मिरज येथे ‘डॉल्‍बी’ आणि ‘लेझर लाईट’ विरोधी उत्‍स्‍फूर्त बैठक : चळवळ चालू करण्‍याचा निर्धार !

डॉल्‍बी आणि लेझर लाईट या विरोधात चळवळ चालू करण्‍याचा निर्धार

मिरज – गणेशोत्‍सवासह इतर सर्व उत्‍सव, मिरवणूक आणि अन्‍य कार्यक्रमांमध्‍ये लावल्‍या जाणार्‍या ‘डॉल्‍बी’ (मोठा आवाज करणारी ध्‍वनीयंत्रणा), तसेच ‘लेझर लाईट’ (लेझर लाईट  म्‍हणजे विद्युत् चुंबकीय उत्‍सर्जनामुळे निर्माण झालेला प्रकाश) यांच्‍या विरोधात नागरिकांची उत्‍स्‍फूर्त बैठक किल्ला भाग येथील ‘रंगशारदा सभागृह’ येथे घेण्‍यात आली. या बैठकीत नागरिक आणि प्रतिष्‍ठित यांनी उत्‍स्‍फूर्तपणे त्‍यांची मते व्‍यक्‍त केली. डॉल्‍बी आणि लेझर लाईट यांमुळे नागरिकांचे आरोग्‍य धोक्‍यात येत असून या विरोधात चळवळ चालू करण्‍याचा निर्धार या वेळी व्‍यक्‍त करण्‍यात आला.

या वेळी मिरज येथील सुप्रसिद्ध नेत्रतज्ञ अनिल कुलकर्णी आणि डॉ. अमेय कुलकर्णी यांनी सांगितले, ‘‘लेझर किरणांमुळे या वर्षी त्‍यांच्‍याकडे रुग्‍ण येण्‍याचे प्रमाण वाढले आहे. एक महिला, तिचा मुलगा यांसह ८ जणांच्‍या डोळ्‍यास इजा होऊन त्‍यांना अंधत्‍व प्राप्‍त झाले आहे. लेझरदिवे हे अत्‍यंत घातक असून लेझर किरणांचा वापर हा अवैध असल्‍यामुळे प्रशासनाने त्‍याच्‍यावर त्‍वरित बंदी घालावी.’’

या बैठकीमध्‍ये ठरवण्‍यात आलेली काही सूत्रे पुढीलप्रमाणे

१. सर्व प्रकारच्‍या मिरवणुका आणि इतर उत्‍सव यांमध्‍ये ‘प्‍लाझ्‍मा डॉल्‍बी’ वापर करण्‍यास बंदी घालावी.

२. मशिदींवरील मोठ्या आवाजाचे अनधिकृत भोंगे बंद व्‍हावेत.

३. श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीविषयी आचारसंहिता बनवून त्‍या संदर्भात प्रसार व्‍हावा. या संदर्भात पोलीस, प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांना निवेदन देणे.

४ . न्‍यायालयात जनहित याचिका प्रविष्‍ट करणे.

या बैठकीसाठी निमंत्रक श्री. ओंकार शुक्‍ल, बांधकाम व्‍यावसायिक श्री. किशोर पटवर्धन, अधिवक्‍ता सी.जी. कुलकर्णी, प्रा. भीमराव धुळूबुळू, पर्यावरणप्रेमी सुधीर गोरे, अधिवक्‍ता अजिंक्‍य कुलकर्णी, मोहन वाटवे, गणेश चौगुले, जालिंदर हुलवान, विराज कोकणे, मिलिंद जाधव, नंदकुमार कोरे, सुनील चिप्‍पलकट्टी, महेश कुलकर्णी, रूपाली गाडवे, दीपा शेगूणशी यांच्‍यासह अन्‍य नागरिक उपस्‍थित होते.