प्रभु श्रीराम व्यक्ती नसून आदर्श, संस्कृती आणि भक्ती यांचा त्रिवेणी संगम ! – अश्विनीकुमार चौबे, केंद्रीय वनमंत्री

पुणे येथील ‘अपने अपने राम’ या ३ दिवसांच्या विशेष कार्यक्रमाचा उद्घाटन सोहळा !

पुणे – प्रभु श्रीराम ही व्यक्ती नव्हे, तर आदर्श, संस्कृती आणि अखंड भारतवासियांच्या मनामनात असलेल्या भक्तीचा त्रिवेणी संगम आहे. अयोध्येतील रामजन्मभूमीवर प्रभु श्रीराम विराजमान होत आहेत, हा क्षण देशवासियांसाठी दीपोत्सवच आहे, असे प्रतिपादन केंद्रीय पर्यावरण, वने आणि हवामान पालट राज्यमंत्री अश्विनीकुमार चौबे यांनी केले. अयोध्येतील रामलला प्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळ यांच्या वतीने आयोजित

डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतील ‘अपने अपने राम’ या ३ दिवसांच्या विशेष कार्यक्रमाच्या उद्घाटनाच्या वेळी चौबे बोलत होते.

या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पुणे महानगर संघचालक रवींद्र वंजारवाडकर, शिक्षण प्रसारक मंडळीचे अध्यक्ष अधिवक्ता एस्.के. जैन, माजी मंत्री दिलीप कांबळे, भाजपचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, ह.भ.प. चैतन्य महाराज कबीर आदी मान्यवर उपस्थित होते.

अश्विनीकुमार चौबे पुढे म्हणाले की, सनातनी संस्कृती, हिंदु धर्मातील प्रत्येकजण अयोध्येत साकारलेले राममंदिर पहाण्यासाठी उत्सुक आहे. लाखो कारसेवकांनी ‘मंदिर वही बनायेंगे’च्या घोषणा देत दिलेला लढा शेकडो वर्षांनी यशस्वी झाल्याचे समाधान आहे. पुण्यातूनही मोठ्या संख्येने कारसेवक सहभागी झाले होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अयोध्येत भव्यदिव्य मंदिर उभारण्यात घेतलेल्या पुढाकारामुळे हे स्वप्न साकार होत आहे.

डॉ. कुमार विश्वास यांच्या अमोघ वाणीतील रामकथा ऐकण्यासाठी जगभरातील लोक उत्सुक असतात. त्यांच्या शब्दांत रामकथा ऐकण्याची संधी देणार्‍या संस्कृती प्रतिष्ठान आणि शिक्षण प्रसारक मंडळ यांचे कौतुक आहे.