Amit Shah On CAA : लोकसभा निवडणुकीपूर्वी नागरिकत्व सुधारणा कायदा लागू होणार! – गृहमंत्री अमित शहा

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा

नवी देहली – लोकसभा निवडणुकीपूर्वी ‘नागरिकत्व सुधारणा कायद्या’ची (‘सीएए’ची) कार्यवाही केली जाणार आहे, अशी घोषणा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपला आगामी लोकसभा निवडणुकीत ३०० हून अधिक जागा मिळतील, तर भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ४०० हून अधिक जागा मिळतील, असे अमित शहा यांनी येथे एका कार्यक्रमात बोलतांना सांगितले.

राहुल गांधी यांच्यावर साधला निशाणा !

काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’ विषयी अमित शहा म्हणाले की, नेहरू-गांधी घराण्याच्या वंशजांना असा मोर्चा काढण्याचा अधिकार नाही; कारण १९४७ मध्ये देशाच्या फाळणीला त्यांचा पक्ष उत्तरदायी होता.

काँग्रेसच्या नेतृत्वाखालील सरकारने केलेले अपप्रकार जाणून घेण्यासाठी श्‍वेतपत्रिका आवश्यक ! – अमित शहा

भारत सरकारने संसदेत सादर केलेल्या श्‍वेतपत्रिकेवर (एखाद्या विषयावर सादर केलेल्या माहितीवर) अमित शहा म्हणाले की, वर्ष २०१४ मध्ये सत्ता गमावण्यापूर्वी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडीने केलेल अपप्रकार जाणून घेण्याचा देशाला पूर्ण अधिकार आहे. १० वर्षांनंतर आमच्या सरकारने अर्थव्यवस्थेला संजीवनी दिली आहे. परकीय गुंतवणूक आली आणि कुठलाच भ्रष्टाचार झाला नाही. त्यामुळे श्‍वेतपत्रिका प्रसिद्ध करण्याची हीच योग्य वेळ आहे.

अयोध्येत श्रीराममंदिर बांधले जावे, ही देशातील लोकांची ५०० वर्षांपासूनची इच्छा होती !

अयोध्येतील श्रीराममंदिराच्या सूत्रावर बोलतांना अमित शहा म्हणाले की, प्रभु श्रीरामाचा जन्म ज्या ठिकाणी झाला होता, तेथे मंदिर बांधले जावे, अशी देशातील लोकांची ५००-५५० वर्षांपासून इच्छा होती. अन्य पक्षांची सत्ता असतांना तुष्टीकरणाचे राजकारण आणि कायदा अन्  सुव्यवस्थेचे कारण देत श्रीराममंदिराच्या बांधकामाला अनुमती देण्यात आली नाही.