मिरज येथे भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात श्रीराम मंगल अक्षता कलश शोभायात्रा पार पडली !

पालखी, रामनामाचा गजर करत आणि भजने म्हणत शेकडो रामभक्त अन् हिंदुत्वनिष्ठ संघटनांचा सहभाग !

मिरज येथे उत्साही वातावरणात श्रीराम मंगल अक्षता कलश शोभा यात्रा काढतांना भाविक

मिरज, १ जानेवारी (वार्ता.) – अयोध्या येथील श्रीराम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमित्ताने शहरात ३१ डिसेंबर या दिवशी सकाळी ९ वाजता अयोध्या येथून आलेल्या श्रीराम मंगल अक्षता कलश पालखीची भव्य शोभायात्रा भावपूर्ण आणि उत्साही वातावरणात काढण्यात आली. या यात्रेचा प्रारंभ श्री शिवतीर्थापासून होऊन गोठण गल्ली येथील श्रीराम मंदिरात महाआरती करून यात्रेची सांगता झाली. यात्रेचा मार्ग विविध फुले आणि रांगोळी यांनी सजवण्यात आला होता.

उपस्थित हिंदुत्वनिष्ठ संघटना… 

सकल हिंदु समाजाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या श्रीराम मंगल अक्षता कलश यात्रेचा प्रारंभ श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन आणि महाआरती करून झाला. कलश पालखी, श्रीरामाची फुलांनी सजवलेली भव्य प्रतिमा, तसेच टाळ-मृदुंगाचा अन् श्रीरामाचा गजर करत ही यात्रा काढण्यात आली. यामध्ये वारकरी संप्रदाय, इस्कॉन, राष्ट्रीय सेविका समिती, बजरंग दल, हिंदु एकता आंदोलन, विहिंप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सनातन संस्था, हिंदु जनजागृती समिती, प्रजापिता ब्रह्मकुमारी, तसेच शिवसेना, ठाकरे गट, भाजप यांसह अनेक संप्रदाय, संघटना आणि पक्ष यांचे पदाधिकारी अन् कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

यात्रेत धनगरी ढोल पथक, वारकरी पथक, छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती असलेला रथ, ढोल पथक, तुतारी पथक सहभागी झाले होते. अनेक ठिकाणी भाविकांनी या यात्रेचे स्वागत केले. ३१ डिसेंबर आणि १ जानेवारी २०२४ या दिवशी सांगली जिल्ह्यातील सर्व तालुक्यांत अशा पद्धतीने कलश यात्रेचे आयोजन करण्यात आले. १ ते १५ जानेवारी २०२४ या कालावधीत घरोघरी अक्षता पोचवण्यात येणार आहेत.

क्षणचित्रे…

१. यात्रेत श्रीराम, लक्ष्मण, सीता आणि हनुमान यांच्या वेशभूषेत बालचमू सहभागी झाला होता.

२. अनेक ठिकाणी महिलांनी पालखीचे औक्षण करून दर्शन घेतले.

३. यात्रेत पारंपरिक वाद्ये, भगवे झेंडे घेतलेले आणि पारंपरिक वेशभूषा घातलेले भाविक सहभागी झाल्याने संपूर्ण वातावरण हिंदुत्वाने भारलेले वाटत होते.

उपस्थित मान्यवर… 

रा.स्व. संघाचे सर्वश्री राजेश देशमाने, सुधीर चापोरकर, राजू शिंदे, अधिवक्ता वासुदेव ठाणेदार, सी.जी. कुलकर्णी, मकरंद ग्रामोपाध्ये, आल्हाद मांद्रेकर, ‘आम्ही शिवभक्त’ संघटनेचे श्री. विकास सूर्यवंशी, बजरंग दलाचे जिल्हा संयोजक श्री. आकाश जाधव, कामगारमंत्री डॉ. सुरेश खाडे, ह.भ.प. ऋषिकेश बोडस, शिवसेना व्यापारी सेनेचे पंडित तात्या कराडे, शिवसेनेचे विधानसभा क्षेत्र प्रमुख श्री. तानाजी सातपुते, शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख श्री. माधवराव गाडगीळ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे तालुका प्रमुख श्री. विनायक माईणकर, श्री. विनायक कुलकर्णी, भाजप युवा मोर्चाचे श्री. दिगंबर जाधव, भाजप सांस्कृतिक आघाडीचे प्रदेशाध्यक्ष श्री. ओंकार शुक्ल, नगरसेवक श्री. पांडुरंग कोरे, अनिता वनखंडे

श्रीराम मंगल अक्षता कलश शोभा यात्रेचे स्वागत करण्यासाठी रस्त्यावर काढण्यात आलेल्या रांगोळ्या
श्रीराम मंगल अक्षता कलश शोभा यात्रेत हातात भगवे फलक घेऊन सहभागी असलेल्या महिला
श्रीराम मंगल अक्षता कलश शोभा यात्रेत विविध वेशभूषेत सहभागी झालेले बालभक्त
श्रीराम मंगल अक्षता कलश शोभा यात्रेतील पालखी