१. साधकाला फुप्फुसाशी संबंधित आजार होणे
‘वर्ष १९९२ मध्ये मी फुप्फुसाच्या आवरणात द्रवसंचय होणे (Plural effusion), या आजाराने ग्रस्त झालो होतो. त्या वेळी आधुनिक वैद्यांनी माझ्या फुप्फुसाच्या आवरणातील पाणी बाहेर काढले. त्यांनी मला ६ मासांसाठी क्षयरोगावर औषधे दिली.
२. गंभीर स्वरूपाचा आजार होऊनही साधक विविध सेवा करू शकणे
मी ३० वर्षांच्या कालावधीत अनेक आधुनिक वैद्यांना दाखवले. तेव्हा त्यांना आश्चर्य वाटत होते, ‘या आजारामुळे मला त्रास कसा होत नाही ?’ बहुतेक सर्व आधुनिक वैद्यांनी मला अत्यंत थंडीपासून दूर रहाणे आणि अन्य सावधगिरी बाळगायला सांगितली होती. वर्ष २००० पासून मी पूर्णवेळ साधना करू लागलो. या कालावधीत मला कसलाही त्रास झाला नाही. त्यामुळे मी या आजाराकडे लक्ष दिले नाही. उलट या कालावधीत मी विविध सेवा केल्या आणि जड साहित्यही उचलले, तरीही मला त्या रोगामुळे कधीही गंभीर समस्या निर्माण झाली नाही.
३. ‘फुप्फुसाच्या आवरणात पू (‘इम्पाईमा’) होणे; मात्र गुरुदेवांच्या कृपेमुळे ३० वर्षांमध्ये कसलीही अडचण न येणे
वर्ष २०१९ मध्ये माझ्या डाव्या पायाचा तळवा बधीर झाल्याने मी चालू शकत नव्हतो. यावर उपचार घेण्यासाठी मी रामनाथी आश्रमात आलो. माझ्या सर्व वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल सामान्य आले. आधुनिक वैद्यांना आजपर्यंत माझ्या आजाराचे कारण समजू शकले नाही. काही मासांनंतर माझ्या चालण्यात सुधारणा होऊ लागली; मात्र अजूनही माझा पायाचा तळवा बधीर होण्याचा त्रास पूर्णतः गेला नाही. त्या वेळी मााझ्या ‘सीटी स्कॅन’च्या (रोगाचे निदान करण्यासाठी शरिराच्या अंतर्गत अवयवांची छायाचित्रे काढण्याचे तंत्रज्ञान) अहवालात ‘माझा जुना आजार अंतिम टप्प्यात (‘इम्पाईमा’ होणे) आला आहे, म्हणजे माझ्या फुप्फुसाच्या आवरणात पू झाला आहे. त्याच्यावर ‘कॅलसिफिकेशन’ ही प्रक्रिया (त्यात ‘कॅलशियम’ जमा होणे) झाली आहे’, असे आढळले. त्यामुळे व्यक्तीला श्वास लागणे, थकवा येणे, बर्याच वेळा खोकला येणे इत्यादी त्रास होतात; मात्र गुरुदेवांच्या कृपेमुळे ३० वर्षांमध्ये मला या प्रकारची कसलीही अडचण आली नाही. त्या वेळी माझा अहवाल पाहून ‘गोवा वैद्यकीय महाविद्यालया’चे छातीच्या रोगासंबंधीचे शल्यचिकित्सक आधुनिक वैद्य बोरकर यांना ‘मला श्वसनासंदर्भात काहीच अडचण नाही’, याचे आश्चर्य वाटले. त्यांनी सांगितले, ‘‘३० वर्षांत तुम्हाला काही त्रास झाला नाही, तर पुढील ३० वर्षांत काही अडचण येईल’, असे वाटत नाही. तुमचा त्रास फारच वाढला, तर तुम्ही येथे येऊन शस्त्रकर्म करून घेऊ शकता.’’
४. ‘साइनोसाइटिस’चा त्रास होणे आणि आधुनिक वैद्यांनी फुप्फुसाशी संबंधित शस्त्रकर्म करायला सांगणे
अ. वर्ष २०२३ मध्ये मी वाराणसी येथे असतांना मला ‘साइनोसाइटिस’चा (चेहर्याच्या अस्थिपोकळींमध्ये सूज येणे) त्रास होऊ लागला. तेव्हा माझे नाकाचे शस्त्रकर्म करण्याचे निश्चित झाले. त्या वेळी शल्यचिकित्सकांनी मला सांगितले, ‘‘फुप्फुसात साठलेले पाणी काढणे अधिक योग्य आहे.’’
