खासदार प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विरोधात मुंबईतील विशेष न्यायालयाकडून जामीनपात्र वॉरंट जारी !

मालेगाव बाँबस्फोट प्रकरण

मुंबई – भोपाळमधील भाजपच्या खासदार साध्वी प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विरोधात मुंबईतील विशेष न्यायालयाने जामीनपात्र वॉरंट जारी केले आहे. वर्ष २००८ मध्ये झालेल्या मालेगाव बाँबस्फोट प्रकरणात त्या आरोपी आहेत. न्यायालयीन सुनावणीच्या काळात वेळोवेळी अनुपस्थित राहिल्यामुळे न्यायालयाने त्यांना हे वॉरंट जारी केले आहे.

प्रज्ञासिंह ठाकूर, तसेच मालेगाव बाँब प्रकरणातील अन्य आरोपींना मुंबईच्या विशेष न्यायालयाने ११ मार्च या दिवशी उपस्थित रहाण्याचा आदेश दिला होता; पण प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या अधिवक्त्याने त्यांची प्रकृती ठीक नसल्याचे न्यायालयात सांगत सवलत देण्याची मागणी केली होती. विशेष न्यायाधीश ए.के. लाहोटी यांनी मात्र हा अर्ज फेटाळत प्रज्ञासिंह ठाकूर यांच्या विरोधात जामीनपात्र वॉरंट जारी केले. प्रज्ञासिंह ठाकूर न्यायालयात उपस्थित राहून कायदेशीर प्रक्रियेच्या माध्यमातून हे वॉरंट रहित करू शकतात. न्यायालयाने मालेगाव बाँबस्फोट प्रकरणी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला येत्या २० मार्चपर्यंत अहवाल सादर करण्याचाही आदेश दिला आहे.