Karnataka Mandir Parishad : देवस्थानांच्या अभिवृद्धीसाठी राज्य सरकारने अनुदान द्यावे !

  • कर्नाटक देवस्थान मठ आणि धार्मिक संस्था महासंघाची मागणी

  • नेलमंगल (कर्नाटक) येथील मंदिर परिषद  

डावीकडून श्री. अण्णैया स्वामी, श्री. रवि, दीपप्रज्वलन करतांना पूज्य श्री श्री महास्वामीजी आणि श्री. मोहन गौडा

नेलमंगल (कर्नाटक) : कर्नाटक सरकारने शेकडो कोटी रुपये अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळांना दिले आहेत; परंतु हिंदूंच्या धार्मिक स्थळांना अर्थसंकल्पात एक पैसाही  दिलेला नाही. राज्यातील ३४ सहस्र पुजार्‍यांना कोणतेही मानधन मिळत नाही; परंतु इमामांना ८ सहस्र रुपये मानधन दिले जाते. वक्फ बोर्डाच्या भूमींच्या कुंपणासाठी ३४ कोटी ५१ लाख रुपये संमत करण्यात आले आहेत; परंतु देवस्थानांच्या भूमींच्या रक्षणासाठी तरतूद करण्यात आलेली नाही. १० कोटी रुपये किमतीच्या देवस्थानच्या भूमींवर अतिक्रमण झालेले आहे. देवस्थानांच्या अभिवृद्धीसाठी सरकारने अनुदान दिले पाहिजे, अशी मागणी कर्नाटक देवस्थान, मठ आणि धार्मिक संस्था महासंघाचे संयोजक श्री. मोहन गौडा यांनी केली. ते हिंदु जनजागृती समिती आणि देवस्थान महासंघ यांच्या वतीने अरिशिनकुंटे येथील मारुति नगर येथे आयोजित करण्यात आलेल्या देवस्थान परिषदेत बोलत होते. नेलमंगलचे श्रीपवाड बसवण्णा देव मठाचे पूज्य श्री श्री सिद्धलिंग महास्वामीजी, नेलमंगल पूरसभा सदस्य श्री. रवि आणि श्री वैष्णव संघाचे अध्यक्ष श्री. अण्णैया यांच्या हस्ते दीपप्रज्वलनाद्वारे परिषदेचे उद्घाटन झाले. या परिषदेला विविध देवस्थानांचे विश्‍वस्त, देवस्थानाचे प्रतिनिधी पुरोहित, अर्चक यांच्यासह १५० पेक्षा अधिक प्रतिनिधी उपस्थित होते.

मठांच्या माध्यमातून समाजाला सुसंस्कृत करण्याचे कार्य झाले पाहिजे ! – पूज्य श्री श्री सिद्धलिंग महास्वामीजी

देवस्थानच्या रक्षणासाठी लढा देणे ही आजच्या वेळेची आवश्यकता आहे. समाजात असाध्य असलेले साध्य करण्याची शक्ती आपल्या देवस्थानांमध्ये आहे. देवस्थानच्या मठांच्या माध्यमातून समाजाला सुसंस्कृत करण्याचे कार्य झाले पाहिजे.

१. आपल्या देवालयांच्या संपत्तीची नोंदणी करून त्या संपत्तीचे रक्षण केले पाहिजे. धर्मकार्य करणार्‍या देवस्थानांचे रक्षण करून त्यांना राखले, तरच आपण टिकू शकू. आपण राहिलो, तर आपले राष्ट्र राहील. – श्री. रवि, सदस्य, नेलमंगल पूरसभा

२. आपल्यात धार्मिक शिक्षणाची आणि इतिहासाची उणीव आहे, हे जाणून देवस्थानच्या माध्यमातून हिंदूंना धर्मशिक्षण देणे अत्यावश्यक झाले आहे. – श्री. रंगाचार्य, प्रमुख, आचार्य गुरु परंपरा शाळा