एकीचे शिवधनुष्य !

अयोध्यानगरीत २२ जानेवारी या दिवशी श्रीराममूर्तीचा भव्य दिव्य प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडल्याने भारतभूमीच्या पुत्रांना अत्यंत समाधान आहे. एक मोठे धर्मयुद्ध जिंकल्याचा आनंद आहे. समाजातील सर्वच जाती-धर्माचे, पंथांचे, सर्व स्तरांवरील भारतीय नागरिक एकत्रितपणे हा सोहळा अनुभवण्यासाठी आतूर होते. या अभूतपूर्व आध्यात्मिक स्तरावरील घटनेने भारतातील वातावरण आनंदी आणि राममय झाले. हीच ‘एकी’ भारतियांनी यापुढेही ठेवणे अत्यावश्यक आहे. भारतीय जनतेला एकत्रितपणे अनेक आव्हानांना पुढील काळात तोंड घ्यावे लागणार आहे. श्रीराममंदिर उभारणीचा आनंद अबाधित राखून टिकवावा लागणार आहे. श्रीराममंदिराचे, तसेच भारतभूवरील अन्य मंदिरांचे आक्रमणकर्त्यांपासून संघटितपणे संरक्षण करण्याचे शिवधनुष्य प्रत्येक भारतियाला पेलावे लागणार आहे. मंदिर बांधणे सोपे; पण ते राखणे अवघड आहे !

अनेक वर्षांपूर्वी मोगल आक्रमकांनी भारतातील अनेक देवस्थानांचा विध्वंस केला. तेव्हाही आपण आक्रमणकर्त्यांपेक्षा संख्येने आणि मनोधैर्याने निश्चितच अधिक होतो; मात्र एकसंघ किंवा एकत्रित नसल्यामुळे भारतियांचा पराजय करून अनेक वर्षे राज्य करणे आक्रमकांना सहज शक्य झाले. तद्नंतर इंग्रज भारतात आले. तेव्हाही ‘फोडा आणि राज्य करा’, या नीतीमुळे विखुरलेल्या भारतीय समाजावर राज्य करणे त्यांना सहज शक्य झाले. १५० वर्षे गुलामगिरीत काढल्यानंतर भारतीय जनतेने एकत्रितपणे, तसेच निकराने दिलेल्या लढ्याच्या परिणामस्वरूप इंग्रज देश सोडून गेले. भारत स्वतंत्र झाला. सांप्रतकाळी पुन्हा एकदा अनेक माध्यमांतून होणार्‍या आक्रमणांनी भारतमाता ग्रासली आहे. आता आक्रमणकर्त्यांचे स्वरूप पालटले आहे. तेव्हा एक एक यवन शासक आला आणि विध्वंस करून गेला. आज आपल्या अवतीभवती अनेक ‘बाबर’ आहेत; जे विध्वंस करून भारतमातेचे लचके तोडू इच्छितात. तेव्हा मूठ‌भर इंग्रज आले, भारताचे सांस्कृतिक वैभव नष्ट करण्याचा प्रयत्न करून गेले. आज आमच्या समाजातील ‘मानसिक पारतंत्र्यात असलेले’, ‘आंग्लाळलेले’ अनेक लोक भारतीय संस्कृती, परंपरा यांवर घाला घालत आहेत. अशा ‘घरभेदीं’शी दोन हात करायचे, तर एकट्या-दुकट्याचे काम नाही. सर्वांनी एकत्रितपणे एकसंघ होऊन येणार्‍या संभाव्य संकटांना तोंड देण्याची पूर्वसिद्धता आताच करायला हवी. आक्रमणकर्त्यांचे, आक्रमणाचे स्वरूप अभ्यासून नियोजनबद्धरित्या सर्व स्तरांवरील आक्रमणे थोपवून लावण्यासाठी कटीबद्ध व्हावे. भारतीय संस्कृती, परंपरा, मंदिरे यांचे रक्षण करणे, हे शासनासमवेतच भारतीय जनतेचेही दायित्व आहे. एका हिंदूला किंवा एका संघटनेला ते शक्य नाही; परंतु हिंदू एकत्र झाले, तरच ते निश्चित शक्य होईल. यासाठी हिंदूंनी एकत्र येण्याची व्यापकता दाखवणे, ही काळाची आवश्यकता आहे !

– श्रीमती धनश्री देशपांडे, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.