रत्नागिरी – बंदिस्त खेकडा पालन व्यवस्थापन प्रशिक्षण निश्चितपणे यशस्वी उद्योजकाकडे नेणारे आहे. सराव आपल्याला परिपूर्ण बनवतो. सराव म्हणजे गुणवत्तेचे सार आहे. मिळालेल्या प्रशिक्षणावर आधारित यशस्वी उद्योजक बनण्यासाठी सातत्याने त्यामध्ये सराव चालू ठेवा, असे मार्गदर्शन जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत सातपुते यांनी केले.
शहरातील झाडगाव येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राच्या वतीने (डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापिठ) १८ ते २० ऑक्टोबर ३ दिवसांचे बंदिस्त खेकडा पालन व्यवस्थापन प्रशिक्षण देण्यात आले. या प्रशिक्षणाचा समारोप आणि प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात प्रशिक्षणार्थ्यांना प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. या वेळी विशेष भूसंपादन अधिकारी निशाताई कांबळे उपस्थित होत्या.
जिल्हा माहिती अधिकारी श्री. सातपुते पुढे म्हणाले, ‘‘पायात पाय घालून खाली ओढणारा म्हणून खेकडा हा बोली भाषेतील वाक्यप्रचारात कलंकित झाला आहे; परंतु, हाच खेकडा पालन व्यवसाय तुम्हाला यशस्वी उद्योजकाकडे घेऊन जाणारा आहे. सामूहिकपणे खेकडा बीज बँक उभारणी करता येईल का ? यावर सर्वांनी जरूर विचार करावा. ही बँक अशा प्रकल्पांसाठी उपयुक्त आणि मार्गदर्शक ठरेल.
प्रशिक्षण कार्यक्रम समन्वयक तथा साहाय्यक संशोधन अधिकारी कल्पेश शिंदे यांनी प्रस्तावनेत प्रशिक्षणाविषयी सविस्तर माहिती दिली. संशोधन केंद्रप्रमुख वरिष्ठ वैज्ञानिक अधिकारी डॉ. आशिष मोहिते यांनीही विविध प्रशिक्षणाविषयी मार्गदर्शन केले. या वेळी बंदिस्त खेकडा पालन व्यवस्थापन प्रशिक्षण पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. या कार्यक्रमास गोवा, कर्नाटक, मुंबई, पुणे, सिंधुदुर्ग, हिंगोली आणि रत्नागिरी जिल्ह्यातील प्रशिक्षणार्थी सहभागी झाले होते.