‘संगीत आकाशतत्त्वाशी संबंधित आहे; म्हणून पृथ्वी, आप, तेज आणि वायू या तत्त्वांशी संबंधित असलेल्या कलांपेक्षा संगीताशी संबंधित अनुभूती वरच्या स्तराच्या असतात !’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
११.१.२०२४ या दिवशी प्रसिद्ध झालेल्या भागात कु. दिशा देसाई यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात आल्यावर जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती पाहिल्या. आता या भागात त्यांना शिकायला मिळालेली सूत्रे पहाणार आहोत.
(भाग १. पाहण्यासाठी क्लिक करा)
(भाग २)
३. शिकायला मिळालेली सूत्रे
३ अ. ‘नृत्यसाधना’ हा बाह्य प्रवास नसून आंतरिक साधनाप्रवास आहे’, याची जाणीव होणे : मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटले, ‘येथे नृत्याचे सादरीकरण केल्यानंतर प्रेक्षकांपैकी कुणीही टाळ्या वाजवत नाहीत !’ पहिल्यांदा माझ्या मनात विचार आला, ‘येथे मी नृत्य कशी करणार ?’ त्यानंतर मला एका गोष्टीची जाणीव झाली, ‘शास्त्रांमध्ये लिहिले आहे, ‘कथ्थक नृत्य किंवा कुठलीही शास्त्रीय कला हा बाह्य प्रवास नसून आंतरिक प्रवास आहे. तो देवाला शोधण्याचा मार्ग आहे !’, म्हणजे ‘मी या कलेतून स्वतःला शोधले पाहिजे. त्या कलेतील दिव्यत्व आणि शांती अनुभवली पाहिजे.’ हे दिव्यत्व आणि शांती मी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयातच अनुभवू शकले.
३ आ. नृत्यसाधनेची योग्य दिशा समजणे ! : समाजात वावरतांना ‘मी माझ्या कलेसाठी काय समर्पित करायला हवे ?’, हे विसरून जाते. येथे येऊन मला जाणीव झाली, ‘माझ्यात असणार्या ऊर्जेचा मी कुठे उपयोग केला पाहिजे आणि कुठे नाही ?’, ‘माझे कुठले विचार मी बाजूला ठेवले पाहिजेत आणि कुठल्या विचारांना घेऊन मी पुढे गेले पाहिजे ?’, ‘सराव किंवा नृत्य करण्यापूर्वी आणि नृत्य केल्यानंतर मनातील विचारांना योग्य दिशा कशी द्यायची ?’, अशी अनेक सूत्रे मला येथे शिकता आली.
४. समाजात नृत्य सादर करणे आणि महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनकेंद्रात नृत्य सादर करणे यांत जाणवलेला भेद !
४ अ. समाजात नृत्य प्रस्तुती करतांना अनेक गोष्टींचा मनावर ताण असल्याने मनात त्याविषयीचे विचार असणे : समाजात नृत्यप्रस्तुती करतांना माझ्याकडून नृत्यासाठीची सिद्धता झाल्यानंतर कार्यक्रमस्थळी जाणे आणि नृत्याचे सादरीकरण करून घरी येणे !’ एवढेच होते. कार्यक्रमाच्या वेळी माझ्या मनात ‘माझी पूर्ण सिद्धता झाली आहे ना ? वाद्यवृंद सिद्ध आहे का ? रंगमंच सिद्ध झाला आहे का ? प्रेक्षक आहेत का ?’, असे विचार असतात. मला नेहमी वाटते, ‘माझे नृत्य पहाण्यासाठी प्रेक्षक असले पाहिजेत. प्रेक्षकच नसतील, तर मी कुणासाठी नृत्य करणार ?’ या विचारांचा मला ताणही असतो. त्यामुळे ‘आम्ही जे गुरुजनांकडून शिकलो, त्याचा विचार करायला आणि मन एकाग्र करून नृत्यापूर्वीची शांती अनुभवयाला मला कधी वेळच मिळाला नाही.’
४ आ. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधनकेंद्रात नृत्याचे सादरीकरण करण्यापूर्वी आणि नंतर प्रथमच शांती अनुभवणे, त्यामुळे साधनेचे महत्त्व समजणे : मी अनेक जणांकडून ऐकले आहे, ‘नृत्याचे सादरीकरण करण्यापूर्वी नामजप किंवा ध्यान केले पाहिजे’; परंतु मी नृत्याकडे अशा दृष्टीने कधी पाहिलेच नाही. नृत्याच्या सादरीकरणानंतर प्रेक्षक मला भेटायला आल्यावर माझ्या नृत्याला मिळालेला प्रतिसाद आणि प्रशंसा यांमध्येच मी गुंतून जाते. त्यामुळे अंतर्मुख होऊन ‘मी माझ्या गुरूंना अपेक्षित असे सादरीकरण केले का ? मी कुठे न्यून पडले ?’, याविषयी कधी विचारही केला नाही. कार्यक्रमानंतर घरी गेल्यावर मी स्वतःचेच चलचित्र पहाते, तेव्हा मला ‘अमुक पदन्यास किंवा मुद्रा करतांना मी न्यून पडले. त्याचा सराव करायला हवा’, अशी जाणीव होते; पण सादरीकरणाच्या आधी आणि नंतर जी शांती अनुभवायची असते, ती आज मी प्रथमच इथे अनुभवली. ‘कलेसाठी कलाकाराच्या साधनेचे महत्त्व किती आहे ?’, हे मला आज कळले.
