रेल्वे प्रवास म्हटला की, सध्या तो सुखदायक न ठरता त्रासदायक ठरण्याचे प्रमाण वाढत आहे. त्याचे एक महत्त्वाचे कारण म्हणजे नियोजित वेळेत न येणारी आणि वेळेत न पोचणारी रेल्वेगाडी ! काही दिवसांपूर्वीच कोकणातून पनवेलला येणारी जनशताब्दी एक्सप्रेस सावंतवाडीहून वेळेत सुटूनही पनवेल येथे २ घंटे विलंबाने पोचली. अशीच स्थिती बहुतांश ‘एक्सप्रेस रेल्वें’ची आहे. विविध राज्यांतून येणार्या लांब पल्ल्याच्या रेल्वे नियोजित स्थानकांवर नियोजित वेळेत पोचल्याचे क्वचितच पहायला मिळते. लांब पल्ल्याच्या रेल्वे बहुतेक वेळा ३-४ घंटे किंवा काही वेळा तर ५-६ घंट्यांहूनही अधिक विलंबाने धावतात. यामुळे प्रवाशांना नाहक मनस्ताप होतो. कित्येकांचे शिव्याशापही रेल्वे प्रशासनाला मिळतात. यामुळे काही ठराविक प्रवासमार्गावरील प्रवाशांच्या मनात ‘काही ठराविक रेल्वेगाड्या म्हणजे विलंबच’, हे समीकरणच बनले आहे, जे भारतीय रेल्वे प्रशासनासाठी लज्जास्पद आणि खेदजनक आहे.
भारतात रेल्वेचे मोठे जाळे असून प्रवासी आणि वाहतूक यांसाठीचे ते महत्त्वाचे माध्यम आहे. प्रतिदिन लाखो प्रवासी रेल्वेप्रवास करतात. देशभराचा विचार केल्यास ‘एक्सप्रेस’ने प्रवास करणार्यांची संख्या अधिक आहे. महाराष्ट्रात कोकण रेल्वेतून प्रवास करणार्यांची संख्या अधिक आहे. रेल्वे प्रशासन प्रवाशांच्या सोयीसाठी विविध सुविधा आणत आहे. त्या सुविधाही चांगल्याच आहेत; परंतु ‘वेळ’ या घटकालाही महत्त्व द्यायला हवे. रेल्वे वेळेत का पोचत नाहीत ? त्यामागे अडचणी काय आहेत ? त्रुटी काय आहेत ? त्यानुसार काय उपाययोजना काढायला हव्यात ? याचा सखोल अभ्यास आणि सुधारणा होणे आवश्यक आहे. पावसाळा किंवा दुरुस्तीची कामे या कालावधीत रेल्वे प्रशासन वाहतुकीच्या पालटलेल्या वेळा घोषित करते; परंतु प्रत्यक्षात धावणार्या रेल्वेच्या वेळांमध्ये पुष्कळ तफावत असते. गणेशोत्सव, दिवाळी इत्यादी सणांच्या कालावधीत अतिरिक्त गाड्या सोडल्या जातात; पण मार्ग एकच असतो. अशा वेळी मोठ्या एक्सप्रेस रेल्वेच्या ‘क्रॉसिंग’साठी थांबत थांबत धावणार्या अन्य रेल्वेगाड्यांना विलंब होतो. त्यामुळे अशा स्थितीत त्या कधी कधी ४-५ घंटेही विलंबाने धावतात. त्यामुळे लोकांची पुष्कळ असुविधा होऊन त्यांचे दैनंदिन नियोजन कोलमडते. कित्येकांची बरीच गैरसोय होते.
भारतीय रेल्वे हा सर्वसामान्यांचा आधार आहे; परंतु आधार टिकून रहाण्यासाठी आणि वेळेच्या संदर्भातील विश्वासार्हता मिळवण्यासाठी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना होणार्या असुविधेचा गांभीर्याने विचार करून संवेदनशीलतेने त्यावर प्रयत्न करणे आवश्यक आहे. जर मिनिटाला असणार्या लोकल रेल्वे वेळेत धावू शकतात, तसेच लांब पल्ल्याच्या रेल्वेच्या संदर्भातही असेच व्हावे, असेच सर्वसामान्यांना वाटते !
– श्री. संदेश नाणोसकर, सनातन आश्रम, देवद, पनवेल.