पोलिसांनी घेतले मंदिराचे दायित्व
सांखळी, ८ मार्च (वार्ता.) : हरवळे येथील श्रीक्षेत्र रुद्रेश्वर देवस्थान येथे महाशिवरात्रीच्या निमित्ताने आयोजित अभिषेक आणि आरती यांच्या मानपानावरून देवस्थान समिती अन् वरचे हरवळे येथील गावकर यांच्यामध्ये वाद उफाळून आला. यामुळे मंदिर परिसरात सकाळपासून तणावाचे वातावरण निर्माण झाले. यामुळे काही काळ भाविकांसाठी दर्शन थांबवण्यात आले होते. शेवटी उपजिल्हाधिकार्यांच्या सूचनेप्रमाणे घटनास्थळी पोलीस नेमण्यात येऊन भाविकांना दर्शनासाठी सोडण्यात आले. त्यानंतर दुपारी पुन्हा वाद उफाळल्यानंतर उपजिल्हाधिकार्यांनी समितीचे पदाधिकारी आणि वरचे हरवळे येथील ग्रामस्थ यांना मंदिरातून बाहेर पडण्याचा आदेश दिला.
हरवळे येथील श्रीक्षेत्र रुद्रेश्वर देवस्थानचा कारभार भंडारी समाजाच्या महाजनांकडे आहे आणि देवस्थानच्या समितीवर भंडारी समाजाचे महाजन आहेत. या मंदिरात हरवळे आणि कुडणे येथील गावकर महाजनांचाही मानपान असतो. या मानपानाच्या सूत्रावरून गेल्या काही वर्षांपासून देवस्थानात वाद चालू आहे; मात्र वेळोवेळी प्रशासनाच्या हस्तक्षेपानंतर सामोपचाराने वाद मिटवला जातो. ८ मार्च या दिवशी सकाळी महाशिवरात्रीच्या निमित्ताने देवस्थान समितीचे अध्यक्ष यशवंत माडकर पहिल्या अभिषेकासाठी पुढे सरसावल्यानंतर वरचे हरवळे येथील ग्रामस्थांनी त्याला आक्षेप घेतला. यामुळे वाद उफाळून आला. या वेळी गोव्यातील विविध भागांतून आलेले शिवभक्त अभिषेक आणि दर्शन यांसाठी प्रतीक्षेत होते. वाद उफाळून आल्यानंतर दर्शन बंद करण्यात आले. यानंतर उपजिल्हाधिकारी, पोलीस उपअधीक्षक, पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक मोठ्या फौजफाट्यासह मंदिरात पोचले. प्रशासनाने दोन्ही गटांना या विषयावर बैठक घेऊन तोडगा काढण्याचे सुचवले आणि भाविकांसाठी दर्शनाचा मार्ग मोकळा केला.