५. कु. दिशा यांनी स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन यांविषयी व्यक्त केलेले मनोगत !
५ अ. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन अन् गुणसंवर्धन यांचे महत्त्व उमगणे : मी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात पुन्हा निश्चित येईन; कारण त्यामुळे मला माझ्या नृत्यातील तर्क, नृत्य आणि विचार यांमध्येही सकारात्मकता निर्माण करता येईल. मला येथे पुष्कळ गोष्टी शिकता आल्या, उदा. ‘आपल्याला कितीही राग आला, तरी शांत रहाता आले पाहिजे, कुठल्याही परिस्थितीत गोंधळून न जाता स्थिर रहाता आले पाहिजे’ इत्यादी. यातून मला स्वभावदोष निर्मूलन आणि गुणसंवर्धन प्रक्रियेचे महत्त्वही शिकता आले.
५ आ. ‘स्वभावदोष निर्मूलन आणि नामजप’ यांचे महत्त्व नृत्यवर्गाला येणार्या विद्यार्थ्यांना शिकवणार असणे : मला कथ्थक नृत्यातील तांत्रिक ज्ञान माझ्या गुरूंकडून मिळाले आहे; परंतु ‘हे ज्ञान घेऊन पुढे कसे जायचे ?’ याविषयी आणि ‘कला परमेश्वराच्या प्राप्तीचे एक माध्यम आहे, नृत्य सादरीकरणाच्या आधी अन् नंतरची ध्यानावस्था’ ही सूत्रे मला येथे अनुभवता आणि शिकता आली. मी इथे जे शिकले किंवा ग्रहण करत आहे, त्यातील १ टक्का तरी मी माझ्या विद्यार्थ्यांना शिकवण्याचा प्रयत्न करीन. ‘शास्त्रीय कला या ईश्वराकडून आल्या असून ईश्वरप्राप्तीसाठीच आहेत’, याची विद्यार्थ्यांना जाणीव होण्यासाठी मी नृत्याच्या सरावाच्या आरंभी त्यांना ‘ओंकार ’, ‘ॐ नमः शिवाय।’ किंवा दुसरा कुठलाही नामजप यांचे पठण करायला सांगेन.’
– कु. दिशा देसाई (कथ्थक अलंकार, दादर, मुंबई).
(२१.१२.२०२३)
(समाप्त)
नृत्यांगना कु. दिशा देसाई यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर साधकांना पाहून त्यांना जाणवलेली आणि शिकायला मिळालेली सूत्रे
१. संपूर्ण भारत आणि विदेश येथील अनेक ठिकाणी न जाणवलेली दैवी ऊर्जा सनातनच्या आश्रमात जाणवणे
‘रामनाथी आश्रमातील वातावरण आणि वास्तू यांमध्ये एक वेगळीच दैवी ऊर्जा कार्यरत आहे’, असे मला जाणवले. या पूर्वी मी भारत आणि विदेश येथील पुष्कळ ठिकाणी गेले आहे; पण मला इथल्याप्रमाणे दैवी ऊर्जा अन् चैतन्य कुठेही जाणवले नाही. आश्रमातील प्रत्येक साधकाकडे पहातांना त्याच्या साधनेमुळे किंवा त्याच्या आध्यात्मिक विचारप्रक्रियेमुळे मला त्याच्या मुखावर पुष्कळ शांती जाणवली.
२. आश्रमातील प्रत्येक साधकाच्या डोळ्यांत स्थिरता आणि शांती जाणवणे
‘मला येथील शांतता आणि प्रत्येक साधकाच्या डोळ्यांत दिसणारी स्थिरता अन् शांती अनुभवता आली. मी आश्रमात फिरतांना किमान शंभर डोळे माझ्याकडे पहात होते; परंतु त्या डोळ्यांमध्ये कुठल्याही अपेक्षा नव्हत्या. होती ती केवळ स्थिरता ! माझी प्रकृती पुष्कळ चंचल आहे. मी माझ्या मनातील विचारांमध्ये इकडून-तिकडे सतत उड्या मारत रहाते; परंतु ‘आपल्या एकाच विचारावर स्थिर कसे रहायचे ?’, हे पुष्कळ महत्त्वाचे असून मला ते इथे अनुभवता आले. कदाचित् ‘आश्रमातील चांगली स्पंदने, साधकांची साधना आणि साधकांची हिंदु धर्माविषयीच्या विचारांची ऊर्जा’ यांमुळे साधकांमध्ये ही स्थिरता असू शकते किंवा साधकांच्या ईश्वरप्राप्तीच्या तळमळीमुळेही असू शकते.
यांतून मला ‘माझे कथ्थक नृत्य या दैवी टप्प्यापर्यंत जाणे का आणि किती आवश्यक आहे’, हे शिकता आले.’
– कु. दिशा देसाई (कथ्थक नृत्यालंकार), दादर, मुंबई. (२१.१२.२०२३)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |