(म्हणे) ‘आतंकवाद आणि अपहरण यांच्या धोक्यामुळे जम्मू-काश्मीर, मणीपूर आणि आसाम येथे जाऊ नका !’

कॅनडाने त्याच्या नागरिकांसाठी प्रसारित केली मार्गदर्शिका !

ओटावा (कॅनडा) – कॅनडा सरकारने भारतातील जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थिती पहाता त्याच्या नागरिकांना तेथे न जाण्यास सांगितले आहे. तसेच आसाम आणि मणीपूर येथेही न जाण्याचा सल्ला दिला आहे. कॅनडाने म्हटले की, तेथे आतंकवाद आणि अपहरण यांचा धोका आहे.

(म्हणे) ‘आम्हाला तणाव वाढवायचा नाही !’ – पंतप्रधान ट्रुडो

कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांची नवी भूमिका समोर आली आहे. ते म्हणाले की, आम्हाला हा तणाव वाढवायचा नाही. आम्हाला चिथावणी द्यायची नाही किंवा वाद निर्माण करायचा नाही. आम्ही काही तथ्ये समोर ठेवली आहेत. आम्हाला या सूत्रावर भारत सरकारसमवेत काम करायचे आहे जेणेकरून सर्व काही स्पष्ट होईल. (जर ट्रुडो यांना प्रामाणिकपणे असे वाटत असते, तर त्यांनी आधी भारताशी याविषयी औपचारिक चर्चा केली असती; मात्र त्यांना भारताचा सूड घेण्यासाठी भारताच्या अधिकार्‍याला देश सोडण्याचा आदेश दिला, हे जगाच्याही लक्षात आले आहे ! – संपादक)

कॅनडातील भारतियांसाठी भारतानेही प्रसारित केली मार्गदर्शिका !

नवी देहली – खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘सिख फॉर जस्टिस’ने कॅनडातील हिंदूंना देश सोडून जाण्याची धमकी दिल्याच्या पार्श्वभूमीवर भारतानेही कॅनडातील भारतियांसाठी मार्गदर्शिका प्रसारित केली आहे.

भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाने यात म्हटले आहे की, कॅनडामध्ये वाढत्या भारतविरोधी घटना पहाता तेथील भारतीय नागरिक आणि प्रवासी यांनी सतर्क रहाण्याची आवश्यकता आहे. कॅनडातील गुंडांनी भारतीय उच्चाधिकारी आणि भारतीय नागरिक यांना लक्ष्य केले होते. त्यामुळेही हा सल्ला दिला जात आहे. (कॅनडातील हिंदूंच्या मंदिरांवर खलिस्तानवाद्यांकडून सातत्याने होत असलेल्या आक्रमणांवरून आता भारतानेही अशी मार्गदर्शिका प्रसारित करून कॅनडाला आरसा दाखवला, हे अभिनंदनीय ! – संपादक)

ट्रुडो यांनी पुरावे सादर करावेत ! – कॅनडातील विरोधी पक्षनेत्याचा सल्ला

विरोधी पक्षनेते पियरे पॉइलिव्हरे

खलिस्तानी आतंकवादी निज्जर यांच्या हत्येवरून कॅनडा आणि भारत यांच्यातील वादावर कॅनडातील विरोधी पक्ष पंतप्रधान ट्रुडो यांच्या विधानापासून वेगळे असल्याचे दिसून आले आहे.

तेथील विरोधी पक्षनेते पियरे पॉइलिव्हरे यांनी ट्वीट करून म्हटले की,  आमच्या पंतप्रधानांनी स्पष्ट आणि थेट बोलले पाहिजे. त्यांच्याकडे पुरावे असतील, तर त्यांनी ते जनतेसमोर मांडावेत. हे घडल्यावरच ‘कोण बरोबर आणि कोण चुकीचे आहेत’, हे लोक ठरवू शकतील. आश्‍चर्याची गोष्ट म्हणजे ट्रुडो कोणतेही तथ्य मांडत नाहीत. त्यांच्या बाजूने केवळ विधाने येत आहेत, हे कुणीही करू शकते.

संपादकीय भूमिका

कॅनडाच्या आगळिकीप्रकरणी त्याला धडा शिकवण्यासाठी भारताने स्वत:च्या वाढलेल्या शक्तीचा उपयोग करावा !