पुण्यातील ५ मानाच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन ! ९ घंट्यांहून अधिक काळ चालली मिरवणूक !

पुणे – येथील पाचही मानाच्या श्री गणेशमूर्तींचे विसर्जन २८ सप्टेंबर या दिवशी पार पडले. श्री गणेशमूर्ती विसर्जनाची ही मिरवणूक ९ घंट्यांपेक्षा अधिक वेळ चालली. मंडई येथील टिळक पुतळ्यापासून विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ झाला. पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आणि उपसभापती निलम गोर्‍हे यांच्या हस्ते आरती झाल्यानंतर मिरवणुकीला प्रारंभ झाला. पुण्याचे ग्रामदैवत आणि मानाच्या पहिला कसबा श्री गणेशमूर्तीचे विसर्जन थाटामाटात कऱण्यात आले.

पारंपरिक वेशभूषेत खांद्यावर पालखी घेऊन ढोल-ताशांच्या गजरात लक्ष्मी रस्त्यावरून कसबा गणेशमूर्तीचे विसर्जन केले जाते. नदी पात्रातील हौदात ४ वाजून ३५ मिनिटांनी कसबा गणेशमूर्ती विसर्जन करण्यात आले. गतवर्षीप्रमाणे यंदाही सायंकाळी सातच्या आत मानाच्या ५ गणपति मूर्तींचे विसर्जन करण्यात आले.

विसर्जनाच्या दिवशी पुणे शहरातील ऐतिहासिक गणेशोत्सव मिरवणूक पहाण्यासाठी सकाळपासूनच पुण्यासह जिल्ह्यातील भाविकांनी शहरात गर्दी केली होती. राज्यासह देश-विदेशातूनही मोठ्या प्रमाणात भाविक मिरवणूक पहाण्यासाठी आले होते. सगळीकडे गुलाल उधळला जात होता. या वेळी पावसानेही जोरदार उपस्थिती लावली; मात्र गणेशभक्तांचा उत्साह कायम होता.

मानाच्या अन्य ४ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

१. त्यानंतर पुण्याचा मानाचा दुसरा तांबडी जोगेश्वरी गणपतीची विसर्जन मिरवणूक सकाळी ११ वाजता चालू झाली आणि विसर्जन सायंकाळी ५ वाजून १० मिनिटांनी झाले. या वेळी ढोल-ताशांच्या पारंपरिक वाद्यांच्या गजरात पुण्यनगरी दुमदुमल्याचे दिसून आले. डेक्कन येथील हौदात विसर्जन करण्यात आले.

२. मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीच्या मुख्य विसर्जन मिरवणुकीला १२ वाजता आरंभ झाला. प्रतिवर्षी प्रमाणे यावर्षीही गुलालाची उधळण करण्यात आली. फुलांच्या ‘रामराज्य’ रथात पुण्याचा राजा विराजमान झाले होते. पुण्याचा मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणेशमूर्ती विसर्जन ५ वाजून ५५ मिनिटांनी करण्यात आले. पाचांळेश्वर घाटावर या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यात आले.

३. मानाचा चौथा तुळशीबाग गणपति मंडळाची विसर्जन मिरवणूक ‘महाकाल’ रथामधून दुपारी १ वाजता काढण्यात आली. तुळशीबाग ढोल ताशा पथकाकडून शिव तांडव वादन सादर करण्यात आले. मानाचा चौथा तुळशीबाग गणेशमूर्तीचे ६ वाजून ३२ मिनिटांनी विसर्जन झाले. डेक्कन परिसरातील महापालिकेच्या हौदात विसर्जन करण्यात आले.

४. पुण्यातील मानाच्या पाचव्या केसरीवाडा गणपतीच्या मिरवणुकीला सकाळी ११ वाजता आरंभ झाला. पुण्यातील पाचवा केसरीवाडा येथील गणपतीच्या मिरवणुकीला ८ घंटे लागले. पाचवा केसरीवाडा गणेशमूर्तीचे सायंकाळी ६ वाजून ५९ मिनिटांनी विसर्जन करण्यात आले.