सोलापूर शहरात नवीन रिक्‍शा थांब्‍यांची मागणी !

शहरातील परिवहन व्‍यवस्‍था कोलमडलेली

सोलापूर – शहरातील महापालिकेची परिवहन व्‍यवस्‍था कोलमडलेली आहे. त्‍यामुळे शहरवासियांसमोर शहरांतर्गत प्रवास करण्‍यासाठी रिक्‍शाविना पर्याय नाही. शहरात सध्‍या १५ सहस्र रिक्‍शा धावत आहेत; पण शहरातील अधिकृत रिक्‍शा थांब्‍यांची संख्‍या केवळ २३९ इतकी आहे. या पार्श्‍वभूमीवर नव्‍याने ४०० थांबे सिद्ध करण्‍याची मागणी रिक्‍शा संघटनांनी केली आहे.

अवैध रिक्‍शांंमधून होणारी प्रवासी वाहतूक वाढली आहे. शहरातील रस्‍ते विविध प्रकारच्‍या अतिक्रमणांमुळे अरुंद झालेले आहेत. त्‍यातच रिक्‍शांची संख्‍या वाढलेली आहे. त्‍यामुळे नव्‍या रिक्‍शा थांब्‍यांची आवश्‍यकता निर्माण झाली आहे. रहदारीस अडथळा होणार नाही आणि प्रवाशांना सोयीचे होईल, अशा दृष्‍टीने थांबे असावेत. नवीन थांबे निश्‍चित करतांना आर्.टी.ओ.च्‍या (प्रादेशिक परिवहन विभागाच्‍या) अधिकार्‍यांकडून पहाणी व्‍हावी, या मागणीचे निवेदन उपप्रादेशिक परिवहन अधिकार्‍यांना देण्‍यात आले.