मराठा समाजाचे आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांचा ३० सप्टेंबरपासून दौरा चालू होणार !

१४ ऑक्टोबरला अंतरवाली सराटी येथे कार्यक्रम !

आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील

जालना – मराठा समाजाला शांततेचे आवाहन करण्यासाठी ३० सप्टेंबरपासून ‘मराठा समाज संवाद’ दौरा करणार आहे, अशी माहिती आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी २७ सप्टेंबर या दिवशी पत्रकारांशी बोलतांना येथे दिली. हा दौरा ११ ऑक्टोबरपर्यंत असेल. त्यानंतर १४ ऑक्टोबर या दिवशी अंतरवाली सराटी येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. मराठा समाजाचे प्रश्न ऐकून घेणे आणि त्यांच्याशी संवाद साधणे यांसाठीच हा दौरा आहे, असे त्यांनी सांगितले.

मनोज जरांगे पुढे म्हणाले की, सरकारने जी ३० दिवसांची समयमर्यादा मागितली, ती १४ ऑक्टोबर या दिवशी संपत आहे. त्या दिवशी आम्ही अंतरवाली सराटी येथे मराठ्यांची शक्ती दाखवून देऊ. तेथून पुढेही सरकारकडे १० दिवस असणार आहेत; कारण आम्हीच सरकारला आणखी १० दिवस वाढवून दिले आहेत.

आरक्षण मिळाले नाही, तर २४ ऑक्टोबर या दिवशी भूमिका घोषित करू. तोपर्यंत आरक्षण मिळेल, ही आशा आहे. आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या समितीचे काम कसे चालू आहे ? त्याविषयी सरकारकडून अधिकृत काहीच माहिती आलेली नाही. त्यांनी माहिती दिली नाही, तरी हरकत नाही.