Babbar Khalsa Terror Funding : ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ने विदेशी पर्यटकांच्या माध्यमातून भारतात कोट्यवधी रुपये पाठवले !

  • पारंपरिक ‘हवाला’ऐवजी ‘एम्.टी.एस्.एस्.’ या सरकारी सुविधेचा उठवला अपलाभ !

  • खलिस्तानी आतंकवाद्यांसाठी शस्त्रे आणि दारूगोळा खरेदीसाठी कोट्यवधी रुपयांचा वापर !

नवी देहली – भारताविरुद्ध कॅनडा आणि पाकिस्तान येथून काम करणारी खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ने भारतात कोट्यवधी रुपये पाठवण्यासाठी नवीन पद्धत अवलंबली आहे. यासाठी पारंपरिक ‘हवाला’ऐवजी भारत सरकारच्या विदेशी पर्यटकांसाठीची ‘एम्.टी.एस्.एस्.’ या योजनेचा अपलाभ उठवण्यात आला.

सौजन्य : कॅपिटल टीव्ही उत्तर प्रदेश 

‘मनी ट्रान्सफर सर्व्हिस स्कीम’ अशी ही योजना असून या माध्यमातून विदेशी पर्यटकांना विदेशातून एका वर्षात ३० वेळा पैसे मागवता येतात. एका वेळी अधिकाधिक २५० अमेरिकी डॉलर म्हणजे २ लाख ७ सहस्र रुपये मागवण्याची या योजनेच्या अंतर्गत सुविधा आहे. ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’ने विदेशी पर्यटकांना पैशाची लालूच दाखवून त्यांच्याकरवी विदेशातून पैसे पाठवले. भारतातील त्यांच्या आतंकवाद्यांना पर्यटकांच्या वतीने हे पैसे पुरवण्यात आले. या पद्धतीचा प्रयोग करून आतापर्यंत शस्त्र आणि स्फोटके खरेदी करण्यासाठी कोट्यवधी रुपये भारतात पाठवण्यात आले.

भारतीय अन्वेषण यंत्रणेने रिझर्व्ह बँकेचे साहाय्य घेऊन कुख्यात गुंड लॉरेन्स बिश्‍नोई आणि ‘बब्बर खालसा इंटरनॅशनल’चा आतंकवादी हरविंदरसिंह रिंडा अन् गोल्डी बराड यांच्याविरुद्ध ३२ ठिकाणी धाड घातली होती. यातून हा संपूर्ण प्रकार समोर आला.

संपादकीय भूमिका 

  • कॅनडात कार्य करणार्‍या या संघटनेवर बंदी आणण्यासाठी आता भारताने पाकसारखेच कॅनडालाही ‘आतंकवादाचा पुरस्कार करणारा देश’ अशा प्रकारे त्याची प्रतिमा जगासमोर आणली पाहिजे !
  • खलिस्तान्यांकडून ज्या विदेशी पर्यटकांचा वापर यासाठी करण्यात आला, त्यांच्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यासह परराष्ट्र मंत्रालयाने संबंधित देशालाही याविषयी तंबी दिली पाहिजे. तरच अशा घटना थांबतील !