नेरळ (कर्जत, जिल्हा रायगड) येथील पखवाजवादक श्री. छगन निमणे यांनी केलेल्या पखवाजवादनाचे ६३ टक्के आध्यात्मिक पातळीचे श्री. निषाद देशमुख यांनी केलेले सूक्ष्म परीक्षण !

‘३.२.२०२४ या दिवशी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातील आध्यात्मिक संशोधन केंद्रात नेरळ (कर्जत, जिल्हा रायगड) येथील पखवाजवादक श्री. छगन निमणे यांचे पखवाजवादनाचे प्रयोग घेण्यात आले. पहिल्या प्रयोगात श्री. निमणे यांनी श्री. जोशी यांच्यासह संवादिनीवरील (पेटीवरील) लेहरावादनासमवेत (टीप १) पखवाजावर चौतालाचे (हा १४ मात्रांचा ताल आहे.) वादन केले आणि दुसर्‍या प्रयोगात त्यांनी विनालेहरा केवळ पखवाजावर चौतालाचे वादन केले. या दोन्ही प्रयोगांचे मी केलेले सूक्ष्म परीक्षण येथे दिले आहे.

 

(टीप १ : अ. लेहरा म्हणजे लयदर्शक गत.
आ. ‘लय’ म्हणजे एखादी रचना वाजवतांना जी एकसारखी गती असते, तिला ‘लय’ म्हणतात.
इ. शास्त्रीय रागगायनात गायल्या जाणार्‍या गीताच्या ध्रुवपदाला बंदिश म्हणतात, त्याप्रमाणे वादनासाठी जी बंदिश वाजवतात, तिला ‘गत’ असे म्हणतात.)

ईश्वरप्राप्तीसाठी संगीतयोग

१. पखवाजवादक श्री. छगन निमणे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

श्री. छगन निमणे

१ अ. निर्मळ मन : श्री. छगन निमणे यांचे मन पुष्कळ निर्मळ आहे. यामुळे पखवाजवादन करतांना ते भूतकाळातील विचारांमध्ये न गुंतता सहजतेने पखवाजवादनाच्या अनुसंधानात रहात होते.

१ आ. शिकण्याची वृत्ती : श्री. निमणे यांच्यात शिकण्याची वृत्ती आहे. मागील २० वर्षांपासून पखवाजवादन करतांना त्यांनी ‘पखवाज सात्त्विक पद्धतीने कसा वाजवावा ?’, हे  शिकून घेतले आहे.

१ इ. जिज्ञासा : त्यांना त्यांच्या पखवाजवादनाच्या प्रयोगानंतर ‘सूक्ष्म परीक्षणात सूक्ष्म स्तरावर काय जाणवले ?’, हे जाणण्याची जिज्ञासा होती.

१ ई. ऐकण्याची वृत्ती : श्री. निमणे यांच्यात ‘ऐकण्याची वृत्ती’ हा प्रधान गुण आहे. ते सहजतेने इतरांची इच्छा ‘आज्ञा’ म्हणून स्वीकारतात आणि त्यानुसार वागतात.

१ उ. भोळा भाव : त्यांच्यात भोळा भाव आहे. त्यामुळे ते वयाने लहान असलेल्या सात्त्विक जिवांना ओळखून त्यांच्याशी आदराने वागत होते. येथे आल्यापासून त्यांना ६१ टक्के आध्यात्मिक पातळीच्या दैवी बालिका कु. अपाला औंधकर (वय १६ वर्षे) आणि कु. अंजली कानस्कर (वय १७ वर्षे) यांच्यामध्ये देवीतत्व जाणवत होते.

२. लेहरावादना समवेत केलेले पखवाजवादन आणि विनालेहरा केलेले पखवाजवादन यांत जाणवलेला सूक्ष्मस्तरीय भेद

 

३. पखवाजवादनाची जाणवलेली अन्य वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे

श्री. निषाद देशमुख

३ अ. दोन वाद्ये एकमेकांच्या साथीने सात्त्विक पद्धतीने वाजवल्यामुळे रजोगुणात अल्प वाढ होणे : जेव्हा दोन वाद्ये एकमेकांच्या साथीने वाजवली जातात, तेव्हा त्यांच्यातील नादांचे आपसात घर्षण होत असल्यामुळे रजोगुणात वाढ होते; मात्र या प्रयोगात नेरळ (कर्जत) येथील शास्त्रीय गायक श्री. धनंजय जोशी यांनी सात्त्विक पद्धतीने संवादिनीचे वादन करून त्यांना साथ दिल्यामुळे रजोगुणात अधिक प्रमाणात वाढ झाली नाही. पुढील सारणीतून हे लक्षात येते.

