Bangladesh Hindu Murder : बांगलादेशात सेवाश्रम मंदिरात वृद्ध महिला पुजार्‍याची चोरीच्या उद्देशाने हत्या

बांगलादेशातील हिंदू असुरक्षित !

गोपालगंज (बांगलादेश) – येथे मालीबाटा विश्‍वबंधू सेवाश्रम मंदिरात पुजारी म्हणून काम करणार्‍या हशिलता बिस्वास (वय ७० वर्षे) या वृद्ध महिला पुजार्‍याची हत्या करण्यात आली. त्यांचे तोंड कपड्याने बंद करण्यात आले होते, तर त्यांचे हात दोरीने बांधण्यात आले होते. हत्येनंतर मंदिरात गेलेल्या लोकांनी मंदिरातील दानपेटी आणि कपाट उघडे दिसले. त्यांतील मौल्यवान वस्तू आणि पैसे चोरल्याचे दिसून आले. यामुळे ही हत्या चोरीच्या उद्देशाने झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात आला आहे. पोलीस या हत्येचे अन्वेषण करत आहेत.

१. हशिलता बिस्वास या गेल्या एक वर्षापासून मालीबाटा विश्‍वबंधू सेवाश्रम मंदिरात पुजारी म्हणून कार्यरत होत्या. याआधी त्यांचे पती दीपिन बिस्वास १० वर्षे येथील काम पहात होते. दीपिन बिस्वास यांचे वर्षभरापूर्वी निधन झाले. पतीच्या निधनानंतर हशिलता यांनी सेवाश्रमातील पूजेचे काम हाती घेतले.

२. मालीबाटा विश्‍वबंधू सेवाश्रमच्या सचिवांनी या हत्येचा निषेध केला आहे. याआधीही आश्रमात चोरीच्या अनेक घटना घडल्याचे त्यांनी सांगितले.

३. गोपालगंज जिल्ह्यातील ‘हिंदु-बौद्ध-ख्रिस्ती ऐक्य परिषदे’चे अध्यक्ष पल्टू बिस्वास यांनी दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.