ता, ओढणी, असा पेहराव, तर पुरुष शिक्षकांनी सदरा (शर्ट) आणि ट्राऊझर (विजार) (सदरा विजारीत खोचलेला (‘इन’ केलेला)) असा पोषाख करावा, असे या परिपत्रकात  म्‍हटले आहे. हे परिपत्रक शासनाच्‍या संकेतस्‍थळावर उपलब्‍ध आहे.

वरीलप्रमाणे प्रत्‍येक शाळा त्‍यांच्‍या शिक्षकांकरता एका ठराविक फिकट रंगाचा पेहराव ठरवून वस्‍त्रसंहिता (ड्रेसकोड) ठरवू शकणार आहे. ‘गडद रंगाचा, चित्र-विचित्र नक्षीकाम किंवा चित्रे असलेला, जीन्‍स, टी-शर्ट असा पेहराव शाळेमध्‍ये परिधान करू नये’, असेही या पत्रकात म्‍हटले आहे. एवढेच नव्‍हे, तर शिक्षकांनी पादत्राणेही पोषाखाला शोभतील अशी घालावीत. पुरुष शिक्षकांनी ‘शूज’ वापरावेत, असेही या परिपत्रकात म्‍हटले आहे.

‘शिक्षकांना त्‍यांच्‍या नावापूर्वी इंग्रजीत ‘टीआर्’ (Tr.) किंवा मराठीत ‘टि’ असे लावावे आणि तसे संबोधावे’, असा आदेश संबंधित शाळांच्‍या व्‍यवस्‍थापांना देण्‍यात आला आहे. या संदर्भातील एक बोधचिन्‍हही शासनाकडून सिद्ध करण्‍यात येणार असून ते शिक्षक त्‍यांच्‍या वाहनावर लावू शकणार आहेत. 

संपादकीय भूमिका

मंदिरांत वस्‍त्रसंहिता लागू झाल्‍यावर कोल्‍हेकुई करणार्‍यांना याविषयी काय म्‍हणायचे आहे ?