घोटगेवाडी येथे तिलारी कालव्याची जलवाहिनी कोसळली

घोटगेवाडी, परमे, घोटगे गावांचा पाणीपुरवठा बंद

प्रतिकात्मक छायाचित्र

दोडामार्ग – तालुक्यातील तिलारी प्रकल्पाच्या उजव्या कालव्याची घोटगेवाडी येथील जलवाहिनी २१ जानेवारीला मध्यरात्री कोसळली. यामुळे घोटगेवाडी, घोटगे, परमे या गावांना होणारा पाणीपुरवठा बंद झाला आहे. गेल्या वर्षी या जलवाहिनीची तात्पुरती डागडुजी करण्यात आली होती.

तिलारी धरणाच्या डावा आणि उजवा या २ कालव्यांतून पाणीपुरवठा केला जातो. यातील घोटगे आणि परमे गावांना या कालव्यातून शेती अन् बागायती यांसाठी पाणीपुरवठा केला जातो. गेल्यावर्षी उजव्या कालव्याच्या घोटगेवाडी येथील जलवाहिनीला गळती लागली होती. येथील शेतकर्‍यांनी वारंवार सांगूनही या जलवाहिनीची केवळ तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. ही जलवाहिनी कोसळल्याने घोटगे आणि परमे येथील शेतकर्‍यांच्या सुपारी आणि नारळ बागायतींना होणारा पाणीपुरवठा बंद रहाणार आहे. यामुळे शेतकर्‍यांची मोठी हानी होणार आहे.