गोवा : ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी नियमांचे उल्लंघन करून चर्च संस्थेकडून ‘फेस्ता’चे आयोजन !

  • संयुक्त सर्वेक्षण अहवालातील माहिती

  • सरकारच्या विविध खात्यांच्या सहकार्याने वारसा स्थळी ‘फेस्ता’चे यशस्वीपणे आयोजन

(फेस्त म्हणजे ख्रिस्ती समाजाची जत्रा)

फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ येथे अनधिकृतरित्या उभारण्यात आलेले क्रॉस आणि श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर उद्ध्वस्त करून त्याजागी बांधलेल्या ‘अवर लेडी ऑफ हेल्थ’ चर्चचे भग्नावशेष मागे दिसत आहेत.

पणजी, १४ फेब्रुवारी (वार्ता.) : ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळी (पूर्वीचे श्री विजयादुर्गादेवीचे मंदिर असलेले ठिकाण) चर्च संस्थेने ७ ते १६ जानेवारी २०२४ या कालावधीत ‘फेस्ता’चे आयोजन केले होते. ‘फेस्ता’च्या निमित्ताने वारसा स्थळी अनधिकृत बांधकामे केली जात असल्याच्या तक्रारीवरून मुरगाव नियोजन आणि विकास प्राधिकरण अन् पुरातत्व खाते यांच्या अधिकार्‍यांनी २७ डिसेंबर २०२३ या दिवशी सकाळी ११ वाजता वारसा स्थळी संयुक्त सर्वेक्षण केले. संयुक्त सर्वेक्षण अहवालातून ‘फेस्ता’च्या आयोजनाच्या अनुषगांने वारसा स्थळी अनेक अनधिकृत बांधकामे झाल्याचे उघड झाले आहे. संतोषसिंह राजपूत यांनी माहिती अधिकाराखाली सर्वेक्षण अहवाल मागितल्याने ही माहिती उघड झाली आहे.

संतापाची गोष्ट म्हणजे ‘फेस्ता’च्या अगोदर वारसा स्थळी उपरोल्लेखित नियमांचे उल्लंघन होत असल्याचे लक्षात येऊनही संबंधितांवर कोणतीच कारवाई करण्यात आलेली नाही, याउलट ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या ठिकाणी सरकारचे पोलीस खाते, वाहतूक खाते आदींच्या सहकार्याने ७ ते १६ जानेवारी २०२४ या काळात ‘फेस्ता’चे यशस्वीपणे आयोजन करण्यात आले. पुरातत्व खात्याने यापूर्वी ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या ठिकाणी नियमानुसार ‘फेस्ता’चे आयोजन करता येत नसल्याचे म्हटले आहे, तरीही या ठिकाणी वर्ष २०१८ पासून अनधिकृतपणे प्रतिवर्षी ‘फेस्ता’चे आयोजन करण्यात येत आहे.

याच पुरातत्व खात्याने काही वर्षांपूर्वी केळशी येथे पुरातन श्री शांतादुर्गा मंदिराच्या ठिकाणी भाविकांना पूजा करण्यासाठी सुलभ व्हावे, यासाठी उभारलेला चौथरा कारवाई करून मोडला होता.

संयुक्त सर्वेक्षण अहवालातील नोंदी

१. ‘फ्रंटीस पीस ऑफ सांकवाळ’ या वारसा स्थळाच्या जवळ ‘क्रेन’च्या साहाय्याने मंडप घालण्यात येत होता आणि वारसा स्थळाजवळ ‘पाईप’ आदी साहित्य असलेला ट्रक उभा होता.
२. वारसा स्थळाच्या १ मीटर अंतरावर मंडपासाठी खांब उभारण्यात आले.
३. वारसा स्थळाच्या ‘सर्व्हे प्लान’मध्ये (सर्वेक्षण आराखडा) असलेली विहीर आता तेथे अस्तित्वात नाही. ‘सर्व्हे प्लान’मध्ये अस्तित्वात नसलेले एक बांधकाम वारसा स्थळाच्या १५ मीटर अंतरावर दिसत आहे.
४. वारसा स्थळी १ मोठा आणि ७ लहान लोखंडी ‘क्रॉस’ उभारण्यात आले आहेत.
५. पुरातत्व खात्यामध्ये नोंद असलेला एक दगड अन्यत्र हालवण्यात आल्याचे दिसत आहे. हा दगड वारसा स्थळाच्या मागे ठेवण्यात आला आहे.
६. लोखंडी चौथरा सिद्ध करून त्या ठिकाणी २ सहस्र लिटर क्षमता आणि ५ सहस्र लिटर क्षमता असलेल्या पाण्याच्या टाक्या ठेवण्यात आल्या आहेत.
७. चॅपलजवळ प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे.
८. संकुलात सुरक्षा रक्षकांना बसण्यासाठी खोली उभारण्यात आली आहे.

नियमांचे उल्लंघन झाल्याच्या नोंदी

१. पुरातत्व खात्याची अनुमती न घेताच क्रेनच्या साहाय्याने मंडपाची उभारणी करणे
२. वारसा स्थळाच्या १ मीटर अंतरावर भूमी खणून खांब उभारून मंडपाचे बांधकाम करणे
३. वारसा स्थळाच्या प्रवेशाच्या मार्गावर लोखंडी पाईपवर उभारण्यात आलेले १८ झेंडे, ७ लोखंडी क्रॉस आणि एक मोठा लोखंडी क्रॉस यांची उभारणी
४. ‘सर्व्हे प्लान’मध्ये अस्तित्वात नसलेले एक बांधकाम वारसा स्थळाच्या १५ मीटर अंतरावर दिसणे
५. पाण्यासाठी टाक्या बसवणे, सुरक्षारक्षकांसाठी खोलीची व्यवस्था करणे आणि  प्रवेशद्वार उभारणे

संपादकीय भूमिका

शासन यावर कोणती कारवाई करणार आहे ? किमान पुढील वर्षीपासून तरी ख्रिस्त्यांचे हे अतिक्रमण बंद होणार का ?