आ. मी सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांना याविषयी सांगितल्यावर त्यांनी सांगितले, ‘‘तुमचे सर्व अहवाल सामान्य आहेत, तर याचे शस्त्रकर्म आता करून घेणे योग्य आहे कि काही वर्षांनंतर केले तर चालेल का ?’, हे आधुनिक वैद्य पांडुरंग मराठे यांना विचारून घ्या.’’
इ. मी जुलै २०२३ मध्ये रामनाथी आश्रमात आल्यानंतर आधुनिक वैद्य मराठे यांनी मला शल्यचिकित्सकांना भेटायला सांगितले. शल्यचिकित्सकांनी मला ‘सीटी स्कॅन’ करायला सांगितले. आधुनिक वैद्य बोरकर यांनी माझा ‘सीटी स्कॅनचा’ अहवाल पाहून शस्त्रकर्म करायला सांगितले. तेव्हा मला वाटले, ‘माझा त्रास समूळ नष्ट होण्यासाठी गुरुदेवांच्या कृपेने शस्त्रकर्म ठरले.’ १५.९.२०२३ या दिवशी माझे शस्त्रकर्म करण्याचे निश्चित झाले.
५. गुरुदेवांच्या कृपेने मनात शस्त्रकर्माविषयी सकारात्मक विचार असणे आणि अंतर्मुखतेत वाढ होणे
गुरुदेवांच्या कृपेने माझ्या मनात शस्त्रकर्माविषयी कोणत्याही प्रकाराचे नकारात्मक विचार आले नाहीत. मला मनातून कृतज्ञता वाटत होती, ‘एवढ्या जुनाट आणि गंभीर आजारामुळे होऊ शकणारे कोणतेही त्रास गुरुदेवांच्या कृपेने मला झाले नाहीत. त्यांच्या कृपेने मला रामनाथी आश्रमात येता येऊन माझ्या प्रारब्धात जे अन्य आजार होते, तेही सुसह्य झाले.’ माझ्या शस्त्रकर्मापूर्वी एक मासाच्या कालावधीत मला बांधकाम क्षेत्राशी संबंधित सेवा आणि स्वभावदोष अन् अहं यांची निर्मूलन प्रक्रिया राबवण्याचा लाभ झाला. मी स्वभावदोष आणि अहं यांची निर्मूलन प्रक्रिया राबवल्यामुळे माझे व्यष्टी साधनेचे प्रयत्न वाढले अन् मन अंतर्मुख झाल्यामुळे अधिक सकारात्मक झाले.
६. शस्त्रकर्म झाल्यानंतर केलेल्या सर्व वैद्यकीय तपासणींचे अहवाल सामान्य येणे आणि ‘फुप्फुस सर्वसामान्य स्थितीत कार्य करत आहे’, असे आढळणे
माझे शस्त्रकर्म झाल्यानंतर मी २० घंट्यांनी डोळे उघडले. तेव्हा मला वाटले, ‘या लोकांनी अजूनपर्यंत माझ्यावर शस्त्रकर्म का केले नाही ?’ माझे शस्त्रकर्म झाल्यानंतर केलेल्या माझ्या सर्व वैद्यकीय तपासण्यांचे अहवाल सामान्य होते आणि ‘फुप्फुस सर्वसामान्य स्थितीत कार्य करत आहे’, असाही अहवाल आला. आधुनिक वैद्यांनी सांगितले, ‘‘शस्त्रकर्मामध्ये फुप्फुसाचा ७ इंच x ६ इंच x ३ इंच असा मोठा तुकडा पाठीपासून समोर छातीच्या दिशेने १२ इंच कापून बाहेर काढला आहे. तेव्हा लक्षात आले की, फुप्फुसाला कार्य करण्यासाठी जी जागा आवश्यक असते, ती अल्प झाली होती.’’
७. मी रुग्णालयातून आश्रमात, म्हणजे गुरूंच्या छत्रछायेखाली आल्यानंतर चैतन्यामुळे १ मासातच माझ्या शारीरिक स्थितीत पुष्कळ सुधारणा झाली. माझ्या मनावर शस्त्रकर्मामुळे होत असलेल्या शारीरिक वेदनांचा परिणाम होत नव्हता. माझे मन शांत आणि स्थिर होते.
