पुणे येथील ‘ड्रग्ज रॅकेट’च्या अन्वेषणात ‘इंटरपोल’चे साहाय्य !

‘रेड कॉर्नर’ नोटीस बजावणार

(रेड कॉर्नर नोटीस म्हणजे प्रत्यार्पण, आत्मसमर्पण करणे किंवा तत्सम कायदेशीर कारवाई प्रलंबित असलेल्या व्यक्तीस शोधून तिला तात्पुरती अटक करण्यासाठी कायद्याची कार्यवाही करणे)

पुणे – पुणे ड्रग्ज प्रकरणातील मुख्य सूत्रधार संदीप धुनियाचे नाव समजल्यामुळे त्याच्या अन्वेषणासाठी ‘इंटरपोल’ (आंतरराष्ट्रीय गुन्हेगारांना पकडणारी संघटना)चे साहाय्य घेतले जाणार आहे. संदीप धुनियाला सीबीआयच्या साहाय्याने पुणे पोलिसांनी ‘रेड कॉर्नर’ नोटीस बजावण्याचे ठरवले असून सध्या हा मुख्य आरोपी आखाती देशातील कुवैतमध्ये असल्याची माहिती पोलिसांच्या हाती लागली आहे, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली. या खटल्यासाठी विशेष अधिवक्त्यांची नेमणूक करून जलदगती न्यायालयात खटला चालवला जाणार आहे. आजवर ३ सहस्र ५०० कोटी रुपयांचे साधारण १ सहस्र ७६० किलो मेफेड्रोन पकडण्यात आले आहे. या ड्रग्ज प्रकरणाच्या अन्वेषणात राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.), सीबीआय, एन्.सी.बी. आदी राष्ट्रीय यंत्रणांसह राज्याचे आतंकवादविरोधी पथकही सहभागी झाले आहे. आतंकवादाला पैसा पुरवणे, ‘अंडरवर्ल्ड’ यांसह हवाला रॅकेटचेही अन्वेषण केले जात आहे. या प्रकरणी पोलीस हवालदार विठ्ठल साळुंखे यांनी तक्रार दिली आहे.

आयुक्त अमितेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार धुनिया हा मूळचा भारतीय असला तरी त्याच्याकडे ब्रिटीश पासपोर्ट आहे. आरोपीने नेपाळमध्ये मेफेड्रोन ठेवण्यासाठी जागा शोधण्याचा प्रयत्न केला. देहलीमध्ये पुणे पोलिसांनी पकडलेले मेफेड्रोन नेपाळमध्ये लपवून ठेवले जाणार होते. तेथून ते लंडनमध्ये पाठवले जाणार होते.

२ सहस्र किलो ड्रग्ज निर्मितीचे लक्ष्य !

आयुब मकानदार, विपिन कुमार आणि संदीप हे तिघेही येरवडा कारागृहात होते. तेथेच आरोपी माने आणि हैदर शेख यांच्या संपर्कात हे ड्रग्ज तस्कर आले. या ठिकाणी ‘ड्रग्ज रॅकेट’ची नवी टोळी सिद्ध झाली. संदीप कारागृहामधून जामिनावर बाहेर आल्यानंतर पुन्हा ड्रग्ज निर्मितीकडे वळला. (कारागृहामध्ये आरोपींना धर्मशिक्षण देऊन त्यांच्याकडून साधना करवून घेतल्यास त्यांच्यामध्ये पालट होऊन ते गुन्हेगारीकडे वळणार नाहीत, यासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे ! – संपादक) त्याने युवराज भुजबळ याला २ सहस्र किलो ड्रग्ज निर्मितीचे लक्ष्य दिले होते. त्याने देशभरातील विविध ‘रासायनिक आस्थापने’ आणि प्रयोगशाळा यांना अशाच प्रकारे ड्रग्ज निर्मितीचे काम दिल्याचा संशय पोलिसांना आहे. वर्ष २०१६ मध्ये ‘डी.आर्.आय.’ने केलेल्या कारवाईतही त्याने अशाच प्रकारे ‘रसायनतज्ञांचे’चे साहाय्य घेतले होते. यातील काही जण अद्याप कारागृहात आहेत. त्यांच्याकडेही चौकशी केली जाणार आहे.

‘पुरवठा साखळी’वर लक्ष केंद्रित ! 

ड्रग्ज निर्मिती झाल्यानंतर हे मेफेड्रोन कुठे कुठे आणि कुणाकुणाला पाठवले जात होते याचा शोध घेतला जात आहे. पुढील अन्वेषणात छोट्या प्रमाणावर सर्वसामान्यांना ड्रग्ज विकणार्‍यांवर लक्ष केंद्रित केले आहे. या प्रकरणात आणखी ५ जणांना अटक केली जाण्याची शक्यता आहे. त्यांच्या शोधासाठी देशाच्या विविध भागांत पथके रवाना करण्यात आली आहेत. जवळपास १६ पथके लहान विक्रेते, माल पोचवणारे यांच्या शोधात असल्याचे आयुक्तांनी सांगितले.