१२ ते १४.९.२०२३ या कालावधीत दादर (मुंबई) येथील प्रसिद्ध कथ्थक नृत्यांगना आणि नृत्यगुरु विद्यावाचस्पती (कथ्थक) रूपाली देसाई अन् त्यांची कन्या कु. दिशा देसाई (कथ्थक नृत्यालंकार) या महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय नृत्यासंबंधी करत असलेल्या संशोधनाच्या प्रयोगात सहभागी होण्यासाठी आल्या होत्या. कु. दिशा देसाई यांना नृत्याच्या संशोधनासाठी प्रयोग करतांना आलेल्या अनुभूती अन् शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.
(भाग १)
१. कु. दिशा देसाई यांना महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात आल्यावर जाणवलेली सूत्रे
१ अ. महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयात आल्यावर अनुभवलेली दैवी शांती ! : ‘मुंबईत मी सतत व्यस्त असते. मला अनेक गोष्टी समयमर्यादेत पूर्ण कराव्या लागत असल्यामुळे ‘स्वतःच्या नृत्यासाठी मी स्वतःला कसे अर्पण करावे ?’ किंवा ‘मला नेमके काय करायचे आहे ?’, याचा विचार करण्यासाठीही मला शांत वेळ मिळत नाही. मला पहाटे ४ वाजताच उठावे लागते आणि सकाळी ७ ते १० वाजेपर्यंत सलग नृत्यवर्ग असतात. त्यामुळे माझे नियोजन इतरांवर अवलंबून असते. तीन दिवसांपूर्वी मी येथे (महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन केंद्रात) आले, तेव्हा मला सर्वत्र शांतता जाणवली. अशी शांती मी या आधी कधीच अनुभवली नव्हती. आरंभी मला ही शांतता सहनच झाली नाही. त्यामुळे मला वाटले, ‘मला काय होत आहे ?’ हे काहीतरी निराळेच आहे. मी मुंबईमध्ये, माझ्या घरी असे कधीच अनुभवले नाही. नंतर ‘इथली शांतता दैवी आहे’, असे माझ्या लक्षात आले.
कु. दिशा देसाई यांचा परिचयकु. दिशा देसाई या नृत्यांगना विद्यावाचस्पती (कथ्थक) रूपाली देसाई यांची कन्या आणि शिष्या असून त्यांनी अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयातून ‘कथ्थक नृत्यालंकार’ ही पदवी प्राप्त केली आहे. वयाच्या दुसर्या वर्षापासून त्यांनी गुरु विद्यावाचस्पती (कथ्थक) रूपाली देसाई यांच्याकडे कथ्थक नृत्य शिकण्यास आरंभ केला. त्यांना लहानपणापासून पद्मविभूषण पंडित बिरजू महाराज, पद्मश्री डॉ. पुरु दधीच, डॉ. विभा दधीच, डॉ. सुभाषचंद्र, डॉ. मंजिरी देव आदी कथ्थक गुरूंचे मार्गदर्शन लाभले. सध्या त्या प्रसिद्ध तबलावादक पंडित मुकुंदराज देव यांच्याकडे लयकारीचे शिक्षण घेत आहेत. त्यांनी मुंबई विद्यापिठाची ‘मेनका ट्रॉफी’ मिळवली असून त्या ‘शारदा संगीत विद्यालया’चा ‘पंडित विष्णु दिगंबर पलुसकर’, तसेच ‘युवा रत्न पुरस्कार’ इत्यादी अनेक पुरस्कारांनी सन्मानित आहेत. त्यांनी त्यांचे कौशल्यपूर्ण नृत्य देश-विदेशांतील रसिक प्रेक्षकांसमोर प्रस्तुत करून रसिकांची दाद मिळवली आहे. |
२. अनुभूती
२ अ. ‘जटायू मोक्ष’ गतभाव करतांना जटायूच्या भूमिकेशी एकरूप होऊन त्याचे दुःख अनुभवता येणे आणि ‘हा येथील सात्त्विकतेचा परिणाम आहे’, असे जाणवणे : मी ‘जटायू मोक्ष’ नावाचा गतभाव (टीप १) सादर केला. त्यात मी एकटीने नृत्य आणि अभिनय यांच्या माध्यमातून राम, सीता, जटायू, लक्ष्मण, मारिच राक्षस इत्यादी पात्रे सादर केली. एका कलाकाराने विविध पात्रांचा एकाच गीतात अभिनय करणे पुष्कळ अवघड असते; कारण त्यात त्या त्या व्यक्तिरेखेनुरूप ते ते हावभाव तंतोतंत होणे आवश्यक असते. या गतभावात ‘मी जटायू बनून श्रीरामाकडून पाणी प्यायल्यानंतर मला मोक्ष मिळाला’, असे दाखवले. तेव्हा मला एक निराळीच अनुभूती आली. ते वातावरण निराळेच झाले होते. मी जटायूच्या भूमिकेशी पूर्ण एकरूप झाले होते. ‘मीच जटायू आहे’, असे जाणवून मला पंख छाटलेल्या जटायूचे दुःख आणि कष्ट अनुभवता आले. नृत्याच्या शेवटी मी ‘जटायूला मोक्ष मिळाला’, असे दाखवले, तेव्हा ‘माझ्यामधून काहीतरी निघून गेले’, असे मला जाणवले आणि त्या क्षणी माझी भावजागृती होऊन मला अश्रू थांबवताच आले नाहीत. ‘प्रेक्षक, ठिकाण आणि वातावरण हे सर्व सात्त्विक असेल, तर त्यांचा नृत्यावर कसा सकारात्मक परिणाम होतो’, हे मला अनुभवता आले.