८. परात्पर गुरु डॉ. आठवले यांची कृपा आणि श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा वात्सल्यभाव !
माझे शस्त्रकर्म झाल्यानंतर ५ दिवसांनी श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी सौ. सानिकाला (माझ्या पत्नीला) भ्रमणभाष करून अत्यंत प्रेमाने माझ्या प्रकृतीविषयी चौकशी केली. हे ऐकून माझ्या मनात कृतज्ञताभाव जागृत झाला. या ३० वर्षांच्या कालावधीत माझ्यावर आजाराचा पुष्कळ गंभीर परिणाम झाला असता; परंतु सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवांनी मला ते कधीच जाणवू दिले नाही आणि त्यांच्या कृपेमुळे माझे शस्त्रकर्म यशस्वी होऊन माझे मोठे प्रारब्धभोग संपले.
९. कृतज्ञता आणि प्रार्थना
हे सच्चिदानंद परब्रह्म गुरुदेवा, श्रीसत्शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि श्रीचित्शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ, आपल्या सर्वांच्या कृपेमुळे माझे प्रारब्धभोग सुसह्य होऊ शकले अन् मीही अनुभूती शब्दबद्ध करू शकलो. ‘मला प्रत्येक क्षणी आपल्याच चरणांच्या सेवेत समर्पित रहाता येऊ दे आणि माझे मन सतत आपल्या श्री चरणी शरणागत रहावे’, हीच प्रार्थना आहे.
मन में कृतज्ञता, चित्त पर शरणागति ।
रहे केवल इन दो शब्दों की स्मृति ।।
स्वीकार करें यह प्रार्थना गुरुदेव ।
यही याचक की एकमात्र विनती ।।’
– श्री. संजय सिंह, वाराणसी आश्रम (२७.१०.२०२३)
यजमानांच्या शस्त्रकर्माच्या वेळी गुरुदेवांच्या कृपेने स्थिर रहाता येणे‘गुरुदेव, केवळ आपल्या कृपेमुळेच मी माझ्या यजमानांच्या (श्री. संजय सिंह यांच्या) शस्त्रकर्माच्या वेळी सकारात्मक राहू शकले. मी रुग्णालयात रहाण्याची सिद्धताही उत्साहाने करत होते. मला ‘यजमानांनी शस्त्रकर्म करून घेणे’, हीही एक सेवाच आहे. यजमान रुग्णाईत नसून दुसरेच कुणीतरी रुग्णाईत आहेत’, असे वाटत होते. माझ्या यजमानांना शस्त्रकर्म करण्यासाठी शस्त्रकर्मगृहात नेले. तेव्हा थोड्या वेळाने तेथील कर्मचार्याने मला सांगितले, ‘‘रुग्णाने गुरुदेवांचे छायाचित्र मागितले आहे.’’ त्यांचे बोलणे ऐकून ‘यजमानांचे गुरुस्मरण चालू आहे’, याबद्दल माझी निश्चिती झाली. यजमानांना शस्त्रकर्मगृहात नेत असतांना मला अनुभवायला आले, ‘गुरुदेव त्यांच्या समवेत आहेत.’’ यजमानांच्या ४ घंट्यांच्या शस्त्रकर्मानंतर जेव्हा यजमानांना अतीदक्षता विभागात घेऊन जात होते, ‘तेव्हा त्यांच्या कपाळावरील टिळा आणि चेहरा यांवरील तेज पाहून असे वाटतच नव्हते की, ‘यांचे आताच शस्त्रकर्म झाले आहे.’ गुरुदेवांचा कृपाहस्त आमच्यावर नेहमीप्रमाणेच असल्यामुळे माझ्या यजमानांच्या शस्त्रकर्माच्या वेळी मला भीती, शंका किंवा चिंता वाटली नाही. ‘हे गुरुदेवा, आपल्या कृपेचे ऋण प्रत्येक क्षणी वाढतच चालले आहे’, याची जाणीव आमच्या मनात सदैव राहू दे. मी आपल्या ऋणातून उतराई होण्याचा विचारच करू शकत नाही. मला प्रत्येक क्षणी आपली चरणसेवा निर्मळ मनाने करता येऊ दे’, अशी आपल्या चरणी प्रार्थना आहे. ’ – सौ. सानिका संजय सिंह (श्री. संजय सिंह यांची पत्नी), वाराणसी आश्रम (२७.१०.२०२३) |