९ घायाळ, ७ घरे, ६ दुचाकी यांची हानी
कराड – कराड शहरातील मुजावर कॉलनीत २५ ऑक्टोबरला सकाळी ७ वाजता भीषण स्फोट झाला. या स्फोटामुळे घराची भिंत अनुमाने २५ फूट वर उडून समोरील घराच्या पत्र्यावर पडली. स्फोटात शरीफ मुल्ला यांच्या कुटुंबातील ९ जण घायाळ झाले आहेत. स्फोट एवढा भीषण होता की, आजूबाजूच्या ७ घराच्या भिंतींचीही पडझड झाली असून घरे धोकादायक बनली आहेत. या स्फोटामुळे ६ दुचाकी गाडींचीही हानी झाली आहे. या स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. मुजावर कॉलनीतील शांतीनगर येथे शरीफ मुल्ला हे त्यांच्या कुटुंबासह रहातात. २५ ऑक्टोबरला सकाळी त्यांच्या घरात अचानक स्फोट झाला. यामुळे मुल्ला कुटुंबियांना घराबाहेर पडण्याची संधीच मिळाली नाही. या स्फोटात मुल्ला कुटुंबातील ५ जणांसह अन्य काही जण घायाळ झाले आहेत. अग्नीशमनदलासह स्थानिक नागरिकांनी धावपळ करत आग आटोक्यात आणली. घायाळ झालेल्या रुग्णांना कृष्णा रुग्णालयात उपचारांसाठी भरती करण्यात आले आहे. हा गॅस सिलिंडरचा स्फोट असल्याचे सांगितले जात असले, तरी हा भीषण स्फोट आणि झालेली हानी पहाता तर्कवितर्कांना उधाण आले आहे. नेमका स्फोट कसा ? आणि कशामुळे झाला ? याची माहिती कराड पोलीस घेत आहेत.