ब्रिटनमधील भारतीय दूतावासावर आक्रमण करणार्‍या १९ खलिस्तान्यांची ओळख पटली !

जालंधर (पंजाब) – ब्रिटनमधील भारतीय दूतावासावर आक्रमण करणार्‍या १९ खलिस्तान्यांची ओळख भारताच्या राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने पटवली आहे. १९ मार्च २०२३ या दिवशी ४५ खलिस्तानी समर्थकांनी भारतीय दूतावासावर आक्रमण केले होते. अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को येथील भारतीय दूतावासाला लक्ष्य करणार्‍या ४ खलिस्तान्यांचीही ओळख पटवण्यात आली आहे. या सर्व ओळखल्या गेलेल्या खलिस्तानींसाठी पारपत्र विभागाकडून पुढील कारवाई करण्यास प्रारंभ करण्यात आला आहे. २ जुलै २०२३ या दिवशी सॅन फ्रान्सिस्कोमधील भारतीय दूतावासाच्या इमारतीत ‘सिख फॉर जस्टिस’ या बंदी घालण्यात आलेल्या खलिस्तानी संघटनेच्या समर्थकांनी  प्रवेश केला आणि ती पेटवून दिली. कॅनडात मारला गेलेला आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येनंतर हे कृत्य करण्यात आले होते. या जाळपोळीत कुणाचाही मृत्यू झाला नाही.

राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेचे पथक कॅनडाला जाणार !

ब्रिटन आणि अमेरिका येथील भारतीय दूतावासांवरील आक्रमणांच्या अन्वेषणासाठी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेची पथके या दोन्ही देशांत जाऊन आली होती. आता या यंत्रणेचे पथक कॅनडाला जाणार आहे. भारतीय दूतावासावर झालेल्या आक्रमणाच्या अन्वेषणासाठी हे पथक पुढील मासात कॅनडाला जाणार आहे.