सुषमा अंधारे यांच्या विरोधात विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव !

डावीकडून देवयानी फरांदे आणि सुषमा अंधारे

नागपूर, १९ डिसेंबर (वार्ता.) – उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांच्या विरोधात भाजपच्या आमदार देवयानी फरांदे यांनी १९ डिसेंबर या दिवशी विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव मांडला. २८ नोव्हेंबर या दिवशी सुषमा अंधारे यांनी पुणे येथे पत्रकार परिषद घेऊन अमली पदार्थांच्या तस्करीत आमदार देवयानी फरांदे यांचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप केला होता. याविषयी हा हक्कभंग आमदार फरांदे यांनी आणला.

याविषयी सभागृहात देवयानी फरांदे म्हणाल्या, ‘‘नाशिक अमली पदार्थमुक्त व्हावे, यासाठी मी स्वत: पोलीस आयुक्त आणि गृहमंत्री यांना पत्र दिले आहे. अमली पदार्थ तस्कर ललित पाटील हा उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा असल्यामुळे सुषमा अंधारे माझ्यावर आरोप करत आहेत.’’

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी याविषयी ‘पडताळणी करून निर्णय घेऊ’, असे सांगितले.