ABVP Jharkhand : झारखंडच्या विश्‍वविद्यालयांमध्ये ४० टक्के पदे रिकामी ! – अभाविप

  • अभाविपचे राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल यांचे झारखंडच्या राजभवनासमोर धरणे आंदोलन !

  • ५ विश्‍वविद्यालयांत कुलगुरु नाहीत !

  • पेपर फुटल्याने नियुक्ती परीक्षा स्थगित !

अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल

रांची (झारखंड) – राज्यातील ५ विश्‍वविद्यालयांमध्ये गेल्या ९ महिन्यांपासून कुलगुरु आणि उपकुलगुरु यांची पदे रिकामी आहेत. तसेच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या ४० टक्क्यांपेक्षा अधिक जागा रिकाम्या आहेत, असे वक्तव्य अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल यांनी येथील राजभवनाच्या समोर झालेल्या धरणे आंदोलनात राज्यभरातील सहस्रावधी विद्यार्थ्यांना संबोधित करतांना केले.

ते पुढे म्हणाले की,

१. २ सहस्र १७ सरकारी पदे भरण्यासाठी चालू केलेल्या नियुक्त्यांची प्रक्रिया परीक्षेचा पेपर फुटल्याने स्थगित करण्यात आली.

२. कनिष्ठ अभियंत्यांच्या १ सहस्र ५६० पदांसाठी नियुक्ती परीक्षा होऊन चार महिने उलटले आहेत, तरी अद्याप निकाल घोषित करण्यात आलेला नाही.

३. प्रयोगशाळांमधील प्राथमिक स्तरावरील सुविधांच्या अभावामुळे शैक्षणिक उपक्रम बंद आहेत.

४. वाचनालयांमध्ये अभ्यासक्रमानुसार पुस्तके उपलब्ध नाहीत.

५. राज्यातील विश्‍वविद्यालयांत चार वर्षांपासून विद्यार्थी संघटनेच्या निवडणुका पार पडलेल्या नाहीत.

६. राज्यात शैक्षणिक अराजकतेची स्थिती निर्माण झाली आहे.

संपादकीय भूमिका

शैक्षणिक क्षेत्रात अराजकसदृश परिस्थिती !