India On Gaza Crisis : गाझामधील हिंसाचार स्वीकारार्ह नाही ! – भारत

भारताच्या संयुक्त राष्ट्र महासभेच्या प्रतिनिधी रुचिरा कंबोज

न्यूयॉर्क – भारताने इस्रायलला गाझामधील तणाव अल्प करण्याचे आणि हिंसाचार थांबवण्याचे आवाहन केले आहे. भारताच्या स्थायी प्रतिनिधी रुचिरा कंबोज यांनी ४ मार्च  या दिवशी संयुक्त राष्ट्र महासभेत सांगितले की, भारताने नेहमीच सर्व प्रकारच्या आतंकवादाचा विरोध केला आहे. त्या म्हणाल्या की, हिंसाचारात होणारे मृत्यू थांबवणे आवश्यक आहे. प्रत्येक परिस्थितीत आंतरराष्ट्रीय कायद्याचा आदर केला पाहिजे. गाझा आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायल-हमास संघर्षात आतापर्यंत ३० सहस्रांहून अधिक लोक मारले गेले आहेत. भारताने पॅलेस्टाईनच्या लोकांना मानवतावादी दृष्टीकोनातून साहाय्य केले आहे आणि यापुढेही करत राहील.

१. महासभेचे अध्यक्ष डेनिस फ्रान्सिस यांनी तात्काळ युद्धविराम आणि ओलीसांची सुटका करण्याचे आवाहन केले. ‘युद्धामुळे होणारा प्रत्येक मृत्यू हा आपल्या सामूहिक विवेकावर डाग असतो’, असे ते म्हणाले.

२. अमेरिकेचे उप-स्थायी प्रतिनिधी रॉबर्ट वुड यांनी सांगितले की, किमान ६ आठवडे तात्काळ युद्धविराम झाला पाहिजे.

३. अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिस यांनी तात्काळ युद्धविराम करण्याचे आवाहन केले.

४. इस्रायलचे स्थायी प्रतिनिधी गिलाड एर्डन यांनी संयुक्त राष्ट्र संघाला हमासचा सहयोगी  संबोधले. ते म्हणाले की, इस्रायलवर आतंकवादी आक्रमण करणार्‍या हमासला संयुक्त राष्ट्रांनी हमासचा निषेध केलेला नाही.