(टीप १ – कथ्थक नर्तक एकटाच एखादे कथानक घेऊन त्या कथानकातील सर्व पात्रांचा अभिनय करतो, त्यास ‘गतभाव’ म्हणतात. यात तालाइतके अभिनयालाही प्राधान्य दिले जाते.)
२ आ. नामजप करून नृत्य सादर करतांना आलेली अनुभूती
२ आ १. नृत्य प्रस्तुत करण्यापूर्वी नामजप करतांना ध्यान लागून डोळ्यांसमोर पांढरा प्रकाश दिसणे : संशोधनासाठी नृत्य करण्यापूर्वी आम्हाला १० मिनिटे ‘ॐ नमः शिवाय।’ हा नामजप करायला सांगितला आणि तो नामजप तिथे लावण्यात आला. आम्ही दोघींनी (मी आणि माझ्या आईने) मनात हा नामजप पुष्कळ शांत स्थितीत केला. नामजप करतांना माझे ध्यान लागले. नामजप करण्यासाठी डोळे मिटल्यानंतर आरंभी माझ्या मनात पुष्कळ विचार येत होते; परंतु ३ – ४ मिनिटांनी हळूहळू माझे मन शांत आणि स्थिर झाले. नंतर मला डोळ्यांसमोर तेजस्वी पांढरा प्रकाश दिसला. ‘ती भगवान शिवाची शक्ती आहे’, असे मला जाणवले. यापूर्वी मला अशी अनुभूती कधीच आली नव्हती.
२ आ २. ‘शिव-पार्वती स्तुती’ सादर करतांना ‘पार्वतीच्या’ पात्राशी एकरूप होऊन पूर्ण नृत्य ‘लास्य’ भावाने केले जाणे : नामजपानंतर मी माझ्या आईच्या समवेत ‘शिव-पार्वती स्तुती’ सादर केली. हे नृत्य सादर करतांना मला ‘मी दिशा देसाई आहे’, ही जाणीवच राहिली नाही. मी त्या नृत्याशी पूर्ण एकरूप झाले होते. माझ्याकडून नृत्यातील प्रत्येक हालचाल लास्य (टीप २) अंगाने केली जात होती. कथ्थक किंवा कुठल्याही शास्त्रीय नृत्यात ‘लास्य’ आणि ‘तांडव’ नृत्य असते. ‘शिव-पार्वती स्तुती’ सादर करतांना माझ्या सर्व हालचाली लास्यांगाप्रमाणे नाजूक आणि हलक्या-फुलक्या होत होत्या. त्यामध्ये तांडव नृत्य (टीप ३) एक टक्काही आले नाही. ‘मला अशी अनुभूती कधी येईल’, असे मला कधीच वाटले नाही. ही अनुभूती आल्यावर ‘मी पुष्कळ भाग्यवान आहे’, असे मला वाटले.
आपल्या शास्त्रांमध्ये प्रत्येक कृतीमागचे वैज्ञानिक कारण सांगितले आहे; पण आपण त्यापासून अनभिज्ञ आहोत किंवा आपल्याला ते स्वीकारायचेच नाही’, असे मला वाटते.’
(टीप २ – सुकुमार, शृंगाररसपूर्ण आणि कोमल हालचाली अन् पदन्यास असलेल्या नृत्यप्रकाराला ‘लास्य’ नृत्य म्हणतात. ‘लास्य’ हे देवी पार्वतीने केलेले नृत्य आहे.)
(टीप ३ – भगवान शिवाने केलेल्या ‘प्रलयकारी’ नृत्याला ‘तांडव’ नृत्य म्हणतात. येथे ‘प्रलयकारी’, हा शब्द विनाशकारी या अर्थाने वापरलेला नाही. ‘प्रलयकारी’, म्हणजे त्या नृत्यात प्रलयाप्रमाणे शक्ती आहे. हे नृत्य जोशपूर्ण, पौरुषत्वाने युक्त भारदस्त हालचालींचा समावेश असलेले आणि आनंदवर्धक आहे. भगवान शंकराचे शिष्य तण्डु यांनी हे भरतमुनींना सांगितले; म्हणून याला ‘तांडव’ नृत्य म्हणतात.)
(क्रमशः)
– कु. दिशा देसाई (कथ्थक नृत्यालंकार), दादर, मुंबई. (२१.१२.२०२३)
• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |