Emmanuel Macron on Israel : इस्रायलने महिला आणि मुले यांची हत्या थांबवावी ! – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन

  • फ्रान्सच्या राष्ट्राध्यक्षांचे आवाहन !

  • या हत्यांना आम्ही नाही, तर हमास उत्तरदायी ! – इस्रायलचे उत्तर

फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन व इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू

तेल अविव (इस्रायल) – फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी इस्रायलला युद्धबंदीचे आवाहन केले आहे. बीबीसीला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ‘गाझामध्ये महिला आणि मुले यांची हत्या आता थांबली पाहिजे’, असे म्हटले आहे; मात्र ‘इस्रायलला स्वतःचा बचाव करण्याचा पूर्ण अधिकार आहे’, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. यावर इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांनी उत्तर देतांना ‘गाझामध्ये होणार्‍या मृत्यूंना आम्ही नव्हे, तर इस्लामिक स्टेट आणि हमास उत्तरदायी आहेत. जगाने त्यांच्यावर टीका करावी, आमच्यावर नाही’, असे म्हटले आहे. त्याच वेळी नेतान्याहू यांनी जगाला चेतावणी देतांना म्हटले की, गाझामध्ये हमासने केलेले गुन्हे पॅरिस, न्यूयॉर्क आणि जगात अन्यत्रही होण्याची शक्यता आहे.

१ सहस्र ४०० नाही, तर १ सहस्र २०० जणांचा मृत्यू !

हमासने इस्रायलवर ७ ऑक्टोबर या दिवशी केलेल्या आक्रमणात १ सहस्र ४०० नाही, तर १ सहस्र २०० जणांचा मृत्यू झाल्याची अधिकृत माहिती इस्रायलकडून आता देण्यात आली आहे. दुसरीकडे गाझामध्ये इस्रायलच्या आक्रमणात ११ सहस्रांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.

इस्रायलच्या सैन्याने गाझामधील ३ रुग्णालयांना घातला वेढा !

इस्रायली सैन्याने १० नोव्हेंबरला गाझामधील अल् शिफा रुग्णालयाजवळ आक्रमण केल्यानंतर अल् शिफा, अल कुद्स आणि इंडोनेशिया या रुग्णालयांना चारही बाजूंनी घेराव घातला आहे. यामळे रुण आणि कर्मचारी रुग्णालयात बंदिस्त आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यात चकमक चालू आहे. या रुग्णालयांच्या खाली हमासचे सैन्य तळ आहे. अल् शिफा रुग्णालयाच्या खाली हमासच्या गुप्तचर विभागाचे मुख्यालय आहे.

हमासचा प्रमुख इस्माईल हनीये याची नात रोआ हनीये हिचा गाझामध्ये झालेल्या बाँब आक्रमणात मृत्यू झाला; मात्र याला इस्रायलच्या सैन्याने या माहितीला दुजोरा दिलेला नाही.

महमूद अब्बास गाझाचे दायित्व घेण्यास सिद्ध

पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास

पॅलेस्टाईनचे राष्ट्राध्यक्ष महमूद अब्बास यांनी युद्धानंतर गाझाचे दायित्व घेण्यास सिद्ध असल्याचे म्हटले आहे. इस्रायलच्या निर्मितीनंतर पॅलेस्टाईन अरबांची लोकसंख्या केवळ दोनच भागात राहिली – वेस्ट बँक आणि गाझा. वेस्ट बँक पॅलेस्टिनी प्राधिकरणाच्या नियंत्रणात आहे आणि गाझा हमासच्या नियंत्रणात आहे. इस्रायलचे पंतप्रधान नेतान्याहू यांनी गाझा नियंत्रणात घेणार नसल्याचे म्हटले आहे; मात्र ‘आम्ही गाझाला चांगले भविष्य देऊ’, असे त्यांचे म्हणणे आहे.

संपादकीय भूमिका

दया, माया न दाखवता जिहादी आतंकवाद मुळासकट कसा नष्ट करायचा याचा आदर्श इस्रायल जगासमोर ठेवत आहे. भारताने असे केले असते, तर देशात आतंकवादी कारवाया कधीच थांबल्या असत्या !