डोंबिवली येथे तरुणाला मारहाण करणारे ३-४ जण अटकेत !
डोंबिवली – मद्यपान केलेल्या ८ ते १० जणांनी एका महाविद्यालयीन तरुणाला मारहाण केली होती. या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला असून पोलिसांनी ३ ते ४ जणांना अटक केली आहे; मात्र मुख्य आरोपी मोकाट आहे. त्याच्याकडून मुलावर पुन्हा आक्रमण होण्याची शक्यता असल्याने त्याच्या वडिलांनी तक्रार प्रविष्ट केली.
मालकाला गुंगीचे औषध देऊन चोरी करणार्या दोघांना अटक !
मुंबई – मालकाच्या घरातून अडीच कोटी रुपयांचे दागिने घेऊन पळून गेलेल्या दोन नोकरांना बिहारमधून अटक करण्यात आली आहे. त्यांनी मालकाच्या जेवणात गुंगी येण्याचे औषध घालून चोरी केली होती. नीरज उपाख्य राजा यादव (वय १९ वर्षे) आणि राजू उपाख्य शत्रुघ्न कुमार (वय १९ वर्षे) अशी त्यांची नावे आहेत. आधारकार्डवरील तपशीलासह पोलिसांनी त्यांना अटक केली.’
अशांना कठोर शिक्षाच करायला हवी !
१६ वर्षीय शाळकरी मुलीवर बलात्कार !
मुरबाड – शेजारी रहाणार्या १६ वर्षीय शाळकरी पीडित मुलीला अंघोळ करतांनाची अश्लील छायाचित्रे प्रसारित करण्याची आणि कुटुंबाला ठार मारण्याची धमकी देऊन तिच्यावर ३७ वर्षीय आरोपीने बलात्कार केला. गुन्हा नोंद झाल्यावर आरोपीने मित्राच्या घरी जाऊन विषप्राशन करत आत्महत्या केली.
वासनांधांची बजबजपुरी झाल्याचेच हे उदाहरण !
स्मशानभूमीत लाकडाऐवजी जैविक विटा वापरणार !
नवी मुंबई महापालिकेचा निर्णय !
नवी मुंबई – येथील महापालिकेच्या स्मशानभूमींमध्ये मृतदेहांच्या दहनासाठी लाकडाऐवजी शेती आणि वृक्षकचरा यांपासून सिद्ध केलेल्या जैविक विटा (ब्रिकेटस बायोमास) वापरण्यात येणार आहेत. यासाठी पालिकेकडून प्रस्तावही सिद्ध करण्यात आला आहे. यासंदर्भात केलेली चाचणी यशस्वी झाली आहे.
माकडांमुळे होणारी हानी टाळण्यासाठी टास्कफोर्स स्थापन !
अलिबाग – गेल्या काही वर्षांपासून माकड किंवा वानरे शेतांमध्ये येत असल्याने बागायतींची पुष्कळ हानी होत आहे. हे टाळण्यासाठी वनविभागाने टास्कफोर्सची निर्मिती केली आहे. मुरुड, रेवदंडा, अलिबाग, दिवेआगर, श्रीवर्धन सारख्या आंबा-नारळाच्या बागा असलेल्या शहरांमध्ये माकडांचा मोठा उपद्रव होत आहे.
भरधाव टेंपोच्या धडकेत जैन साध्वींचा मृत्यू !
रायगड – कर्जत – नेरळ मार्गावर भरधाव आलेल्या टेंपोने पायी जाणार्या जैन साध्वींसह सेवेकरी महिलांना धडक दिली. यात जैन साध्वी मौलिक पुराणश्रीजी आणि सेवेकरी लता ओसवाल यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अन्य एक सेवेकरी महिला गंभीर घायाळ झाली आहे. जैन समाजाने परिसरातील आपापली दुकाने बंद ठेवून या घटनेचा निषेध केला. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला असून टेंपोचालक रविशंकर सेन याला कह्यात घेतले आहे.
धारावीच्या पुनर्विकासासाठी १ मार्चला जाहीर सभा !
मुंबई – पात्र-अपात्र रहिवाशांचे धारावीतच पुनर्वसन करावे, धारावीकरांना ५०० चौरस फुटांचे घर द्यावे आणि अदानी समुहाला हा प्रकल्प देऊ नये, अशा अनेक मागण्यांसाठी धारावीकर आंदोलन करणार असून १ मार्च या दिवशी धारावीत जाहीर सभा होणार आहे. मागण्यांकडे दुर्लक्ष करत धारावी पुनर्विकास प्रकल्प पुढे नेला जात असल्याचा आरोप धारावीकरांनी केला आहे. शेतकरी कामगार पक्षाकडून १ मार्चला धारावीतील पर्ल रेसिडेंसीजवळ सायंकाळी ५ वाजता सभा होणार आहे.