३ आ. लेहरा वादनासमवेत केलेल्या पखवाजवादनात पुष्कळ प्रकट शक्ती जाणवणे : पहिल्या प्रयोगात लेहरा वादनासमवेत केलेल्या पखवाजवादनात आरंभापासून ४० टक्के प्रकट शक्ती कार्यरत होती. प्रयोगात पुढे प्रकट शक्तीच्या प्रमाणात वाढ होऊन ती ४५ टक्के झाली. तेव्हा मला सूक्ष्मातून अनुक्रमे श्री दुर्गादेवी आणि त्यानंतर भगवान नृसिंह यांचे दर्शन झाले; याउलट दुसर्‍या प्रयोगात श्री. निमणे यांनी विनालेहरा पखवाजवादन केले, तेव्हा मला ‘प्रकट आणि अप्रकट शक्ती सम प्रमाणात आहे’, असे जाणवले. त्या प्रयोगात मला भगवान श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवले.

३ इ. देवत्वयुक्त बोल (टीप २) आणि पखवाजवाद्याचा नाद यांच्या एकत्रित नादामुळे एका साधिकेला होणारा वाईट शक्तींचा त्रास पुष्कळ प्रमाणात वाढणे : पहिल्या प्रयोगात श्री. निमणे यांनी बोल म्हणत श्री गणपतीची वंदना केली आणि वंदनाचा एक भाग म्हणून पखवाजवर थाप दिली. त्या क्षणी एका साधिकेला होणारा वाईट शक्तींचा त्रास पुष्कळ वाढला.

(टीप २ – बोल : तालवादनात वाद्यातून जी अक्षरे वाजवली जातात, त्यांना ‘बोल’ असे म्हणतात, उदा. धा, धीं, तिरकीट इत्यादी.)

३ ई. पखवाजवादनाला भाव आणि देवत्व यांची जोड मिळाल्यामुळे त्याच्या नादातून निर्माण होणारी प्रकट शक्ती ५० टक्क्यांहून अधिक होऊन साधिकेला होणारा वाईट शक्तींचा त्रास वाढणे : तबल्याच्या तुलनेत पखवाजाचा नाद अधिक सात्त्विक असून तो थेट सुषुम्ना नाडीवर परिणाम करतो. या सात्त्विक नादाला वादकातील भाव आणि देवत्व यांची जोड मिळाल्यामुळे नादातील प्रकट शक्ती ५० टक्के झाली. असा चैतन्यमय आणि प्रकट शक्तीयुक्त नाद सहन न झाल्यामुळे साधिकेला होणारा वाईट शक्तींचा त्रास पुष्कळ वाढला. नंतर पूर्ण प्रयोगात त्या साधिकेवर आध्यात्मिक स्तरावरील उपाय होत होते. यातून ‘वादनाला भाव आणि देवत्व यांची जोड मिळाल्यास नादातील प्रकट शक्तीत वाढ होते’, हे शिकता आले.

३ उ. विनालेहरा पखवाजवादन करतांना वादकाच्या अनुसंधानात वाढ झाल्यामुळे आध्यात्मिक स्तरावरील उपाय अधिक प्रमाणात होणे : लेहरा वादनासहित पखवाजवादनाच्या तुलनेत विनालेहरा पखवाजवादन करतांना श्री. निमणे यांचे वादनाशी अनुसंधान अधिक प्रमाणात होते. यामुळे पहिल्या प्रयोगाच्या तुलनेत दुसर्‍या प्रयोगात साधकांवर अधिक प्रमाणात आध्यात्मिक स्तरावरील उपाय झाले. पहिल्या प्रयोगात वाईट शक्तींचा तीव्र त्रास होणार्‍या अनेक साधकांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास होतांना दिसत होते; पण त्याचा कालावधी अल्प होता; याउलट दुसर्‍या प्रयोगात साधकांना होणारे त्रास अधिक तीव्र आणि अधिक कालावधीसाठी होत होते.

३ ऊ. तबल्याच्या तुलनेत पखवाजवादनाचा होणारा परिणाम : तबल्याचे ‘तबला’ आणि ‘डग्गा’ असे २ भाग असतात. तबला वाजवल्यावर सूर्यनाडी चालू होते, तर केवळ डग्गा वाजवल्यावर चंद्रनाडी चालू होते. साधक-कलाकाराने तबला वाजवल्यावर आधी चंद्रनाडी, नंतर सूर्यनाडी आणि त्यानंतर सुषुम्ना नाडी या क्रमाने नाड्या जागृत होतात; याउलट पखवाज वादनामुळे थेट सुषुम्ना नाडीवर परिणाम होऊन ती जागृत होते.

३ ए. तबलावादनामुळे प्रथम शरिरातील नाभीखालच्या चक्रांवर परिणाम होऊन नंतर वरच्या चक्रांवर परिणाम होतो; याउलट पखवाजवादनामुळे थेट सातही चक्रांवर परिणाम होतो.

३ ऐ. पखवाजवादनामुळे वाईट शक्तींचा तीव्र त्रास होणार्‍या साधकांच्या आज्ञाचक्रावर परिणाम होणे : पखवाजवादनाच्या वरील दोन्ही प्रयोगांत वाईट शक्तींचा तीव्र त्रास होणार्‍या अनेक साधकांच्या आज्ञाचक्रावर परिणाम होतांना जाणवला.

४. कृतज्ञता

‘सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेने ‘नादब्रह्मा’शी निगडित वादनकलेच्या प्रयोगात सहभागी होता आले आणि त्या संदर्भात सूक्ष्म परीक्षण करून ते लिहून देता आले’, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता.’

– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान, आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (५.२.२०२४, सकाळी १०.३३ ते ११.०२ आणि दुपारी १२.४० ते १.१०)

  • वाईट शक्ती : वातावरणात चांगल्या आणि वाईट शक्ती कार्यरत असतात. चांगल्या शक्ती चांगल्या कार्यासाठी मानवाला साहाय्य करतात, तर वाईट शक्ती त्याला त्रास देतात. पूर्वीच्या काळी ऋषिमुनींच्या यज्ञांत राक्षसांनी विघ्ने आणल्याच्या अनेक कथा वेद-पुराणांत आहेत. ‘अथर्ववेदात अनेक ठिकाणी वाईट शक्ती, उदा. असुर, राक्षस, पिशाच तसेच करणी, भानामती यांचा प्रतिबंध करण्यासाठी मंत्र दिले आहेत. वाईट शक्तींच्या त्रासांच्या निवारणार्थ विविध आध्यात्मिक उपाय वेदादी धर्मग्रंथांत सांगितले आहेत.
  • आध्यात्मिक त्रास : याचा अर्थ व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने असणे. व्यक्तीमध्ये नकारात्मक स्पंदने ५० टक्के किंवा त्यांहून अधिक प्रमाणात असणे, म्हणजे तीव्र त्रास, नकारात्मक स्पंदने ३० ते ४९ टक्के असणे, म्हणजे मध्यम त्रास, तर ३० टक्क्यांहून अल्प असणे, म्हणजे मंद आध्यात्मिक त्रास असणे होय. आध्यात्मिक त्रास हा प्रारब्ध, पूर्वजांचे त्रास आदी आध्यात्मिक स्तरावरील कारणांमुळे होतो. आध्यात्मिक त्रासाचे निदान संत किंवा सूक्ष्म स्पंदने जाणू शकणारे साधक करू शकतात.
  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • सूक्ष्मातील दिसणे, ऐकू येणे इत्यादी (पंच सूक्ष्मज्ञानेंद्रियांनी ज्ञानप्राप्ती होणे) : काही साधकांची अंतर्दृष्टी जागृत होते, म्हणजे त्यांना डोळ्यांना न दिसणारे दिसते, तर काही जणांना सूक्ष्मातील नाद किंवा शब्द ऐकू येतात.
  • सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक